आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhagwan Bhoir Article About Backward Class Issue In Maharashtra

भटक्यांना हक्क कधी मिळणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण संसदीय लोकशाही राज्यपद्धती स्वीकारलेली आहे. आपण आपले प्रश्न संसदीय मार्गानेच सोडवून घेतले पाहिजेत. परंतु ज्या आदिम जाती-जमाती आहेत त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय प्रश्न हजारो वर्षांपासून सुटतच नसतील व संसदीय मार्ग कुचकामी ठरत असतील तर त्या विशाल जनसमुदायाने काय करायचे? आपल्या महाराष्ट्रात भटक्या जाती-जमाती सुमारे 45 ते 50 आहेत. त्यांचे ‘रोटी, कपडा व मकान’ हे जीवनाचे मूलभूत प्रश्नच स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांनंतर सुटत नसतील तर त्यांनी काय करायचे? आपल्या समाजातील 45 जमातींचे जीवन स्थिर नसावे, स्वातंत्र्यातही त्यांच्या वाट्याला सर्व प्रकारची गुलामी यावी, याची लाज बाकी सर्व समाजाला का वाटत नाही?

भटक्या जाती-जमातीत आता-आता कुठे शिक्षणाचा दिवा पेटू लागलाय. परंतु अजून त्यांच्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा युगपुरुष जन्माला यायचा आहे. ते युगपुरुषाच्या शोधात आहेत. तरीही नव्या प्रकाशज्योती इवलासा प्रकाश घेऊन त्या भटक्यांच्या जीवनात उजेड आणण्यासाठी धडपडताहेत. तरुण मुलं-मुली पुढे येताहेत. भटक्या विमुक्त समाजातील समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींची 2006 मध्ये पुणे येथे ‘निर्माण’ ही संस्था स्थापन झाली आहे. विशेष म्हणजे या संस्थेतील सर्व युवक हे उमाजी नाईक, म. फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आहेत.
वर्तुळात वर्तुळ असावे, तशी आपली समाजरचना आहे. ग्रामरचना पूर्वापार कशी आहे? गावांमध्ये सवर्ण राहतात. गावाबाहेर वेशीवर अस्पृश्य किंवा दलित राहतात. जंगलात-दर्‍याखोर्‍यात आदिवासी राहतात. या सर्वांचे स्वतंत्र गाव आहे. त्या गावांमध्ये त्यांची घरे आहेत. त्यांचे जीवन स्थिर आहे. परंतु भटक्यांचे जीवनच भटके आहे. त्यांना त्यांचा गाव नाही, म्हणून हक्काचे घर नाही. हक्काची जमीन नाही. त्यांची नेमकी किती टक्के लोकसंख्या आहे, हे सांगणेही अवघड. आज या गावी तर उद्या त्या गावी, असे जीवनचक्र असल्याने त्यांची जनगणना तरी कशी होणार? त्यांच्या मुलांना कोणत्या शाळेत पाठविणार? भटक्यांमध्ये अशिक्षितपणा आजही खूप आहे. अज्ञानामुळे अंधश्रद्धाही खूप आहेत. समाज शिक्षित नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना समाजास प्रबोधन करणेही अवघड जाते. प्रा. मोतीराज राठोड यांनी समाजप्रबोधनपर अनेक ग्रंथ लिहिलेत, परंतु भटका समाज अडाणी असल्याने त्यांची पुस्तके, त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचत नाहीत.

