आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थी दशेत अनुभवशिदोरी मोलाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ - रेवती खूप चांगली टेनिस खेळाडू होती. आपल्या वयोगटात तिने दोन वर्षे राज्य अजिंक्यपद मिळवले होते आणि राष्ट्रीय स्पर्धांतही तिचा क्रमांक बराच वरचा आला होता. तिची आई आणि ती एकदा मला भेटायला आल्या. दोघींचेही चेहरे उतरलेले होते. काही दिवस सामनेही झालेले नव्हते. मग एकदम काय झाले असावे? नुकतीच तिची शाळेतली परीक्षा झाली होती आणि तिचा क्रमांक १२ वा आला होता. तिच्या आईचे म्हणणे असे की, आतापर्यंत ती नेहमीच पहिली किंवा दुसरी असे. आणि आता एकदम खालचा क्रमांक आल्यामुळे तिच्यावर खूप दडपण आले होते. दडपण तिच्या आईवरच जास्त आले होते. आता मैत्रिणी आणि नातेवाईक काय म्हणतील याची तिला काळजी पडली होती.
आईचा मूड गेलेला असल्यामुळे रेवतीही अस्वस्थ होती. शेवटच्या दोन पेपरच्या वेळी तिला जोरदार ताप आला होता, अशक्तपणाही खूप होता. त्यामुळे तिला ते दोन पेपर नीट सोडवता आले नव्हते. त्याबरोबरच आणखी एका पेपरमध्येही कमी मार्क पडले होते. यंदाचे तिचे दहावीचे वर्ष होते. तिच्या टेनिसच्या खेळात ती जास्त वेळ घालवत असल्याचे तिच्या वर्गशिक्षिकेचे मत होते. नातेवाइकांच्या मते तर तिने आता खेळ सोडून देणेच योग्य ठरले असते. तिच्या वडिलांनाही तसेच वाटत होते. सुरुवातीला तिचे पालक तिला माझ्याकडे घेऊन आले तेव्हा तिघांनीही मला सांगितले होते की, तिने टेनिसमध्येच करिअर करायचे ठरवले होते म्हणून वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत अभ्यास वेळच्या वेळी करायचा आणि उरलेला सारा वेळ खेळाला द्यायचा, असे त्यांचे ठरले होते. तिच्या खेळातल्या प्रगतीकडे पाहून मला हा निर्णय योग्य आहे, असे वाटले होते.
आपल्या समाजात असे चाकोरीबाहेरचे कोणी वागलेले इतरांना आवडत नाही. मुलगी हुशार आहे. तिला डॉक्टर किंवा इंजिनिअर करायचे सोडून हे टेनिसचे खूळ काय काढले आहे, असेच सर्व नातेवाईक म्हणत राहिले. वर्गातल्या मैत्रिणी सगळ्या सायन्सला जाण्याच्या प्रयत्नात होत्या आणि ही मात्र खेळासाठी कला विभागात प्रवेश घेणार होती.
शिक्षिकांना तर तिचा खेळ बंदच पाडायचा होता. हा सगळा ताण तिच्या वडिलांना सहन झाला नाही. त्यांनी तिला सांगून टाकले होते की आता खेळ पुरे. परीक्षेपर्यंत अभ्यासाला लाग. रेवतीला शैक्षणिक करिअरमध्ये मुळीच रस नव्हता, पण आई-वडिलांच्या आग्रहाने तिने अनिच्छेनेच खेळ थांबवला आणि दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवले. निकाल कळल्यावर तिचे पालक आणि ती पेढे द्यायला आले. तिला परत खेळ सुरू करायचा होता, पण आता वडील ऐकायला तयार नव्हते. तिला सायन्सला घालण्यात आले आणि १२ वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळूनसुद्धा हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. तिने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. मग बीएस्सी करून ती एमबीए करते आहे. तिला ना धड टेनिस खेळता आले ना शैक्षणिक क्षेत्रातही काही करता आले. पुढे काय करायचे ते काहीच ठरलेले नव्हते. सर्वजण इंजिनिअर किंवा डॉक्टर होतात म्हणून तिनेसुद्धा तसेच व्हावे असे तिच्या वडिलांचे म्हणणे पडले. अजूनही ती भेटली की टेनिसबद्दल भरभरून बोलते, पण आयुष्याबद्दल ती निराशच झाली आहे.
असे अनेक तरुण, तरुणी मला माहीत आहेत. शेवरीच्या कापसाच्या म्हाताऱ्या वाऱ्यावर उडत असतात ना तसे त्यांचे आयुष्य असते. भविष्याबद्दल काहीच ठरलेले नसते. त्या म्हाताऱ्या जशा जिथे जाऊन पडतील तिथे रुजायचा प्रयत्न करतात, तशीच यांची धडपड चाललेली असते. त्यांच्या पालकांच्या मनावर मित्र-मैत्रिणी आणि नातेवाइकांच्या मताचे दडपण असते. एक-दोन मार्क कमी पडले की लगेच मुलांना पालकांची बोलणी खावी लागतात. त्यांचे छंद, कला, खेळ, मित्र-मैत्रिणी या सगळ्यांसाठी त्यांना वेळच मिळत नाही. नुसत्या पुस्तकी ज्ञानात पारंगत होऊन भागत नसते. त्यांचे व्यक्तिमत्त्व घडावे लागते. चार लोकांत मिसळणे, त्यांच्याशी संवाद साधणे, गटामध्ये आपल्याला मिळालेली भूमिका निभावणे यापैकी काहीच पुस्तकातून शिकता येत नसते. मुख्य म्हणजे आयुष्यात जे करावेसे वाटत असते, ज्याची अगदी आतून ओढ असते ते करायलाच
मिळत नाही.
खरे तर मुलांचे शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचा सहवास हा पालकांसाठी अत्यंत आनंददायक असतो. त्या काळात त्यांच्याबरोबर जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालवायचा असतो. चांगले ग्रंथ वाचायचे, चांगले विचार ऐकायचे, थोर व्यक्तींचा सहवास मिळेल तेवढा घ्यायचा, जे चांगले घडत असेल त्याचा आदर आणि सत्कार करायचा हा सगळा कौटुंबिक कार्यक्रम व्हायला हवा. माझी दोन्ही मुले लहान असताना माझी बाबा आमटे यांच्याशी भेट झाली. शक्य असेल तेव्हा आम्ही आनंदवन किंवा हेमलकसाला जात असू. तिथल्या वातावरणाचा, बाबांच्या विचारांचा उत्तम संस्कार आमच्या सर्वांच्याच मनावर झाला. माझ्या मुलांना त्याचा खूप फायदा झाला. त्यांच्या सामाजिक जाणिवा जाग्या राहिल्या. फक्त आपलाच विचार करून भागत नसते हेही त्यांना उमगले. याबरोबरच आमची आपसातली नाती जास्त घट्ट झाली. अजूनही सहवासाची ओढ सर्वांनाच वाटते. जेवढे दिवस एकत्र घालवता येतील तेवढे खूप आनंदात जातात. हा आनंदाचा ठेवा मुलांवर बालपणात केलेल्या संस्कारांनी मिळत असतो. त्यावर सर्वांचाच अधिकार आहे. मात्र तो प्रयत्नांनी मिळवावा लागतो. ते प्रयत्नसुद्धा खूप आनंददायी असतात. हा अनुभव घ्यायलाच हवा.
बातम्या आणखी आहेत...