आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविनाशी कार्याचा गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामाजिक कामाचा वसा घेऊन विविध क्षेत्रांत अनेक व्यक्ती व संस्था कार्य करीत आहेत. जळगावातील सामाजिक कामाचा विचार करताना, डॉ. अविनाश आचार्य यांचे नाव वगळून पुढे जाता येणार नाही. आर्थिक क्षेत्रातील जळगाव जनता बँकेपासून ते वृद्धाश्रमासारख्या सामाजिक संस्थेपर्यंत सेवेच्या कामाची साखळी डॉ. आचार्यांनी उभी केली. समाज परिवर्तनाच्या दिंडीत सहभागी असणा-यांना पाठबळ व प्रेरणा मिळायला हवी आणि त्यासाठी त्यांचे काम समाजासमोर यायला हवे. याच हेतूने केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने राज्यस्तरीय डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार घोषित करण्यात आले. संस्थेसाठी 1 लाख 1 हजार व मानपत्र व व्यक्तीसाठी रुपये 51 हजार व मानपत्र असलेल्या या पहिल्या पुरस्काराची मानकरी संस्था आहे अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ आणि व्यक्ती आहे मुंबईतील विजय जाधव.
स्नेहालय या संस्थेने आपले कार्यक्षेत्र ठरवले आहे, ते बाजारू लैंगिक शोषणाच्या बळी महिला, त्यांची वंचित बालके, एच.आय.व्ही., एड्सग्रस्त महिला-मुले, अत्याचार पीडित स्त्रिया, कुमारी माता, झोपटपट्टीतील हक्क वंचित मुले, अनौरस बालके. या संस्थेचे केंद्र अहमदनगर असले तरीही लाभार्थी संपूर्ण देशभरातून येत असतात. स्त्रिया व लहान मुले यांना मदत करता यावी यासाठी स्नेहालयने 1996 मध्ये एक हेल्पलाइन (चाइल्ड लाइन) सुरू केली. भारतात चालणा-या 92 शहरांतील या प्रकल्पामध्ये स्नेहालयमार्फत चालणारी चाइल्ड लाइन ही सर्वात परिणामकारी मानली जाते. अहमदनगरमध्ये 17 घोषित, तर 14 अघोषित झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांतील 900 बालकांना प्राथमिक शिक्षणाची संधी स्नेहालयच्या बालभवनाने दिली. वेश्या व्यवसायातील मुलींची सुटका करण्यापासून ते एच.आय.व्ही. / एड्सबाधित रुग्णांना स्नेहालयाच्या स्पृहा केंद्रात मोफत उपचार व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. युवकांना वाममार्गाला जाऊ नका, असा उपदेश देण्याऐवजी त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी मागील काही वर्षांपासून स्नेहालयतर्फे माहिती - तंत्रज्ञान विषयाचे तीन अभ्यासक्रमदेखील चालवले जातात. सामाजिकदृष्ट्या पीडित असलेल्या महिलांनादेखील स्नेहालयने आवाज दिला. या महिलांच्या मदतीने ‘कम्युनिटी रेडिओ’ सुरू करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांचा पुढील टप्पा म्हणून एच.आय.व्ही. बाधित परिवारांच्या कौटुंबिक पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी नगरजवळच 30 एकर जागेत भारतातील पहिला ‘हिंमत ग्राम प्रकल्प’ उभा करण्याचे काम सुरू झाले आहे. आज स्नेहालय पुनर्वसन,स्नेहाकंवर, बालभवन, स्नेहज्योत, चाइल्ड लाइन, कम्युनिटी सेंटर अशा 17 विविध प्रकल्पांच्या माध्यमातून स्नेहालय परिवारात सुमारे 4 हजार सदस्य काम करत आहेत. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे बोधवाक्य घेऊन काम करणा-या स्नेहालयचा हा वटवृक्ष ‘सत्यमेव जयते’सारख्या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मानाचे स्थान मिळवत देशातील सामाजिक संस्थांचा मार्गदर्शक बनला आहे.
मुंबई शहरात दर दिवशी सुमारे 100 ते 150 मुले रेल्वे प्लॅटफॉर्मवर देशभराच्या विविध कानाकोप-यातून येत असतात. कोणी घरात आई, बाबा रागावले म्हणून चिडून घर सोडून पळालेले असतात, काहींवर स्थानिक ठिकाणी किरकोळ गुन्हा दाखल झालेला असतो, तर काहींना मुंबईच्या चित्रपटनगरीचे आकर्षण असते. तेथे आल्यानंतर त्यांना वास्तवाची खरी जाणीव होते, पण त्याला बराच उशीर झालेला असतो.
बालपण हरवलेल्या, कोणत्या तरी लहान कारणामुळे घर सोडून पळून आलेल्या 7 ते 14 वयोगटातील मुलांशी विजय जाधवांचा संबंध आला आणि चुकून घरापासून लांब एका काळोख्या भविष्याकडे प्रवास करणा-या त्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरी वा ते न सापडल्यास तितक्याच सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा वसा त्यांनी घेतला. सुरुवातीच्या काळात कामाचे स्वरूप वेगळे असल्याने एकट्यानेच काम करावे लागले. जशी कामाची व्याप्ती वाढू लागली तसे अधिक लोक जोडले गेले. कामाचे स्वरूप बदलत गेले. बराच काळ प्लॅटफॉर्मवरच्या जगण्यात गेला असल्याने लागलेल्या सवयी बदलण्यासाठी मन परिवर्तन शिबिरासारखे यशस्वी प्रयोग सुरू झाले. 45 दिवसांच्या या शिबिराच्या माध्यमातून रेल्वेस्टेशनवरील संस्कार बदलवण्याचे काम केले जाते. नियमित व्यायाम, योगाभ्यास, वैयक्तिक स्वच्छतेसंबंधी माहिती यांसारख्या शरीराला निरोगी करणा-या दिनक्रमाबरोबरच पक्षीनिरीक्षण, आकाशदर्शनसारख्या कार्यक्रमातून मुलांचे विश्व मोठे आणि निखळ करण्याचा प्रयत्न केला जातो. या कालावधीतच त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलत त्यांच्या घरची माहिती काढली जाते. शिबिर समाप्तीपर्यंत त्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना शिबिराच्या शेवटच्या दिवशी त्या मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले जाते. आतापर्यंत सुमारे 1600 पेक्षा जास्त मुलांना ‘समतोल’ने सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. आज समतोल फाउंडेशनचे काम मुंबई, ठाणे शहरात स्थिरावले असले तरी अनेक मोठी जंक्शन असलेल्या प्लॅटफॉर्मवरदेखील बरीच मुले अशा विजय जाधवच्या प्रतीक्षेत आहेत.