आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसींचे बौद्ध धर्मांतर कितपत शक्य?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परमात्मा, स्वर्ग, नरक, विधिलिखित, चमत्कार, नवस, पुनर्जन्म या सर्व धादांत खोट्या व भाकड कल्पना आहेत. अधिक दूरगामी विचार करणार्‍या वर्गाने सामान्य लोकांच्या वर्तनातील दोष शोधून त्यांना पिढ्यान्पिढ्या भयग्रस्त अवस्थेत ठेवण्यासाठी देव निर्माण केला. त्यांचे हित आणि हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी भलेबुरे सर्व स्तर आरपार केले आहे. बहुजनांच्या अजूनही लक्षात येत नाही की, आपले माणूसपण हिरावून घेणारा धर्म आपला असू शकतो का? धर्म आपल्यावर प्रेम करणारा, आपले सर्व अंगांनी विकास करणारा, आपले जीवन संपन्न करणारा, जीवनात प्रकाश आणणारा असतो.

हजारो वर्षे गुलामगिरीत काढल्यामुळे बहुजनांतील बहुसंख्याक लोकांच्या अनेक शक्तींचा -हास झाला आहे. त्यांची व्यक्तित्वे जणू काही नि:सत्त्व, निस्तेज व निष्प्रभ झाली आहेत. धर्माच्या नावावर त्यांच्या मेंदूत असंख्य जळमटे भरलेली आहे. नैतिक आणि भौतिक मूल्याच्या दृष्टीने ज्याला आपण कचरा अडगळ म्हणू असे बरेच काही त्यांनी विनाकारण साठवून ठेवले आहे. ते सर्व फेकून द्यावे लागेल. तेव्हा आपला मेंदू ताजा, टवटवीत व स्वच्छ होईल आणि मग तो सत्याचे, विज्ञानाचे स्वागत करील. नव्या जीवनमूल्यांना आपल्या भल्यासाठी स्वीकारील.

सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी ओबीसींना बौद्ध धम्मात प्रवेश घेण्याबाबत अभियान सुरू केले आहे. कोणत्याही प्रवाहाची सुरुवात एकापासून अनेकांकडे अशी प्रवाहित होत असते. मुळात हनुमंत उपरे हे मानवहिताच्या चळवळीशी गेली अनेक वर्षे जोडलेले आहेत. त्यामुळे बौद्ध धम्मात प्रवेश आणि आरक्षण असे बालिश विषय घेऊन ते निघालेले नसावेत. आरक्षण हा मानवी हिताच्या मार्गातील तात्पुरता निवारा आहे. प्रश्न सन्मानाचा आणि भौतिक विकासाचा आहे, हे समजून घेण्यासाठी आजही ग्रामीण समूहात जावे लागेल. न्हाव्याचा उल्लेख काय होतो? सुताराचा उल्लेख काय होतो? कुंभाराचा उल्लेख काय होतो? तेल्याचा उल्लेख काय होतो? आजही महत्त्वाच्या आणि शुभ कामाला निघताना आमचेच बांधव ओबीसीतील काही जातीचे तोंड पाहत नाहीत. यापेक्षा अपमान आणि अवहेलना काय असू शकते! हनुमंत उपरे साहेबांना उशिरा सुचलेले शहाणपण ते हेच असू शकते, बौद्ध धम्मात ओबीसींचा प्रवेश महान मानव कल्याणकारी, भूतलावरील एकमेव मार्ग विज्ञान बौद्धधम्म!

ओबीसी समाजातील समाविष्ट जातींची मानसिकता महात्मा जोतिबा फुल्यांना नाकारणारी आहे. तसेच सामाजिक परिवर्तनापासून व सांस्कृतिक बदलापासून ती कोसो दूर आहे. धार्मिक बाबतीत ते मनुवादी आहेत. ब्राह्मणजनक पोथ्यापुराणात कर्मकांड, उपासतापासात हा समूह अडकून पडला आहे. या यातनांमधून त्यांना बाहेर काढलेच तरच विकासाची क्षितिजे हा समूह पाहू शकेल. नाही तर हुरळली मेंढी लागली लांडग्यामागे, अशी धार्मिक बाबतीत बहुजनांची स्थिती आहे. लांडग्यामागे न धावण्याचा निर्णय घ्यावाच लागेल. हा फार कठीण निर्णय आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य! म्हणून संत तुकाराम महाराज आठवावे लागतील. ते म्हणतात, ‘माया ब्रह्म म्हणती ठक! आपणासारिखे लोक नागविले!’
काही विद्वान असे म्हणतात की, हिंदू धर्माचा भारतीय जनतेवर असलेला जबरदस्त पगडा एवढा की धर्मांतरित झालेले बौद्ध बेटीव्यवहार पाळताना दिसतात. मुळात हे विधान मानसिक दुर्बलतेचे द्योतक आहे. मुळात धर्मगुरू-जगद् गुरू, महंत, माउली, प्रवचनकार (काही अपवाद) मोठ्या प्रमाणात धर्मप्रचार-प्रसार करीत आहेत. त्यासाठी शेकडो ग्रंथ निर्माण करीत आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे बौद्ध धम्माच्या संबंधित खोडसाळ विधाने केली जाताना दिसतात. आज जो कोणी बौद्ध झाला तो पुरुष किंवा ती स्त्री फक्त बौद्धच असते. इथे जातीचा, पोटजातीचा विषय उरतच नाही. भारतीय समाजव्यवस्था गुंतागुंतीची आहे. ती नाकारली पाहिजे. झोपेचे सोंग घेणार्‍याला जागे करण्याबाबत बुद्धांनी उत्तर दिले आहे. बुद्ध म्हणतात, ‘तूच तुझा दिवा आहेस!’ तोच दिवा इथल्या पूर्वाश्रमीच्या महारांनी स्वीकारला आणि त्यांना लख्ख प्रकाश दिसला सन्मानाचा, प्रतिष्ठेचा, माणूसपणाचा, विज्ञानाचा!

ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्या प्रगतीला जगाच्या इतिहासात तोड नाही. जाणकारांनी तपासून पाहावे. पूर्वाश्रमीचे सर्व हाडामांसाचे गोळे, देवदेवस्की, नवससायास, उपासतापास, जत्रा-खत्रा, कोंबडे-बकरे या सर्वांना अलविदा करते झाले आणि आज त्यांचा आलेख चढतोच आहे.

ओबीसींनी मानव कल्याणासाठी स्वच्छ आणि प्रामाणिक प्रयत्न करीत राहावेत. देवाधर्माच्या नादी न लागता जेवढ्यांना बाहेर घेऊन येता येईल त्यापेक्षा पुण्य काय असू शकते. बुद्धांचा संदेश संत तुकारामांच्या अभंगातून... ‘याचि देही याचि डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा’