बाबांचा ‘फियास्को’

दिव्यमराठी

Jun 13,2011 01:25:01 PM IST

योगगुरू बाबा रामदेव यांचा गेले ९ दिवस सुरू असलेला देशातील एक मोठा ‘रिअ‍ॅलिटी मॅडनेस शो’ काही ठोस निर्णय न होताच अखेर संपला. बाबांनी हे उपोषण मागे घेतले असले तरी भ्रष्टाचारविरोधातील त्यांची लढाई सुरूच राहील, अशी बाष्कळ बडबड त्यांचे निकटचे अनुयायी बालकृष्ण यांनी जाता-जाता केली. त्यातच श्री श्री रविशंकर, मोरारी बापू, कृपालू महाराज आणि इतर आध्यात्मिक नेत्यांच्या आग्रहामुळे बाबांनी हे उपोषण मागे घेत असल्याचे सांगून अनेकांना बुचकळ्यात पाडले. उपोषण मागे घ्यावे, अशी महत्त्वाची सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी केली होती. बहुधा राजकारणात चाणाक्ष असल्यामुळे या सगळ्या उपोषण-आंदोलनाचा पूर्ण ‘फियास्को’ झाला आहे, हे त्यांच्या अगोदरच लक्षात आले असावे. तसेच या आंदोलनाचा बोजवारा उडाल्याचे अंतर्ज्ञानी बुवा-बाबांच्याही उशिरा लक्षात आल्याने हे उपोषण आटोपते घेतले गेले. दिल्लीतील आंदोलन उधळल्यानंतर बाबांनी हरिद्वार येथील आपल्या पतंजली आश्रमातून उपोषणास सुरुवात केली होती. हे उपोषण सुरू झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापेल, डावे-उजवे हातात हात घालून रस्त्यावर येतील, अण्णा हजारेंचे आंदोलन आपल्या आंदोलनापुढे फिके पडेल, जनतेमध्ये संतापाची लाट उसळून भयभीत झालेल्या सरकारचे प्रतिनिधी चर्चेसाठी येतील, अशी त्यांची अपेक्षा होती; पण यापैकी काहीही घडले नाही. हा खास ‘रिअ‍ॅलिटी मॅडनेस शो’ मीडियानेही ९ दिवस मनसोक्तपणे साजरा केला. या उपोषणाच्या निमित्ताने बाबा रामदेव यांच्यासह देशातील तमाम साधू, संन्याशांनी आपली राजकीय प्रगल्भता किती उच्च कोटीची आहे, त्याचबरोबर अण्णांच्या भ्रष्टाचार आंदोलनाचा कसा बोºया वाजवला हेही दाखवून दिले. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी आणि अण्णा हजारेंच्या वाढत्या लोकप्रियतेला शह देण्याच्या उद्देशाने बाबांनी रामलीला मैदानावर अत्यंत ‘हायटेक’रीत्या आंदोलनाची आखणी केली. सुरुवातीला सरकारने ‘रेड कार्पेट’ वागणूक दिल्याने अर्धी लढाई जिंकल्याच्या आवेशात ते होते; पण त्यांचे आंदोलन ‘फिक्स’ होते, असा गौप्यस्फोट सरकारने केल्यानंतर मात्र अण्णांसह भाजप, आरएसएसची चांगलीच पंचाईत झाली. त्यानंतर विरोधाभास करणारी वक्तव्ये देत सरकारने टाकलेला डाव उधळून लावण्याच्या दृष्टीने बाबांनी हे पुढचे नाट्य घडवून आणले. या नाटकात नैतिकतेचा आव आणणारे हे साधू-संत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर आल्यानंतर प्रत्यक्षात कसे पळ काढतात, हे जनतेला कळून चुकले. तसेच गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनाची ‘कॉपी’ही या लोकांना न जमल्याने या साधू-संतांचा नैतिक पाया किती ठिसूळ आहे, हेही त्यांच्या लक्षात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाबाबत बाबांची भूमिका अस्पष्ट असल्याचे साफ दिसले व जनसमुदाय गोळा करून शक्तिप्रदर्शन करण्याची बाबांची ‘ट्रिक’ही फारशी कामी आली नाही. त्यामुळे बाबांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या भक्तगणांनी पोलिसांवर यथेच्छ बाटल्या, चपला, दगड मारण्यास सुरुवात केली तेव्हाच या आंदोलनाची दिशा आणि त्याचा हेतू काय असणार हे लक्षात आले. