आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धीरोदात्त जगन्मातेचे रूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"नीरजा' सिनेमा पाहिला आणि मन एकदम २५/३० वर्षे मागे गेले. ३८० प्रवाशांना घेऊन अमेरिकेसाठी पॅनअॅमचे विमान कराची एअरपोर्टवर हायजॅक झाल्याची बातमी आली व गडबड सुरू झाली. मी तेव्हा इमिग्रेशनचे काम पाहत होतो. प्रवाशांची यादी, त्यात कोण दहशतवादी असू शकेल याचा विचार सुरू झाला. नंतर कळले की, दहशतवादी एअरपोर्टवरच विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा वेश घालून विमानात शस्त्रास्त्रे घेऊन घुसले होते. ते मध्यपूर्वेतल्या अत्यंत जहाल अबू निदालच्या ग्रुपमधले होते. १७/१८ तासांचे भीषण नाट्य घडले. दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात २१ जण ठार झाले व १०० प्रवासी जखमी झाले. अतिरेक्यांना पाक कमांडोंनी ताब्यात घेतले. त्यांना व त्यांच्या प्रमुखाला पाक कोर्टात आधी फाशीची व मग जन्मठेपेची शिक्षा झाली. २००१ मध्ये पाक शासनाने प्रमुखाला सोडून दिले. एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला शोधून काढून अटक केली आणि अमेरिकेतल्या कोर्टात त्याच्यावर खटला चालवून त्याला १६० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली. त्याचे इतर चार साथीदार १४ वर्षे झाल्यावर पाक तुरुंगातून २००८ साली सुटले. त्यांची पाक शासनाने दुबईला पाठवणी केली. तेथून ते फरार झाले. त्यांच्यावर अमेरिकी शासनाने ५० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केलेले आहे.

या घटनेमध्ये नीरजा भानोत या २३ वर्षांच्या तरुणीने जे शौर्य व धैर्य दाखवले त्याला तोड नाही. मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबातल्या एका पत्रकाराची ती मुलगी. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आई-वडिलांनी तिचे लग्न करून दिले. ती दुबईला सासरी गेली. तिथे तिचा हुंड्यासाठी अतोनात छळ झाला. दोनच महिन्यांत ती माहेरी परत आली. तिच्या नवऱ्याने तिला धमकीचे पत्र लिहिले, त्यात तू स्वतःला काय समजतेस, एक साधी फडतूस पदवीधर तर आहेस, तुला काय जमणार आहे आयुष्यात? असा अपमानकारक मजकूर लिहिला होता. मात्र तिने त्यावर आकाशाला गवसणी घालून दाखवले. तिने मॉडेल म्हणून चांगले नाव कमावले. एअर होस्टेसच्या नोकरीसाठी पॅनअॅम या अमेरिकन एअरलाइनमध्ये अर्ज केला. त्यात तिची निवड होऊन तिने वर्षभरात प्रमोशनही मिळवले.

