आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाहुबली’तून पक्के झाले पौराणिक कथांचे गारूड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटप्पाने बाहुबलीला का मारले? आणि जान्हवीला मूल कधी होणार? हे दोनच प्रश्न सध्या महाराष्ट्रासमोर असल्यासारखे विचारले जात आहेत. त्याचे गमक हा चित्रपट आणि मालिकेच्या यशात आहे. सोशल मीडियावर सध्या या पोस्टची धूम आहे.
ल हानपणापासून चमत्कारिक आणि सुरस कथा आपल्याला आकर्षित करत आल्या आहेत. एक सुंदर राजकन्या असते, एक राक्षस तिला पळवून नेतो. मग आपला कथानायक संकटांवर मात करीत कसा राक्षसाच्या गुहेत पोहोचतो आणि त्याला ठार मारून राजकन्येसह परत येतो. या संपूर्ण प्रवासात त्याच्यावर अनेक संकटे येतात, कधी समुद्रात मोठा नाग येतो, मग त्याला मारल्यानंतर तो मनुष्यरूपात येतो आणि कथानायकाला मदत करतो, अशा अनेक चित्रविचित्र गोष्टी वाचताना मन गुंग होते आणि डोळ्यासमोर ती दृश्ये साकार होऊ लागतात. अशा कथा जेव्हा रुपेरी पडद्यावर साकारायच्या असतात तेव्हा तंत्राची मदत घेऊन ती दृश्ये जिवंत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तरच तो यशस्वी होतो अन्यथा त्याचे हसे होऊन जाते. सध्याचे युग आधुनिक तंत्रज्ञानाचे असल्याने आणि अॅनिमेशन तंत्राने क्रांती केलेली असल्याने अशा चित्रविचित्र गोष्टी खूपच आकर्षकपणे आणि खऱ्या वाटतील अशा पद्धतीने पडद्यावर मांडल्या जातात आणि प्रेक्षक थक्क होऊन अशी गोष्ट पाहण्यासाठी गर्दी करतो.

सध्या संपूर्ण भारतभरात प्रचंड गर्दी खेचत तिकीट खिडकीवर उत्पन्नाचे विक्रम करणारा बाहुबली हा असाच काल्पनिक पौराणिक कथेवर आधारित चित्रपट आहे. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही हा चित्रपट चांगली गर्दी खेचताना दिसत आहे. खरे तर हा मूळचा दाक्षिणात्य चित्रपट. दक्षिणेत पौराणिक कथांवर जितके चित्रपट तयार होतात त्यामानाने हिंदीमध्ये होत नाहीत. दुसरीकडे हॉलीवूड आणि चीनमध्ये मात्र अशा विषयांवर कोट्यवधी रुपये खर्च करून चित्रपटनिर्मिती केली जाते. काही वर्षांपूर्वी आलेल्या "अवतार' चित्रपटात पौराणिक आणि आधुनिक अशा दोन्ही गोष्टींचा मेळ घालत उत्कृष्ट अॅनिमेशनची साथ देत एक अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न केला होता. हा चित्रपट जगभरात कमाईची कोट्यवधींची उड्डाणे करणारा ठरला.

पौराणिक कथांचे हे वेड नवे आहे असे नव्हे. भारतात जेव्हा चित्रपट जन्माला आला तेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्राचीच गोष्ट प्रेक्षकांपुढे अपुऱ्या साधनांनिशी चमत्कृती घडवत आणली. तेव्हापासून हा पौराणिक चित्रपटांचा सिलसिला सुरू झाला.

