आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑलिम्पिक स्पर्धा आणि भारत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला लहानपणापासून खेळांची आवड आहे आणि गेली साठ वर्षे मी क्रीडा क्षेत्राशी खूप जवळून संबंधित आहे. खेळाडू, संघटक, आयोजक, प्रायोजक, प्रशिक्षक, व्यवस्थापक, क्रीडा मानसशास्त्रज्ञ अशा कितीतरी भूमिकांतून मी हे क्षेत्र अनुभवले आहे. दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा कोठे ना कोठे होतात आणि आता टीव्हीमुळे सगळे खेळ त्यांच्या सर्वोत्तम अाविष्कारात पाहायला मिळतात. अर्थात, एका दुःखाची बोच सतत असते. अगदी छोटे-छोटे देशसुद्धा पदके मिरवतात, त्यांची राष्ट्रगीते पदक समारंभात वाजवली जातात. त्यात भारत आणि भारतीय खेळाडू कोठेच नसतात. दरवेळेला आपले खेळाडूच सर्वांच्या शिव्या खातात. या वेळी तर अशी हवा निर्माण केली गेली होती की आपल्याला दहा-बारा पदके तर सहज मिळतील. त्यातली किती सुवर्णपदके असतील ते पाहायचे; पण प्रत्यक्षात पहिले संपूर्ण १२ दिवस आपली पदकतालिका रिकामीच राहिली. हे असे वारंवार का होते हे सर्वसामान्यांना समजणे अवघड आहे. ज्यांनी निर्णय घ्यायचे आहेत ते हितसंबंध जपण्यात गुंतलेले असतात. त्यामुळे जोवर ऑलिम्पिक स्पर्धा होत राहतील तोवर आपली नालायकी सबंध जगासमोर याच पद्धतीने येत राहील.

क्रीडा क्षेत्र हे युवकांचे क्षेत्र आहे. प्राधान्याने वयाच्या २४ वर्षांपर्यंतच खेळाडूला आपल्या कामगिरीचे शिखर गाठायचे असते. मग त्याला त्या क्षेत्रात यश आणि करिअर मिळाले तर आणखी १०/१२ वर्षे तो खेळत राहतो. वयाची सर्वात महत्त्वाची वर्षे क्रीडा क्षेत्रात घालवायची असली तर कुटुंब आणि समाज त्याच्यामागे भक्कम उभा असला पाहिजे. कारण कितीही श्रीमंत घरातले असले तरी युवक पैशाच्या बाबतीत परावलंबी असतात. ते क्रीडांगणे आणि खेळांना लागणारे साहित्य आणि सोयीसुविधा निर्माण करू शकत नाहीत. ती जबाबदारी समाजाची आणि शासनाची आहे. आपण भारतीय तर अत्यंत पोटार्थी लोक आहोत. अतिशय सुस्थितीत असलेली कुटुंबेसुद्धा मुलगा किंवा मुलगी नवव्या वर्गात गेल्याबरोबर त्यांचे खेळ आणि इतर सर्व छंद पूर्णपणे थांबवून टाकतात. १२वी नंतर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला की खेळ वगैरेचा प्रश्नच येत नाही. याचे कारण खेळ आणि खेळाडूला करिअर नाही हेच आहे. आज क्रिकेटच्या खेळात भरपूर पैसा आल्याने आई-वडील चांगल्या खेळाडूंना थोडीफार सूट देतात खरे, पण खेळाबरोबरच त्यांनी अभ्यासातसुद्धा पहिला नंबर मिळवावा, अशी पालकांची अपेक्षा असते. आज युरोप आणि अमेरिकेत खेळाच्या प्रशिक्षकांची सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना होते. तसे आपल्याकडे होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण प्रशिक्षकांचे महत्त्वच आपल्याला कळत नाही. मुळात खेळ ही व्यक्तिमत्त्व घडवण्याची सर्वात महत्त्वाची बाब आहे, हेही आपल्याला समजत नाही. आपले शासन तर ग्रेटच आहे. ते शारीरिक शिक्षकांनाच क्रीडा प्रशिक्षक समजतात. प्रशिक्षक घडवण्याची काळजीच घेतली गेली नसल्याने चांगल्या दर्जाचे खेळाडू घडवणे आपल्याला अशक्य आहे.

