आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर युद्धाची नांदी (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इंटरनेटचा प्रसार 20 व्या शतकाच्या अखेरीस वेगाने होऊ लागला तेव्हा जगावर माहिती तंत्रज्ञानाचे गारूड झाले होते. माऊसच्या क्लिकवर घरबसल्या माहिती मिळू लागली. माहितीचे जागतिकीकरण झाले, शिवाय तिचे लोकशाहीकरणही झपाट्याने झाले. ज्ञानाच्या मक्तेदारीला मुळापासून हादरे बसले. धर्म, वंश, संस्कृती, देश यांच्या सीमारेषा धूसर होऊ लागल्या. पण हे चित्र इंटरनेटच्या जगाची एक बाजू आहे. या जगाच्या दुस-या बाजूमध्ये धार्मिक द्वेष, संस्कृती अभिनिवेश, सत्तासंघर्ष ठासून भरलेला आहे. फेसबुक, ट्विटरच्या जन्मानंतर अनोळखी मित्र झाले. पण गेल्या पाच-सात वर्षांत इंटरनेट सुसंवादापेक्षा धर्मयुद्धासाठी, परक्या संस्कृतीवर-विचारसरणीवर हल्ला करण्यासाठी, प्रतिस्पर्धी देशाची सामरिक, आर्थिक माहिती चोरून नेण्यासाठी एक प्रमुख अस्त्र ठरले आहे. दोन दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल्स, ब्लूमबर्ग न्यूज या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रख्यात वर्तमानपत्रांनी आपल्या माहितीची चोरी चिनी हॅकरकडून होत असल्याचा उघडपणे आरोप केला. वास्तविक एखाद्या वर्तमानपत्राकडे असलेल्या गोपनीय माहितीची चोरी दुस-या वर्तमानपत्राकडून होऊ शकते वा तसे होते.

अनेकदा एखाद्या वर्तमानपत्राकडे असलेली बातमी दुस-या वर्तमानपत्रामध्ये अगोदर प्रसिद्ध होते. त्यामुळे पत्रकारांच्या वर्तुळात हलकल्लोळ उडू शकतो. पण येथे बाब निराळी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्क टाइम्सने चीनचे पंतप्रधान वेन जिआबाओ यांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्याअगोदर ब्लूमबर्ग न्यूजने चीनचे उपराष्ट्रपती क्षी जिनपिंग यांच्या नातेवाइकांनी अब्जावधी डॉलरचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्रसिद्ध केली होती. क्षी जिनपिंग हे येत्या मार्चमध्ये चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या महासचिवपदाची सूत्रे हाती घेणार असल्याने त्यांच्यासमोर राजकीय अडचणी उपस्थित करण्यासाठी अमेरिकी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त जाणूनबुजून छापल्याचा आरोप चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने केला होता. या घटनेनंतर अमेरिकी प्रसारमाध्यमांविरोधात चीनने जोरदार आघाडी उघडण्यास सुरुवात केली.

लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली गुगल, याहू, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर या अमेरिकी कंपन्या चीनमध्ये अस्थिरता निर्माण करत असल्याचा आरोप चीनकडून सुरू झाला. चीनने या कंपन्यांवर कडक नियंत्रणे आणण्यास सुरुवात केली. दुसरीकडे या निर्णयाने चीनच्या युवकांमध्ये अस्वस्थता पसरू लागली. कारण गेली काही वर्षे सेन्सॉरशिप कायद्याचा बडगा दाखवून चीनच्या कम्युनिस्ट सरकारने लोकशाही चळवळींची कोंडी करण्यास सुरुवात केली होती. त्याचे पुढचे पाऊल म्हणून चीनच्या सरकारने गुगल, यूट्यूब, फेसबुक या अमेरिकी कंपन्यांकडून चीनच्या सार्वभौमत्वावर हल्ला होत असल्याचा आरोप केला व या कंपन्यांकडून प्रसिद्ध होणा-या माहितीवर सेन्सॉरशिप लावली. गुगलच्या विरोधात चीनने दंड थोपटल्याने अमेरिका-चीन असा संघर्ष चव्हाट्यावर आला. चीनच्या मते गुगलच्या माध्यमातून अमेरिका चिनी समाजात लोकशाहीची बीजे रुजवत आहे. पण अमेरिकी वर्तमानपत्रांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते, चीन सत्ताधा-यांचा भ्रष्टाचार आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली यामुळे चीनच्या मध्यमवर्गात प्रचंड रोष निर्माण होत आहे. इंटरनेटमुळे चीनचे समाजवास्तव जगापुढे येत आहे. बदलत्या जगाचे हे वास्तव आहे व ते चीनच्या सत्ताधीशांनी स्वीकारले पाहिजे. आता हा संघर्ष आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांना चिंतेचा वाटू लागला.