हॉलीवूडने आपल्याकडीलच चमत्कृत कथांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत हॅरी पॉटरची शृंखला सुरू केली. आपल्याकडील कथांमध्ये नेहमी आढळणारी उडती चटई, चेटकीण, बोलणारा साप, कुत्रा, वाघ, मनुष्याचे वेगवेगळ्या प्राण्यांत होणारे रूपांतर आणि पुन्हा मनुष्याच्या रूपात येण्याची त्यांची क्षमता या सगळ्या गोष्टी लेखिका जे. के. रोलिंगने एका कथासूत्रात मांडल्या आणि जगभरातल्या सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना हॅरी पॉटरने वेड लावले. चीन आपल्यासारखाच पौराणिक कथांच्या मोहजालात रमणारा देश. चीनने व्हीएफएक्सची मदत घेत ‘क्राउचिंग टायगर’, ‘हिडन ड्रॅगन’सारखा विश्वविख्यात चित्रपट तयार केला. चीनचे चित्रपट हे तेथील संस्कृती सांगणारेच असतात. या चित्रपटांनीही जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यामुळेच ब्रुस ली आणि जॅकी चॅन लोकप्रिय झाले. एस. एस. राजामौलीने बाहुबलीमध्ये खरे कलाकार आणि व्हीएफएक्सच्या माध्यमातून भव्यता निर्माण केली. बाहुबलीची कथा ही पूर्णपणे नवीन आहे. विशेष म्हणजे यात चमत्कार नाहीत. परंतु भारतीय प्रेक्षकांना आवडणारा बलदंड नायक, भारतीय संस्कृती, सिनेमाच्या सुरुवातीलाच येणारा भव्य धबधबा, भलेमोठे डोंगर, डोंगरावर असलेला आलिशान राजवाडा, अंगावर येणारी युद्ध दृश्ये, युद्धामध्ये सैनिकांकडून तयार करण्यात येणारे आकार, रणनीती, युद्ध जिंकण्यासाठी केलेल्या क्लृप्त्या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. मोठ्या पडद्यावरील हा थरार छोट्या पडद्यावर अनुभवता येणे शक्य नसल्यानेच प्रेक्षकांनी चित्रपटगृहांत गर्दी केली. अॅनिमेशन आहे हे ठाऊक असूनही खऱ्याचा आभास निर्माण करण्याचे चित्रपटाचे वैशिष्ट्यच त्याला बॉक्स ऑफिसचा राजा बनवून गेले. ही या सिनेमाची वैशिष्ट्ये. खरे तर एस. एस. राजामौलीने आधीच्या ‘मागाधीरा’मध्ये अशाच प्रकारची दृश्ये दाखवली होती; परंतु चित्रपट हिट होऊ शकला नाही. ‘अवतार’ आणि ‘बाहुबली’मध्ये महत्त्वाचा फरक आहे तो कथेच्या काळाचा. अवतार हा सायन्स फिक्शन असून बाहुबली हा पौराणिक कथेवर आधारित चित्रपट आहे. अवतार हा २२ व्या शतकातील आदिमानवांची कथा सांगतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानव जात कशी पुन्हा आदिम जमातीत राहण्यासाठी बाध्य होते आणि त्या वेळी आधुनिक युगात राहणाऱ्यांशी त्यांचा कसा संघर्ष होतो हे जेम्स कॅमेरूनने उत्कृष्ट व्हीएफएक्सच्या मदतीने दाखवले होते. तर बाहुबलीमध्ये प्राचीन काळातील म्हणजेच आदिम जमातीतील जीवनाचे दर्शन घडवले होते. अवतारमध्ये ज्याप्रमाणे आधुनिक आदिमानव आणि प्रगत मानवातील संघर्ष दाखवला होता तसाच बाहुबलीमध्ये आदिम जमाती आणि राजांमधील वैराचे चित्रण केले आहे. अवतारमध्ये संस्कृतीवर जास्त लक्ष दिले नव्हते. मात्र, बाहुबलीमध्ये शंकराची आराधना, मंत्रोच्चार, शंकराची शक्ती असा अस्सल भारतीय मसाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारला.

बाहुबलीमध्ये वडिलांच्या हत्येचा बदला हा मुख्य विषय अत्यंत उत्कृष्टरीत्या हाताळण्यात आला. दिग्दर्शक पौराणिक कथेशी प्रामाणिक राहिला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय संस्कृतीचा त्याला मुलामा दिला. आपल्या कथानकावर आणि सादरीकरणावर पूर्ण विश्वास असल्यानेच राजामौलीने बाहुबली हिंदीत आणला आणि त्याचा विश्वास किती खरा होता हे प्रेक्षकांनी तिकीट खिडकीवर गर्दी करून दाखवून दिले.