आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक काय म्हणतील ही कसोटी योग्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालक जन्माला आल्याबरोबर टाहो फोडून रडते. गर्भात असताना त्याचे जग स्वतःपुरतेच सीमित असते. बाहेर आल्याबरोबर निरनिराळ्या गोष्टी दिसायला लागतात. अनेक आवाज कानावर पडायला लागतात. स्पर्शाची जाणीव होते. भूक लागायला लागते. मग जवळ असलेल्या माणसांचा परिचय व्हायला लागतो. आपल्या जवळ असलेले दुसरे अस्त्र ते बाहेर काढते. ते म्हणजे त्याचे मोहवून टाकणारे हास्य. आता हसणे आणि रडणे या दोन अस्त्रांनी ते साऱ्या घरावर हुकूमत चालवायला लागते. घरातले सर्वच आपापल्या परीने त्याचे लाड करत असतात. नंतर ध्यानात यायला लागते की आपल्याला हवी असणारी माणसे सतत आपल्या जवळ नसतात. त्यांचा सहवास जसा आवडायला लागतो तशी ती नसताना एकटेपणाची जाणीव होते. भयाची भावना मनाचा कब्जा घेते. वयाची पहिली कितीतरी वर्षे मनातली प्रधान भावना भय हीच असते.
जरा मोठे झाले की त्या बालकाला शाळेत पाठवण्यात येते. बाहेरचे जग आपल्याला अनुकूल नाही हे समजायला लागते. येथे हसण्या आणि रडण्याचा फारसा उपयोग होत नाही हेही उमजते. मग त्या वातावरणाची सवय झाल्यावर शिक्षक आणि मित्र-मैत्रिणी यांचे महत्त्व कळायला लागते. घरची शिस्त आणि शाळेतली शिस्त कितीही आवडत नसली तरी पाळावीच लागते. खेळांची आवड उपजतच असते. क्रीडांगणावर गेल्यानंतर नियम पाळूनच आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावे लागते. घरी आईवडील कितीही लाड करीत असले आणि आपण हट्ट पुरवून सगळी बक्षिसे देत असलो तरी बाहेर तसे होत नाही हेपण अनुभवाने पटवून घ्यावे लागते.
आपले घर, आपले कुटुंब यांच्यापेक्षा बाहेरचे जग अगदीच वेगळे असते. तिथे मैत्रीचे संबंध जोडणे आणि टिकवणे अत्यंत आवश्यक असते; पण त्याकरता तडजोडी कराव्या लागतात. स्पर्धा तर कुटुंबातही असतेच पण बाहेर ती जास्त प्रकर्षाने जाणवते. या तीन स्तरांवर जगायचे असते आणि तीनही स्तरांत यशस्वी व्हायचे असते. स्वतःचा विकास, आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि समाजातले आपले स्थान या तीन क्षेत्रांत असंख्य भूमिका वाट्याला येतात. त्या पार पाडण्यासाठी सततची कसरत करत जगावे लागते. हव्या असलेल्या फार थोड्या गोष्टी हाताला लागतात व अनेक निसटून जातात किंवा सोडून द्याव्या लागतात.
आयुष्यातली पहिली तीन तपे म्हणजे ३६ वर्षे आपल्याला कर्तबगारीसाठी दिलेली असतात. त्यातली पहिली २४/२५ वर्षे आपण पूर्णपणे परावलंबी असतो. स्वतः कमवायला लागेपर्यंत आईवडील ठरवतील तेच करावे लागते. कारण खर्चाला पैसा ते पुरवणार असतात. तसे पहिले तर माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे परावलंबित्व पूर्णपणे नाहीसे कधीच होत नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधान अगदी हुकूमशहा जरी झाला तरी सगळे त्याच्या मनासारखे घडू शकतच नाही. फार थोडे हुकूमशहा आणि तेही फारच थोड्या काळासाठी यशस्वी झाले आहेत. बालपणी आणि पुढे मोठेपणीसुद्धा आपल्यावर कोणते संस्कार होतात आणि त्यातले आपण कोणते स्वीकारतो याच्यावर आपले व्यक्तिमत्त्व अवलंबून असते. पालकांनी फाजील लाड केले तर जग हे आपल्याला सुखात ठेवण्यासाठी आहे, असा गैरसमज होतो. तो बाहेर फटके खाऊनसुद्धा दूर करण्याचे शहाणपण आपल्यात आले नाही तर आयुष्य म्हणजे एक कधी न संपणारी दीर्घ मुदतीची शिक्षा होऊन बसते.
आयुष्य हे सुखासाठी नसते तसेच दुःखासाठीही नसते. ते असते आनंदासाठी. आणि तो तर एकट्यासाठी कधीच नसतो. आपला स्वार्थ हा चैनीसाठी नव्हे तर आपल्या विकासासाठी जोपासायचा असतो. त्यानंतर आपल्या कुटुंबाचा आनंद येतो. आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती आपल्यावर लादल्या गेलेल्या नसून त्या सहज लाभलेल्या आहेत. त्यापैकी वडीलधाऱ्या व्यक्तींकडून त्यांचे चांगले संस्कार घेऊन आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आपली असते. त्यातच पालकत्वसुद्धा येते. लहानपणी नुसते लाड करून वाढवलेले मूल मोठेपणी आपोआप चांगले वागायला लागेल, असे समजणे याच्याएवढा मूर्खपणा दुसरा नाही. त्याला समाजात जगायला लायक बनवणे, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास योग्य होईल हे पाहणे आणि मुख्य म्हणजे इतरांचा विचार करायला शिकवणे हे अतिशय गरजेचे आहे. स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास योग्य व्हावा ही जबाबदारी समजलेल्या व्यक्तीला आपण निवडलेल्या व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होणे सहज साधू शकते. आपल्या वर्तनाबद्दल कुटुंबातल्या लोकांना आणि समाजातल्या लोकांना काय वाटेल याचा विचार निर्णय घेताना करायचा असतो. म्हणजे नंतर पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही.
माणसाने वैयक्तिक विकास साधण्यासाठी अगदी संन्यास जरी घेतला तरी त्याला समाजातच राहायचे असते. समाजाचे प्रचलित नियम तोडून वागले तर समाज व्यवस्थित जगू देणार नाही. यासाठीच अष्टांग योगामध्ये यम म्हणजे समाजात कसे वागायचे हा भाग सर्वात आधी येतो. तसे वागले नाही तर इतर जसे त्या व्यक्तीवर रुष्ट होतात तसाच त्याच्या मानसिक अवस्थेवर आणि एकाग्रतेवरही परिणाम होऊ शकतो. अर्थात, समाजातल्या अनिष्ट रुढींवर जेव्हा हल्ला चढवायचा असेल तर समाजात टीकाच होणार आहे; पण त्याची तयारी ठेवूनच नंतर पावले उचलायची असतात. लोक काय म्हणतील याची कसोटी आवश्यक असली तरी जनहितार्थ ती मर्यादा ओलांडावी लागत असेल तर अवश्य ओलांडायची, पण स्वार्थाकरता कधीच नाही हे पथ्य पाळायलाच हवे. आपली कर्तबगारी आणि नंतरचे आयुष्यही समाजाच्या उपयोगी असावे हा विचार रुजला तर खरोखरच भारत संपूर्ण विश्वाला नेतृत्व देऊ शकेल.
क्रीडामानसशास्त्र अभ्यासक
bpbam.nasik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...