चीनमध्ये राजकीय अस्थिरता अधिक वाढल्यास आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सत्तासमतोल बदलून तो अमेरिकेच्या फायद्याचा ठरेल. पण दुसरीकडे कम्युनिस्ट चीनमध्ये क्रांती होऊन तेथे हुकूमशाहीसुद्धा येऊ शकते असे काहींचे म्हणणे आहे. चीनमधील बदलते जीवन पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे एकांगी दाखवतात, अशी भूमिका घेणारी आंदोलनेही चीनमध्ये या निमित्ताने मूळ धरू लागली आहेत. परिणामी अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांमध्ये चीनसंदर्भात कोणती गुप्त माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी चीनच्या हॅकरनी वर्तमानपत्रांच्या कॉम्प्युटर यंत्रणेत घुसखोरी करून माहिती लंपास करण्यास सुरुवात केली. या हॅकरनी पाश्चिमात्य देशांच्या चीनमध्ये कार्यरत असणा-या पत्रकारांची माहिती गोळा करून त्यांच्या ई-मेल अकाउंटमध्ये घुसखोरी करून माहिती मिळवण्यास सुरुवात केली. हे हॅकर शेकडो ई-मेल पत्रकारांना पाठवतात. कोणत्याही मेलवर क्लिक केल्यास त्याचा ‘इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेस’(आयपी) हॅकरना मिळतो व या आयपी अ‍ॅड्रेसच्या मदतीने संबंधित पत्रकाराच्या अकाउंटमधील चीनसंदर्भातील सर्व माहिती हॅकरना मिळते. या सर्व प्रकरणाबाबत चीनच्या सरकारने सरकारी पातळीवर अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. पण सायबर जगतामधील काही अभ्यासकांच्या मते, चीनचे अमेरिकेविरोधातील हे सायबर युद्ध गंभीर असून भविष्यात चीन अमेरिकेच्या सामरिक आणि आर्थिक क्षेत्रात घुसखोरी करून बरीच उलथापालथ करू शकतो. पण दुसरीकडे अमेरिकाही हुवेई, झेडटीई या चीनच्या बड्या टेलिकॉम कंपन्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावू शकते. काही सायबर तज्ज्ञांनी चीनचा हा सायबर हल्ला चीनच्या सरकारमधील काही उच्चपदस्थांकडून होत असल्याचा दावा केला आहे.

इंटरनेटच्या जगात अमेरिकी प्रसारमाध्यमांविरोधात लढण्यासाठी कम्युनिस्ट पक्षांमधील काही नेत्यांनी स्वत:ची हॅकरची फौज उभी केली आहे. त्याचबरोबर चीनमध्ये अमेरिकेच्या आर्थिक साम्राज्याविरोधात जाणारा मोठा मध्यमवर्ग आहे. या मध्यमवर्गामध्ये चिनी राष्ट्रवाद, संस्कृतीचे आकर्षण आहे. या आकर्षणातून बरेच हुशार हॅकर अमेरिकी कंपन्यांच्या वेबसाइटवर घुसखोरी करून माहिती मिळवतात, अशी माहिती बाहेर आली आहे. या हॅकरच्या काही गटांनी तर तिबेट, तैवान प्रश्नी सरकारच्या विरोधात आवाज उठवणा-या अनेक संकेतस्थळांवर हल्ले करून ती बंद पाडली आहेत. अशा बुद्धिमान हॅकरनी या आभासी राष्ट्रवादासाठी अमेरिकेविरोधात रणशिंग फुंकले आहे. 21 व्या शतकातल्या सायबर युद्धाची ही पहिली झलक आहे.