आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खोट्या नेमणुकांपासून सावध राहा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी शोधणा-या, बदलणा-या गरजू उमेदवारांना नेमके हेरून, त्यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून संपर्क साधून व खोट्या मुलाखत नेमणूकपत्राचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल केली जाते. त्याचवेळी त्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मुख्य म्हणजे असे प्रयत्न काही फुटकळ व्यक्तींप्रमाणेच काही जण ठरवून व योजनापूर्वक आणि मोठ्या प्रमाणात करीत असल्याने त्याची वेळेत दखल घेणे पण निकडीचे ठरले आहे.


खोट्या व फसवणुकीद्वारे उमेदवारांच्या कथित मुलाखती घेऊन त्यांना खोटी नेमणूकपत्रे देण्याच्या विरोधात ज्या प्रस्थापित कंपन्यांनी योजनाबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील कंपन्या आणि त्यांच्याद्वारे करण्यात येणा-या प्रयत्नांचा समावेश करावा लागेल. बंगळुरू येथील काही उमेदवारांची तेथील काही जणांनी इंटेलमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या मुलाखती घेतल्या. खोटे नेमणूकपत्र देऊन संबंधित उमेदवारांची फसवणूक केली. त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्याच्या तक्रारी वाढत्या प्रमाणात आल्याने इंटेल कंपनीने यासंदर्भात बंगळुरू पोलिसांकडे रीतसर तक्रार केली आहे. तसेच याप्रकरणी सखोल चौकशीचे आवाहन केले आहे. खोट्या मुलाखत नेमणूकपत्रांद्वारे नोकरी देण्यात आली. उमेदवारांची वारंवार फसवणूक केली गेली. शिवाय मोठ्या रकमा वसूल करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडल्याने बॉशने तर प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित करून अशा उमेदवारांना त्यांच्या संभाव्य फसवणुकीपासून सावध राहण्याचा जाहीर सल्ला दिला आहे. मारुती सुझुकी, ह्युंडाई, एचसीएल टेक्नॉलॉजीज यासारख्या कंपन्यांनी, पण अशा प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने व उमेदवारांची फसवणूक टाळून कंपनीच्या पतप्रतिष्ठेला बाधा पोहोचू नये या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर ‘ई-मेल’चा वापर करण्यावर भर दिला आहे.


‘आयबीएम’सारख्या कंपनीने आपल्या संकेतस्थळावरील ‘रोजगार-संधीं’च्या जोडीलाच उमेदवारांनी अनधिकृत नोकरी निवड एजंटांपासून सावध राहून आपली फसवणूक टाळण्याचा जाहीर सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. प्रमुख कंपन्यांच्या संदर्भात खोट्या व फसवणूक करणा-या व त्याद्वारे संबंधित उमेदवारांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्याच्या प्रकारांची नोंद ‘नॅसकॉम’द्वारे घेण्यात आली आहे. यासंदर्भात ‘नॅसकॉम’द्वारा नव्यानेच केलेल्या एका अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की, मोठ्या व प्रस्थापित कंपन्यांमध्ये मुलाखत नोकरीचे आमिष दाखवून त्याद्वारे त्यांची हजारो रुपयांची फसवणूक होण्याचे प्रमाण नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला म्हणजेच जून-ऑगस्ट या कालावधीत सर्वाधिक असते. अभ्यास-अहवालात नमूद केल्यानुसार नव्या शैक्षणिक सत्राच्या पहिल्या टप्प्याच्या तिमाहीत नव्याने उत्तीर्ण झालेल्या पदवीधर- पदविकाधारकांचे प्रमाण सर्वाधिक असते. यातील बहुतांश जणांना नोकरीची गरज असते. तर काही जणांना शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी लगेच नोकरीला लागणे अपरिहार्य ठरते. अशा गरजू उमेदवारांची नोकरी, रोजगारविषयक गरजामुळे त्यांची दिशाभूल केली जाते.
गरजू उमेदवारांच्या नोकरी, रोजगारविषयक गरजा लक्षात घेऊन, त्यांच्याकडून पैसे उकळण्याची, महागडी फसवणूक करणा-यांच्या कार्यपद्धती आणि कार्यशैलीत विलक्षण साम्य असते, असे आढळून आले आहे. संबंधित उमेदवाराला पाठवल्या जाणा-या ई-मेलपासून या सा-या फसवणुकीची सुरुवात होते. संबंधित कंपनीच्या तंतोतंत जुळणा-या लेटरहेडवर अशा उमेदवारांना मुलाखतीच्या संदर्भात ई-मेल द्वारा सूचित करण्यात येते. हा सारा प्रकार इतका तंतोतंत आणि बेमालूमपणे व अचूक पद्धतीने केला जातो की, त्यावरून कुणाला काही शंका येण्याचे कारणच उरत नाही. या मुलाखत पत्रात उमेदवाराला त्याचा अर्ज वा उमेदवारी कंपनीच्या दृष्टीने कशी मिळाली, जुळली आहे हे पण सूचित केल्याने त्याचा या सा-या सूचना- प्रक्रियेवरील विश्वास निश्चितच दुणावला जातो.


या पद्धतीने आपल्याला मिळालेले कथित नेमणूकपत्र घेऊन उमेदवार विशिष्ट प्रतिष्ठित कंपनीत कामावर रुजू होण्यास जातात; तेव्हा त्यांना कळते की, त्यांची फसवणूक होऊनसुद्धा बराच उशीर झाला आहे. ही दुर्दैवी स्वरूपाची उमेदवारांची फसवणूक टाळली जावी यादृष्टीने आता प्रमुख कंपन्यांनीच प्रबोधनापासून पोलिसी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकाराला पुरतेपणी आळा बसावा यासाठी उमेदवार आणि त्यांच्या पालकांनीसुद्धा कुठल्याही प्रकारच्या फसव्या आश्वासनाला बळी न पडता संबंधित कंपन्यांना सूचित करणे व प्रसंगी पोलिसांची पण मदत घेणे तेवढेच गरजेचे झाले आहे.