आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाचा समतोलच प्रगती साधेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या अगदी जवळच्या मित्राच्या वडिलांचे निधन झाले. हा मित्र तसा आनंदी स्वभावाचा, इतरांत मिसळणारा, समाजकार्याची आवड असणारा असा आहे. त्याचे वडील गेल्यानंतर जवळजवळ महिनाभराने आम्ही भेटलो. हातात एक पत्र घेऊन तो उदासवाणा बसलेला होता. डोळ्यांतून पाणी वाहत होते. आम्ही थोडा वेळ त्याच्याबरोबर स्वस्थ बसून राहिलो. मी त्याला म्हटले, आता शोक आवरायला हवा. किती दिवस उदास राहणार आहेस? त्यावर तो म्हणाला, मी दुःखातून सावरलो होतो, पण हे पत्र माझ्या सहीसाठी भावाच्या वकिलाकडून आलेले आहे.
अजून वाचले नाही मी, पण इस्टेटीच्या वाटणीसाठी आताच आमच्यात भांडणे लागली म्हणून वाईट वाटले. मी पत्र त्याच्या हातातून घेऊन वाचले. तेव्हा ते पत्र दुसऱ्याच एका प्रकरणाबद्दल निघाले. वडिलांच्या मृत्युपत्राचे वाचन झाले, तेव्हा तो भाऊ आपल्यावर अन्याय झाला आहे असे म्हणून नाराज झाला होता. त्यामुळे हे पत्रसुद्धा इस्टेटीसंबंधीच असावे असा ग्रह करून घेऊन माझा मित्र उदास झालेला होता. वडिलार्जित संपत्ती ही बहुतेक वेळा नातेवाइकांमध्ये, विशेषतः भावंडांमध्ये भांडणेच लावते. मी मित्राला सांगितले, तुम्हाला दोघांनाही या इस्टेटीची फारशी गरज नाही आहे. ज्या भावाने वडील हयात असताना अतिशय वाईट वागून त्यांना त्रास दिला, तो त्यांच्या मृत्यूनंतर चांगला वागेल अशी अपेक्षा बाळगणे भाबडेपणाचे ठरेल. पुढे प्रत्यक्ष नोटीस त्याच्याकडून आली तरी त्याची तयारी तुला ठेवायला हवी.

अर्थात, प्रकरण कोर्टात जाऊ नये आणि सर्व सामोपचाराने व्हावे यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यकच असते. कारण केवढीही मोठी इस्टेट असली तरी नातेसंबंध टिकणे जास्त महत्त्वाचे असते. हे खरे असले तरी प्रकरण न्यायालयात गेलेच तर विनाकारण उदास बसून राहण्यात काय अर्थ आहे?

आता ते पत्र न वाचताच ते इस्टेटीसंबंधात आहे, असा ग्रह करून घेऊन स्वतःचे मन दूषित होऊ देणे हे केव्हाही बरोबर नाही. इतरांनी कसे वागावे याबद्दल आपल्या मनात काही कल्पना असतात. त्यासुद्धा वास्तव काय आहे त्याची जाणीव न ठेवता आपण स्वीकारलेल्या असतात. आपल्या जवळच्या माणसांचेसुद्धा स्वभाव कसे आहेत याची आपल्याला चांगलीच माहिती असते आणि ती तशी असायला हवी. इतर कोणी आपल्या स्वभावाविरुद्ध वागले तरच आपल्याला धक्का बसायला हवा. पण वाईट माणसे वाईट वागली तर आपण शोकात बुडून जाणे केव्हाही अयोग्यच. कारण यामुळे कितीतरी वेळ वाया जातो आणि आपल्या कार्य करण्याच्या/निर्णय घेण्याच्या शक्तीवर याचा प्रतिकूल परिणाम होतो. एक खूणगाठ बांधायला हवी. वाईट गोष्टींचा शोक वाटणे हे सुसंस्कृत माणसाचे लक्षण असले तरी शोकातून ताबडतोब बाहेर येता येणे हे आपल्या व्यक्तिविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
चित्त प्रसन्न ठेवता येणे ही फार मोठी सिद्धी आहे. जग आपल्या मताप्रमाणे चालतच नसते, तरीही आपल्याला उत्तम कार्य करून दाखवायचे आहे, असा निश्चय करणारेच आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. तीव्र हर्ष-शोकाचे प्रसंग येतील तेव्हा तर जास्त सावध राहावे लागते. कारण आपले चित्त त्या प्रसंगात अडकून राहते आणि इतर गोष्टींचे भान राहत नाही. चुकीचे निर्णय यायला लागतात. प्रसन्नता म्हणजे नुसता हसरा चेहरा नव्हे, तर जे जे घडत असेल त्यावर सावध निर्णय घेता येणेसुद्धा आहे. वय वाढत जाते तसतशा जबाबदाऱ्या वाढत जातात आणि प्रसन्नता कमी होत जाते.

