आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पं. नेहरू यांचा वारसा : एक स्मरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज नेहरू जयंती. देशभर निरनिराळ्या पद्धतीने नेहरूंचे केवळ स्मरण होत असलेले दिसेल. आज देशात राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत सर्वत्र गोंधळलेली व अगतिकतेची परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते. या ढासळलेल्या व घसरत चाललेल्या परिस्थितीमध्ये नेहरूंच्या विचारांची प्रासंगिकता व त्यांचा वारसा यांचा विचार होणे महत्त्वाचे ठरते. नेहरूंचे जीवन व नवभारताची घडण हे दोन्ही अविभाज्य आहेत. भारतासारख्या विशाल, पुरातन व वैविध्याच्या देशाचे नेहरूंच्या संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी तत्त्वांच्या आधारे नेतृत्व दीर्घकाळ लाभले त्यातून आधुनिक भारताची घडण तयार झाली. एम. जे. अकबर आपल्या नेहरूंसंबंधीच्या पुस्तकामध्ये म्हणतात की, भारतात सम्राट अशोक, सम्राट अकबर व पं. नेहरू या तीनच महान विभूती होऊन गेल्या.
नेहरू एक आदर्श राजकारणी व महान मुत्सद्दी होते. याशिवाय ते एक उत्तम संसदपटूही होते. पं. नेहरू भारताचे महान सुपुत्र जसे आहेत, तसेच जगाचेही महान सुपुत्र आहेत. कारण आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील देशांच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीचे त्यांचे कार्य फार मोलाचे ठरलेले आहे. 1947 मध्ये आशियाची सबंध परिषद त्यांनी आयोजित केली होती. यामध्ये आशिया खंडातील सार्वभौम व वसाहतीतील सार्वभौम न झालेल्या राष्‍ट्रांचे प्रतिनिधी हजर होते व यातून वसाहतवादाविरोधी एक नवी दिशा निर्माण झाली. यातूनच पुढे अलिप्तता राष्‍ट्राची एक संघटना उभी राहिली. राष्‍ट्रा-राष्‍ट्रातील संबंधाविषयी एक पंचशील सिद्धांत हे नेहरूंचे फलित आहे. अलिप्तता देशाच्या चळवळीतून परस्पर संवाद-साहचर्य, विकास ही आंतरराष्‍ट्रीय संबंधांची दिशा निश्चित झाली. आंतरराष्ट्रीय सहकार्य व आंतरराष्ट्रीय शांतता हा नेहरूंचा ध्यास होता. त्यांचे हे योगदान सा-या जगाने मान्य केलेले आहे.
नेहरूंनी देशाचे स्वातंत्र्य देशातील जनतेच्या आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले. बेकारीचे उच्चाटन, दारिद्र्य-अज्ञानाचे निर्मूलन व जनतेच्या राहणीमानाची चिंता इत्यादी आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रश्नांना अग्रक्रम देण्याचा नेहरूंचा आग्रह होता. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या मध्यरात्री घटना समितीच्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी याच गोष्टीचा पुनरुच्चार केलेला आहे.
काँग्रेसच्या 1929 च्या लाहोर अधिवेशनात त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली त्याच वेळी जनतेच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी समाजवादाची गरज असल्याचेही नमूद केलेले आहे. त्यानंतर 1936 मध्ये फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अजून स्पष्टतेने व विस्ताराने समाजवादी आदर्शांचा आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये पाठपुरावा केला. नेहरूंनी 1927 ते 1939 या काळामध्ये विविध विद्यार्थी, युवक आणि प्रांतिक परिषदांमधून संपूर्ण स्वातंत्र्य व समाजवाद याचा एकत्रितपणे पुरस्कार केल्याचे दिसून येते. पुढे नेहरूंनी समाजवादी व्यवस्थेसाठी मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडली. देशातील महत्त्वाचे उद्योग सार्वजनिक स्वरुपाचे व खासगी उद्योग क्षेत्र व सार्वजनिक क्षेत्र या दोघांमधील सुयोग्य सहकार्याने औद्योगिक भरभराट ही त्यामागची भूमिका होती, परंतु खासगी उद्योग पंचवार्षिक योजनेतील आर्थिक विकासाच्या योजनेच्या अंतर्गत राहूनच वाटचाल करतील, अशी शिस्त खासगी उद्योगांना राहील अशी मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना होती, परंतु आज जागतिकीकरणाच्या रेट्याखाली ही संकल्पना मोडीत काढली जात आहे.