आपले भारताचे धोरण म्हणजे क्रीडाक्षेत्राकडे होईल तितके दुर्लक्ष करायचे. मग ऑलिम्पिक जवळ आले की आपण काहीतरी करतो आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न होतो. तोही अत्यंत चुकीच्या दिशेने होत असल्याने पदके मिळतच नाहीत. जे खेळाडू आपले आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेले असतील त्यांना पैशांची मदत द्यायची, परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवायचे. नाहीतर परदेशी प्रशिक्षक भरपूर पैसा मोजून भारतात आणायचे आणि मिळालीच काही पदके तर आभाळाला हात लागल्याचे समाधान मानायचे. अशाने गेल्या ७० वर्षांत आपण आपल्या क्रीडा क्षेत्राचे प्रचंड नुकसान केलेले आहे. हे म्हणजे फुलांना आणि फळांना पाणी व खत घालून उत्तम बागायत करण्याची अपेक्षा बाळगण्यासारखे आहे. प्रकाश पदुकोण आणि गोपीचंदसारखे जे भारतीय प्रशिक्षक इतर सर्व गोष्टींचा त्याग करून आपल्या खेळाच्या मागे उभे राहिले त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे की आपले प्रशिक्षक जगातल्या सर्वोत्तम प्रशिक्षकांच्या तोडीचे ठरू शकतात. परदेशी प्रशिक्षक नेमणे ताबडतोब बंद व्हायला हवे. आणि प्राधान्याने आपले प्रशिक्षक आणि खेळाडू घडवण्याच्या प्रयत्नाला लागावे. चीननेसुद्धा क्रीडा क्षेत्रात उतरायचे ठरवले तेव्हा रशियन आणि इतर युरोपियन प्रशिक्षक २ वर्षांकरिता बोलावले होते; पण त्यांच्याकडून त्यांनी चीनमधील प्रशिक्षक घडवले आणि मग त्यांनाच आपले खेळाडू घडवण्याची जबाबदारी दिली. त्यांनीसुद्धा आपापल्या पद्धतीने क्रीडा क्षेत्रात संशोधन केले व भरपूर मेहनत घेतली. आज चीन अमेरिकेला टक्कर द्यायची क्षमता बाळगून आहे. आपल्याकडे येणाऱ्या परदेशी प्रशिक्षकांना भाषेच्या अडचणीमुळे खेळाडूंशी संवादच साधता येत नाही. मग ते प्रशिक्षण काय देणार?

​आता प्रशिक्षकांची जर ही अवस्था तर क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा वैद्यक, क्रीडा व्यवस्थापन, संयोजन आणि आयोजन, क्रीडांगणांची देखभाल, क्रीडा पत्रकारिता ही सारी क्षेत्रे कशी विकसित होणार?​ बॅडमिंटनचा जगज्जेता खेळाडू आणि नंतर कुशल संघटक व प्रशिक्षक म्हणून नावाजल्या गेलेल्या प्रकाश पदुकोण याने पहिल्यांदा क्रीडा मानसशास्त्राचे महत्त्व ओळखले. त्याने बंगळुरूला त्याची अकादमी काढली तेव्हा माझ्या मागे लागून खेळाडूंची मानसिक तयारी करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. मी ५/६ वर्षे नियमित बंगळुरूला जाऊन सलग ८/१० दिवस खेळाडूंच्या सोबत राहत असे. आमचा हा प्रयोग खूपच यशस्वी झाला. गोपीचंद, शुभंकर भट्टाचार्य, निखिल कानिटकर, सिद्धार्थ जैन, अपर्णा पोपट, मंजूषा पावनगडकर, मीनाक्षी असे अनेक खेळाडू त्या अकादमीत तयार झाले. त्यांनी ते लोण पुढल्या पिढीतही पोहोचवले. त्यामुळे पुढल्या पिढीत सायना नेहवाल, सिंधू, कश्यप, श्रीकांत यांच्यासारखे खेळाडू पुढे येऊ शकले.
भारत सोडून सर्वच देशांना ऑलिम्पिकचे महत्त्व पटलेले आहे. कारण आपल्या देशाचा झेंडा फडकावून आणि आपले राष्ट्रगीत वाजवायला लावून आपल्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व सर्व जगाला पटवून देण्याची ही एक संधी असते. या आधी तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धांना जाण्याची संधी मला आली होती, पण मी जाण्याचे टाळले. ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मी गेलो त्यात इतर सर्व लोक भारतीयांकडे किती तुच्छतेने पाहतात ते मी अनुभवले होते. या वेळी रिओ ऑलिम्पिक्सला तिरंदाजीच्या संघाबरोबर जायची संधी होती, ती मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे हुकली. आपल्यासारखे पूर्वी गुलामीत असलेले देशसुद्धा ऑलिम्पिक पदकांसाठी केवढा आटापिटा करतात. आणि ती मिळवतातसुद्धा. आताच रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके मिळवणाऱ्या देशांची संख्या ५४वर गेली आहे. त्यात फिजी बेटे, बहारिन, वगैरे छोटे देशसुद्धा आहेत. मग अमेरिका, चीन, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यासारखे बलाढ्य आणि समृद्ध देश तर भरपूर पदके पटकावतात त्यात नवल नाही. पण हे देशसुद्धा नियोजन व्यवस्थित करून निवडलेल्या खेळात भरपूर पदके पटकावतात. आपल्याला जर ऑलिम्पिक्समध्ये होणारी नित्याची मानहानी टाळायची असेल तर आपण दक्षिण कोरिया या देशाने राबवलेले धोरण अभ्यासून ते आपल्या देशाच्या परिस्थितीला जेवढे लागू करता येईल तेवढे करावे, असे मला वाटते.

तिरंदाजीसाठी द. कोरियाने उत्तम प्रशिक्षक तयार केले. आज जगभरच्या राष्ट्रीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक द. कोरियन आहेत. त्यात भारतसुद्धा आला. आणि परदेशात काम करणारे सारे प्रशिक्षक हे ज्यांची तिथल्या राष्ट्रीय कार्यक्रमात निवड होऊ शकली नाही असे (म्हणजे नापास झालेले) आहेत. तरीही त्यांची शिष्यमंडळी ऑलिम्पिकपर्यंत धडक मारून पदके मिळवत आहेत. (उर्वरित भाग उद्या)
भीष्मराज बाम क्रीडा मानसशास्त्रज्ञ
bpbam.nasik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...