नीरजा ही दोन मुलांनंतर नवससायासांनी झालेली मुलगी. तिला घरी लाडो या लाडक्या नावानेच हाक मारली जायची. ७ सप्टेंबर १९८६ ला तिचा २३ वा वाढदिवस होता. अमेरिकेची फेरी झाली की घरी येऊन वाढदिवस साजरा करण्याचे ठरलेले होते, पण तसे व्हायचे नव्हते. विमान पहाटे कराचीला उतरल्यावर तिने विमानाचा दरवाजा उघडला तेव्हा हत्यारबंद अतिरेकी विमानात घुसल्याचे तिला कळले. तिने पायलटना इशारा देऊन सावध केले. त्यामुळे ते तिघेही वरचा दरवाजा उघडून विमानातून निसटू शकले. खवळलेल्या अतिरेक्यांनी तिला मारहाण केली. पायलट बाहेर गेल्यावर हेड पर्सर म्हणून आता विमानाचा ताबा नीरजाकडे होता. अतिरेक्यांना विमान प्रवाशांसकट सायप्रसला न्यायचे होते आणि निरनिराळ्या ठिकाणी तुरुंगात किंवा अटकेत असलेल्या साथीदारांना ओलिसांच्या बदल्यात सोडवण्याचा त्यांचा बेत होता. कराचीच्या एअरपोर्टवरील अधिकाऱ्यांनी दुसरे पायलट आम्ही शोधतो आहोत, असे वेळकाढू धोरण सांगितले. त्यांच्यावर दडपण आणण्यासाठी अतिरेक्यांनी एका भारतीय अमेरिकन तरुणाला व नीरजाला विमानाच्या दरवाजात आणून बसवले. ताबडतोब पायलट आले नाहीत तर या दोघांना गोळ्या घालू, अशी धमकी दिली आणि त्या तरुणाला गोळी घातलीसुद्धा. हादरलेल्या विमानातल्या सर्वच प्रवाशांना मृत्यूच्या दारात आपण उभे असल्याची जाणीव झाली. संकट आले, वेदना व्हायला लागल्या की प्रत्येकाला आपल्या आईची आठवण येते. आपल्या तत्त्वज्ञानात मातृत्वाला जगन्माता असे संबोधले जाते आणि तिची देवीच्या स्वरूपात पूजा, आराधना केली जाते. हे मातृत्व प्रत्येक ठिकाणी उपस्थितच असते. त्या विमानातल्या सर्व प्रवाशांच्या प्रार्थनेला त्या दिवशी उत्तर मिळाले. नीरजासारख्या साध्या वाटणाऱ्या स्त्रीच्या रूपात साक्षात जगन्माता त्यांच्यापुढे उभी राहिली आणि हातात शस्त्रसुद्धा न धरता तिने चार कर्दनकाळ यमदूतांशी १६ तास सामना केला आणि आपल्या बालकांना वाचवले.
नीरजाने या १६/१७ तासांत स्त्रीजातीच्या आयुष्यभरात होणारे छळ, अपमान, मारहाण, दुःखं, सारं काही भोगून टाकलं. सगळं काही पचवून ती धीरोदात्तपणे त्या यमदूतांच्या व संभाव्य बळींच्यामध्ये उभी राहिली. प्रवाशांच्या रक्षणासाठी ठाम उभी राहिली. अमेरिकन प्रवाशांना प्रथम ठार करण्याच्या उद्देशाने अतिरेक्यांनी सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा करण्याचा तिला हुकूम सोडला. तिने शिताफीने अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट सीटखाली लपवून त्या प्रवाशांना वाचवले. शेवटचा प्रवासी उतरल्यावरच आपण उतरायचे, असा तिचा प्रयत्न होता. अतिरेक्यांचा बेछूट गोळीबार चाललेला असताना तीन लहानग्यांना वाचवण्यासाठी ती परत फिरली. त्यांना घेऊन अगदी शिडीजवळ पोहोचल्यावर त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू झाला, तेव्हा त्या लहानग्यांना अक्षरशः आपल्या शरीराची ढाल करून तिने वाचवले. आपले प्राण तिने अगदी सहज अर्पण करून टाकले. नीरजाच्या शौर्याचा थरार अनुभवला त्यानंतर कितीतरी दिवस माझ्यासाठी तिची प्रतिमा शौर्याचे प्रतीक म्हणूनच होती. क्रौर्य हे भ्याड असते आणि शस्त्रांच्या साहाय्याने आपली शक्ती दुर्बलांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे या समाधानाने त्यांना चिरडून टाकण्याचे क्रौर्य त्यांचा कब्जा घेऊन टाकते. त्याउलट शौर्याची शक्ती आतून येत असते. अहिंसा ही मातृत्वाचीच केवढी मोठी शक्ती आहे. हिंसा ही तर दुर्बल मानवी शरीराची शक्ती आहे. ती त्या मातृत्वाला कशी हरवू शकेल?

युवकांनी तर हा चित्रपट पाहायला हवा. शासनावरचा/समाजावरचा राग काढण्यासाठी हिंसा हा उपायच नव्हे. उलट बलिदान द्यायचेच झाले तर ते नीरजासारखे हवे. तरच समाज प्रगत होऊ शकेल हा संदेश त्यांना या चित्रपटातून मिळू शकेल. मातृत्व हे नीरजासारखेच आपल्याभोवती निरनिराळ्या रूपात वावरत असते. किती वाईट वागवतो आपण तिच्या या सर्व रूपांना?
bpbam.nasik@gmail.com