1955 मध्ये काँग्रेसच्या आवडी अधिवेशनामध्ये व पुढे संसदेमध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचा ठराव मंजूर झाला. त्या अनुषंगानेच 1956 च्या औद्योगिक धोरणाचा ठराव होता. केवळ शासकीय ठरावाने समाजवादी प्रक्रिया सक्रिय होणार नाही याची जाणीव नेहरूंना होती. जनतेला त्यांना बरोबर घ्यायचे होते. 1963 मध्ये भुवनेश्वर येथे नेहरूंनी आपल्या शेवटच्या अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचे कार्य केले.
काँग्रेस पक्षाच्या घटनेतील कलम 1 आज अजूनही अस्तित्वात आहे. यामध्ये देशांतर्गत ध्येय व जागतिक स्तरावरील ध्येय व त्याच्या परिपूर्तीची संकल्पना अभिप्रेत आहे. खेदाची गोष्ट ही की आज किती काँग्रेसजनांना आपल्या पक्षाच्या घटनेतील ध्येयाचे स्मरण आहे.
धर्मनिरपेक्षता हा नेहरूंनी आपल्या देशाला दिलेला महत्त्वाचा वारसा आहे. विविध धर्मांच्या आपल्या देशामध्ये कोणत्याही एका धर्माचे प्राबल्य अथवा प्रभुत्व हे लोकशाहीला व समाजवादाला मान्य होण्यासारखे नाही. विविध धर्मीय देशांमध्ये सर्व धर्मांना समान वागणूक, सर्व धर्मांचा आदर, धार्मिक संघर्षाचा अभाव आणि सर्व धर्मांतील एकतेचे समान मुद्दे म्हणजेच धर्मनिरपेक्षता अशी नेहरूंची धारणा होती. सत्तेमध्ये येण्याआधी व सत्तेमध्ये असताना नेहरूंनी या तत्त्वाचा हिरिरीने पुरस्कार केलेला आहे. धर्मनिरपेक्षता देशभक्तीच्या रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे हे नेहरूंनी आपल्या धोरणातून, आचरणातून दाखवून दिले आहे, परंतु आज देशभक्ती अथवा राष्‍ट्रीयतेच्या
बळावर धार्मिक उग्र अहंकार राजकीय स्वार्थासाठी उघडपणे व्यक्त केला जात आहे तेव्हा नेहरूंचे स्मरण झाल्याशिवाय राहवत नाही. उग्र धार्मिकतेने राष्‍ट्रीय एकात्मतेचा धोका निर्माण होऊ लागल्यानेच त्यांनी राष्‍ट्रीय एकात्मता सर्वपक्षीय परिषद स्थापन केली.
विज्ञान व तंत्रज्ञानसंबंधी नेहरूंचे योगदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय त्यांचे स्मरण अपूर्णच आहे. वैज्ञानिक प्रगतीच्या काळात आधुनिक भारताची उभारणी गरजेचे असल्याचे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी अनेक वैज्ञानिक संस्था निर्माण केल्या. प्रगत तंत्रज्ञानाच्या संस्था निर्माण करण्यासाठी सोव्हिएत युनियनचे सहकार्य घेतले. भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी अनेक प्रकल्प हाती घेतले. देशामधील जनतेच्या अंधश्रद्धा व अज्ञानामुळे नेहरू विचलित होते. वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्सक दृष्टी प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे ते प्रतिपादन करीत असत.
दारिद्र्य व बेकारी, आर्थिक परावलंबन, जाती व धार्मिक संघर्ष, अंधश्रद्धा, धार्मिक उन्माद हे मानवतेचे शत्रू आहेत याची जाणीव ठेवल्याशिवाय नेहरूंचा वारसा सांगता येणार नाही. नेहरूंचा पुरोगामी वारसा विस्मरणात जावा यासाठीच आज नेहरूंवर देशातील प्रतिगामी शक्ती चौफेर हल्ला चढवत आहेत हे वेळीच ओळखणे आवश्यक आहे. त्यासाठीच नेहरू व त्यांचा वारसा याचे स्मरण आज महत्त्वाचे आहे.