पोट पाठीला बांधून व पाठीवर संसाराची गाडगी-मडकी घेऊन पोटाची भूक जाळण्यासाठी हा भटका समाज गावोगावी फिरतोय, शहरात फिरतोय. लोकांचे दोन घटका मनोरंजन करून हा समाज कसे तरी पोट भरतो. सापवाले, माकडवाले, अस्वलवाले, नंदीबैलवाले, गाढववाले, पोपटवाले, ही त्यांची समाजात ओळख! समाजात त्यांना प्रतिष्ठा अशी नाही. त्यांचे मित्र कोण? साप, माकड, अस्वल, बैल, पोपट, गाढव हे त्यांचे मित्र! सापवाले म्हणजेच गारुडी हे सापांना टोपलीत घालून गावोगावी फिरतात. नाग ही देवता आहे, ही येथील अंधश्रद्धा आहे. नागपंचमीच्या दिवशी तर ते रस्त्यांवर नागांचे खेळ दाखवत नागांना दूध पाजा, असे सांगत लोकांकडून पैसे जमा करत असतात. पोटासाठी विषारी सापांना बाळगणारे हे लोक आणखी किती दिवस सापांना बाळगणार? माकडवाले हेही असेच दोन-चार माकडांना पकडून त्यांना खेळांचे प्रशिक्षण देऊन गावोगावी माकडांचे खेळ करीत फिरतात व लोकांचे मनोरंजन करतात. अस्वलवाले हेही लोकांच्या अंधश्रद्धांवर जगत असतात. अस्वल घेऊन गावोगावी फिरायचे, त्यांचा खेळ करीत लोकांना भूतबाधा लागू नये म्हणून ताईत देतात. ताईतमध्ये अस्वलाचा एक केस उपटून भरून देतात व 10-12 रुपये घेतात. नंदीबैलवाले हे शंकराचे वाहन सांगत व त्यांचा खेळ करीत तांदूळ-पैसे मागत फिरत असतात. ज्योतिष सांगणारे ज्योतिषी पोपटांना पिंजर्‍यात घालून गावोगावी व शहरात रस्त्यावर जाऊन बसतात. ज्योतिषी हे भविष्याच्या छापील पत्रिका घेऊन बसतात. तुम्ही भविष्य पाहायला गेलात की तो ज्योतिषी पोपटाला भविष्यपत्रिका निवडण्यास सांगतो. पोपट त्यापैकी एक चोचीने निवडतो व ज्योतिषी ती वाचून दाखवतो व 50-100 रुपये कमवतो. पोपटाला तुमची रास कळते, त्याला तुमचे भविष्य कळते, यावर लोकांचाही विश्वास असतो. भटक्यांमधली एक जमात अशी आहे की, गाढवे ही त्यांची संपत्ती मानली जाते. लग्नाच्या वेळी मुलगी देताना मुलाकडे किती गाढवं आहेत, हे विचारले जाते. ते गाढवांच्या मदतीने शेतीची, रस्त्याची कामे करतात. माती, रेती, दगड पोत्यात भरून गाढवावर ठेवून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी घेऊन जात असतात व पोटासाठी दोन पैसे कमवीत असतात. फासेपारधी जाळी घेऊन जंगलात जाऊन पाखरांना जाळ्यात पकडून बाजारात जाऊन विकत असतात. पूर्वी गावोगावी कैकाडी बाया ‘सुया घ्या, पोत घ्या, फणी घ्या’ अशी बोंब मारीत विकायच्या. आता त्यांचा तो धंदा बंद झालाय. डोंबारी समाज आजही खेड्यांमध्येही व शहरात कसरतीचे खेळ करीत फिरत असतात.

लोकसभेच्या निवडणुका आल्यात. त्या वेळी नकारात्मक मतदान राज्यातील सर्व भटक्या जाती-जमातींचे लोक करणार असल्याचे प्रा. मोतीराज राठोड यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या मूलभूत मागण्या आहेत की, आम्हीही या देशाचे नागरिक असल्याने आमची जनगणना झाली पाहिजे, मतदार यादीत नाव आले पाहिजे, आम्हाला रेशनिंग कार्ड, मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. जी मुले शिकलीत त्यांना नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत. भटक्यांना त्यांची मातृभाषा विचारली तर सांगता येत नाही. व्यवहारासाठी मराठीत बोलतात. परंतु महाराष्ट्रीय असूनही मराठी त्यांची मातृभाषा नाही. मराठीच्या भवितव्याची चिंता करणार्‍यांनी भटक्यांच्या मातृभाषेकडे जरा बघावे.

सर्व भटक्यांमध्ये पाच टक्केही श्रीमंत लोक नाहीत. शासनाने कोणत्या निकषावर त्यांच्यावर क्रिमीलेअरची जाचक अट लावली आहे, हे तर कळण्यापलीकडचे आहे. ही अट रद्द करण्याची त्यांची मागणी आहे. हा समाज गरीबच असल्याने त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करायला हवी. भटक्यांचेही एक विकास महामंडळ असावे. इतर सर्व मागासवर्गीयांना (एससी, एसटी, ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण आहे. ते आरक्षण आम्हालाही मिळायला हवे. सरकारने 2005मध्ये भटक्या-विमुक्तांचा अभ्यास करण्यासाठी बाळकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगाची नेमणूक केली होती. त्या रेणके आयोगाने आपला अहवाल 2008मध्ये शासनाला सादर केला. अजूनपर्यंत तो आयोग लागू केलेला नाही. त्यासाठी भटके बांधव पाच-सहा वर्षे शासनाशी भांडत आहेत. शासनाने त्यांच्या मागण्यांचा विचार करायलाच हवा. त्यांनाही माणूस म्हणून जगू द्या!