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात राजकीय पक्षांना चार हात लांब ठेवले होते; पण बाबांच्या आंदोलनात साध्वी ऋतंभरा सामील झाल्याने या आंदोलनामागे संघ आहे हे लक्षात आले. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही बाबांच्या आंदोलनामागे संघ असल्याचा थेट आरोप करून आंदोलनाविरोधात शड्डू ठोकला. दुसरीकडे भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी ‘दुस-या क्रांतीची पहाट’ असल्याचे सांगत देशभक्तिपर गाण्यावर ‘आयटेम डान्स’ केला. या सगळ्या ओंगळवाण्या प्रकाराने हे आंदोलन हास्यास्पद ठरत गेले. पोलिसी अत्याचाराचा निषेध म्हणून अण्णांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले; पण पुढे बाबांची संघ आणि भाजपशी अदृश्य सलगी बघता आणि बाबांनी सरकारविरोधात सशस्त्र लढाईची घोषणा केल्यानंतर अण्णांची आणि ‘सिव्हिल सोसायटी’ची पंचाईत झाली. शेवटी सरकारच्या हृदयपरिवर्तनासाठी आणि रचनात्मक बदलासाठी ज्या आंदोलनाची या सर्वांनी हाक दिली होती ती हाक या लोकांच्या ‘मी’पणाच्या अहंकारात विरून गेली. काळा पैसा देशात आणण्याबाबत सरकारपुढे अनेक राजनैतिक अडचणी असतात याची कल्पना या लोकांना नाही. आपल्या देशात एकही बँक आपल्या खातेदाराची माहिती उघड करत नाही. असे असताना स्वीस बँका कोणत्या आधारावर ही माहिती भारत सरकारला देतील, हा खरा प्रश्न आहे. हा सगळा अज्ञानीपणा, अडाणीपणा या आंदोलनाच्या मुळाशी आहे. व्यवस्था परिवर्तन राजकीय व्यवस्थेशी निगडित असते. भारतासारख्या लोकशाही देशात राजकीय व्यवस्था ही सुदूर पसरली आहे. भ्रष्टाचार फक्त नोकरशाही-मंत्री करतात असे नाही, तर त्याची लागण समाजातील सर्वच व्यवस्थांना लागली आहे. अशा परिस्थितीत हे चित्र बदलू पाहणाºया अण्णा-बाबांसारख्यांचा संसदीय लोकशाही व्यवस्थेवर, लाखो लोकांनी निवडून दिलेल्या खासदार-आमदारांवर, मंत्र्यांवर विश्वास नाही. शिवाय त्यांना प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये सामील व्हायचे नाही. मग हे परिवर्तन घडवून कसे आणणार, हा खरा प्रश्न आहे. आपले दैनंदिन जीवनमान भ्रष्टाचारमुक्त होईल, अशा भाबड्या आशेपायी जनता अशा बाबा-अण्णांच्या मागे उभे राहते; पण याच नेत्यांना सामाजिक परिवर्तनाचा मार्ग माहीत नसल्याने त्यांना निराशेला सामोरे जावे लागते. या आंदोलनादरम्यान सरकारने मौन बाळगल्याने जनतेमध्येही प्रतिक्रिया उमटल्या. नेतृत्वाचे याबाबत काय म्हणणे आहे, याची वाट जनता पाहत होती; पण जनतेला एक ‘रिअ‍ॅलिटी मॅडनेस शो’ पाहायला मिळाला. आता या ‘फियास्को’मुळे नागपूरच्या संघाच्या आश्रमामध्ये चिंतन बैठक घेऊन पुढील डावपेचांचा विचार केला जाईल; पण तिथे मात्र सुषमा, उमा किंवा ऋता यांचा ‘आयटेम डान्स’ होण्याची शक्यता कमी आहे.X
COMMENT