आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhagwanrao Deshpande Artical On Swami Ramanand Tirtha

कर्मप्रवण स्वामी रामानंद तीर्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वामी रामानंद तीर्थ यांची 22 जानेवारी ही पुण्यतिथी. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रेरक सेनानी, हैदराबाद राज्याच्या भाषिक विभाजनाचे प्रवर्तक व महाराष्‍ट्र राज्याच्या निर्मितीचे एक शिल्पकार, अशी स्वामीजींची मोलाची कामगिरी आहे. हैदराबाद राज्यातील मराठी, तेलुगू व कन्नड अशा भिन्न भाषिकांना एकत्र आणून समान ध्येयाची प्रेरणा देण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले आहे. ते अपूर्व आहे. हैदराबाद संस्थानाचे भारताच्या नकाशातून उच्चाटन झाले. हैदराबादचा इतिहास व भूगोलही त्यांनी बदलून दाखवला. मात्र, आज राज्यकर्त्यांसहित जनतेला या ऐतिहासिक कार्याचा व स्वामीजींचा विसर पडलेला दिसून येतो याचे दु:ख होते.
हैदराबाद संस्थानाचा प्रश्न संपूर्ण देशाच्या दृष्टीने अत्यंत नाजूक व महत्त्वाचा होता. ब्रिटिशांनी भारताची सत्ता सोडली की, जुन्या करारानुसार संस्थाने आपोआपच स्वतंत्र व सार्वभौम ठरणार होती. निझामाने हैदराबाद संस्थान स्वतंत्र व सार्वभौम जाहीर केले. ब्रिटिशांचे त्रिमंत्री मंडळ भारतात आले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याची योजना जाहीर केली. भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्‍ट्रे निर्माण करण्याची ही योजना होती. भारतातील संस्थानिकांना या दोन्हीपैकी एका देशात सामील होण्याचे अथवा स्वतंत्र राहण्याचे स्वातंत्र्य या योजनेमध्ये होते. संस्थानांवर असलेली अधिसत्ता ब्रिटिशांनी काढून घेतली; परंतु ही अधिसत्ता ब्रिटिशांनी भारत सरकारला बहाल केली नाही. याचाच फायदा घेऊन निझामाने 11 जून 1947 च्या आपल्या फर्मानाने हैदराबादचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व जाहीर केले. भारताच्या मध्यामध्ये एक स्वतंत्र राष्‍ट्र निर्माण होऊ घातले होते. त्याचा भारताच्या स्वातंत्र्याला व पूर्णत्वाला धोका होता. हैदराबाद स्टेट काँग्रेससमोर व स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासमोर हे एक मोठे आव्हान होते. स्वामीजींच्या कणखर नेतृत्वाने हे आव्हान स्वीकारले. हैदराबादचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व 11 जून रोजी जाहीर करण्यात आले व लागलीच 17, 18, 19 जून 1947 रोजी हैदराबाद स्टेट काँगे्रसचे हैदराबाद येथे अधिवेशन झाले. स्वामीजीच या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. स्वामी रामानंद तीर्थ यांचे त्या वेळचे भाषण ऐतिहासिक ठरले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये एक घोषणा केली ती म्हणजे, ‘हैदराबाद हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. तो हिंदुस्थानात विलीन झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’ ही घोषणा एका विद्युल्लतेप्रमाणे हैदराबाद संस्थानभर पसरली आणि सत्याग्रहाचा व साराबंदीच्या बहिष्काराचा, जंगल सत्याग्रहाचा व सशस्त्र लढ्याचा एक वणवा पेटला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या या भाषणाने हैदराबादच्या लढ्याला अखिल भारतीय संदर्भ दिला.
हैदराबादचे विभाजन करून संयुक्त महाराष्‍ट्र, विशाल आंध्र व संयुक्त कर्नाटक अशी राज्ये निर्माण करावीत, अशी स्वामीजींची धारणा होती. पं. नेहरूंचा हैदराबादच्या विभाजनाला विरोध होता. दरबनी संस्कृतीच्या एक मिश्र भाषिक राज्याचा प्रयोग या दृष्टीने ते हैदराबादकडे पाहत होते. अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन 1953 मध्ये हैदराबादला झाले. स्वामी रामानंद तीर्थ हे स्वागताध्यक्ष होते. स्वामीजींनी आपल्या भाषणामध्ये हैदराबादच्या विभाजनाचा प्रश्न मांडू नये, असे पं. नेहरूंना वाटत होते; परंतु स्वामीजींनी तोच प्रश्न मोठ्या आग्रहाने मांडला. पं. नेहरू नाराज झाले व प्रथा सोडून स्वामीजींना कार्यकारिणीमध्येसुद्धा घेतले नाही. स्वामीजींनी हा मुद्दा मांडला नसता तर कदाचित ते अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले असते. मानमरातबाच्या दृष्टीने पं. नेहरूंची मर्जी सांभाळणे महत्त्वाचे होते; परंतु स्वामीजींनी जनतेची इच्छा प्रमाण मानली. विदर्भवाद्यांची वेगळ्या विदर्भाची मागणी मराठी भाषिक राज्यासाठी अडचणीची झालेली होती, म्हणून स्वामीजींनी नागपूरला विदर्भातल्या नेत्यांशी शंकरराव देव यांच्यासमवेत व बॅ. रामराव देशमुख यांच्याशी चर्चा करून विदर्भ व मराठवाडा यांना संरक्षण देण्याचा ठराव केला. तोच पुढे ‘नागपूर करार’ म्हणून प्रसिद्ध झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या या प्रयत्नांमुळे ते संयुक्त महाराष्‍ट्राच्या शिल्पकारांपैकी एक आहेत, असेही म्हणायला हरकत नाही.
हैदराबादचे विभाजन झाले नसते तर मुंबईसह संयुक्त महाराष्‍ट्र अस्तित्वात येऊच शकला नसता याकडे दुर्लक्ष होते, याची खंत वाटते. स्वामी रामानंद तीर्थ यांना शिक्षणाविषयी विलक्षण तळमळ होती. हिप्परग्याच्या संस्थेमध्ये व नंतर अंबाजोगाईच्या शिक्षण संस्थेमध्ये कार्य करत असताना स्वातंत्र्यप्राप्तीच्या आकांक्षेने प्रेरित झालेली युवकांची फौज तयार करण्याचे त्यांचे ध्येय होते, तर नांदेडला पीपल्स कॉलेज काढताना स्वामी रामानंद तीर्थ यांची दृष्टी नवभारताच्या उभारणीसाठी नवी पिढी तयार करण्याची होती. अशा या कर्मप्रवण व निरपेक्ष वृत्तीच्या महनीय व्यक्तीला शतश: प्रणाम.