मला गुरुस्थानी असलेले एक वरिष्ठ अधिकारी याबाबतीत माझे आदर्श होते. मला त्यांच्यापासून खूप काही शिकायला मिळाले. ते फार मोठ्या पदावर होते. त्यांना आपण श्री. 'क' असे म्हणू. त्यांच्या खात्याचे प्रमुख अतिशय कर्तबगार अधिकारी म्हणून गाजलेले होते. त्यांच्यानंतर श्री. 'क' हेच त्यांची जागा घेणार हे जवळजवळ ठरलेले होते, पण ते बॉसला मुळीच आवडत नसत. आपल्याला आवडणाऱ्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याला आपल्या जागेवर नेमण्याची ते खटपट करत होते. श्री. 'क' यांचा ते दुस्वास करत. त्यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी ते सोडत नसत. त्यांच्या अशा वागण्याचे आम्हाला फार वाईट वाटे. आम्ही काही जण 'क' यांना बोलूनही दाखवत असू. पण ते म्हणत, त्यांचा स्वभावच असा आहे त्याला आपण कसे बदलू शकू? त्यांचे काम किती उत्तम आहे त्यावरच आपण लक्ष ठेवायचे आणि आपल्याला शिकता येईल तेवढे शिकायचे. बॉस कोण असावा ते ठरवणे आपल्या हातात नसते आणि मीच त्यांची जागा घ्यायला पाहिजे, असे तुम्हाला का वाटते? इतरसुद्धा अनेक जण नेतृत्व करू शकतील. जो कोणी नेमला जाईल त्याच्याबरोबर आपल्याला काम करता यायला हवे. मला कसेही वागवले गेले तरी चालेल आणि मुख्य जबाबदारी ते माझ्यावरच टाकत आहेत, हे काय कमी आहे?

आमच्या प्रार्थनांना यश आले म्हणून असेल, श्री 'क' यांचीच नेमणूक शासनाने केली. पहिल्या बॉसला निरोप देण्याचा समारंभ झाला. त्याला मी आवर्जून गेलो. त्या समारंभात श्री 'क' यांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केले. बॉसची मुक्तकंठाने अगदी मनापासून प्रशंसा केली आणि नंतरही बॉस ज्यांचे लाड करत असत त्या अधिकाऱ्यांना वगळून टाकण्याची चूक न करता त्यांना मानानेच वागवले आणि त्यांच्यावरही महत्त्वाची कामे सोपवली. अर्थातच खात्यातील सर्वांचेच उत्कृष्ट सहकार्य त्यांना लाभले आणि अतिशय सन्मानाने आणि तृप्त मनाने त्यांनी निवृत्ती स्वीकारली. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती असतानाच नव्हे तर हर्ष होण्याच्या प्रसंगीसुद्धा त्यांनी मनाचा तोल कधीच ढळू दिला नाही. असेच वागण्याचा प्रयत्न करत राहायचे असते. नेहमीच हे जमेल असे नाही, पण जमायला लागले की प्रगती नक्की!
भीष्मराज बाम
योगशास्त्र अभ्यासक
bpbam .nasik@gmail.com