आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रीडा नैपुण्यासाठी भारतीय योग, मानसशास्त्र उपयुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द. कोरियात राष्ट्रीय प्रशिक्षक शाळांतून शिबिरे घेऊन उत्तम गुणवत्ता असलेले खेळाडू निवडतात. त्यांची अतिशय कठीण परीक्षा घेऊन त्यांच्यामधून सुमारे १०० खेळाडू निवडले जातात. २० ते २५ खेळाडू आताच शिखरावर असलेले राष्ट्रीय संघात असतात. त्यांना आव्हान देणारे खेळाडू या नव्या १०० खेळाडूंमधून निवडले जातात. या सर्व शंभर -सव्वाशे खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण आणि उत्कृष्ट क्रीडा साहित्य पुरवले जाते. वर्षातून ३५० दिवस हे खेळाडू रोज १० ते १५ तास सराव करत असतात. त्यांना आपल्या करिअरची काळजी करावी लागत नाही. मग ऑलिम्पिक पदके ते सहज पटकावतात यात नवल वाटायचे कारण नाही.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात घ्यावे. यांचेच दर्जाप्रमाणे अ आणि ब गट करावेत. हे चॅम्पियन आणि चॅलेंजर गट राहतील त्यामधल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव घेण्याची संधी द्यावी तसेच त्यांच्या आणि नवीन येणाऱ्या खेळाडूंच्या निवड चाचण्या घ्याव्यात. त्यांच्या प्रशिक्षणाची आणि सरावाची व्यवस्था करावी म्हणजे खेळाडूंची पहिली आणि दुसरी फळी मजबूत उभी राहू शकेल.

खेळांच्या राज्य आणि राष्ट्रीय संघटना ऑलिम्पिक चळवळीचे नाव सांगून मनमानी कारभार करीत असतात. खर्चासाठी या साऱ्या जवळजवळ पूर्णपणे शासकीय अनुदानावर अवलंबून असतात. पैशांच्या अपहाराची प्रकरणे भरपूर आहेत. या सर्वांच्या कारभाराची चौकशी करण्याकरता एक कमिशन नेमावे. बऱ्याच खेळांच्या दोन- दोन संघटना झालेल्या आहेत. आणि जिथे तशा नाहीत तिथे तर एक-दोन व्यक्तींचे अनिर्बंध राज्य चालू असते. या व्यक्तींना आपली सत्ता अबाधित ठेवण्यातच जास्त रस आहे. भारताला पदके मिळतात की नाही याची त्यांना पर्वाच नाही. उलट जे खेळाडू असामान्य गुणवत्ता दाखवतात त्यांना दडपण्याचाच प्रयत्न जास्त होतो. एका संघटनेच्या अध्यक्षाला मी विचारले, “इतका चांगला खेळाडू तुम्हाला सापडला आहे तर त्याला प्रोत्साहन देऊन पुढे आणण्याऐवजी तुम्ही त्याला संपवायला का निघाला आहात?’ त्याने सांगितले की, असे केले नाही तर त्यांना मस्ती येते. यांना स्वतःलाच कशाची मस्ती आलेली आहे, हाच मला प्रश्न पडला. शासन संघटनांना शिस्त लावायला निघाली तर लोकशाही आणि ऑलिम्पिक चळवळ या तत्त्वांच्या आड लपण्याचा प्रयत्न होतो.

ऑलिम्पिक तयारीसाठी निवडलेल्या क्रीडा प्रकारामधल्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती केंद्रात आणि प्रत्येक राज्यात नेमावी आणि त्या समितीला मदत करणाऱ्या तज्ज्ञांचे पॅनेलही नेमावे. हे अत्यंत गरजेचे आहे. क्रीडा विषयांवर अभ्यास करण्याकरिता ग्रंथालयांची सोय व्हावी. संघटनांचे पदाधिकारी याबद्दल विचारसुद्धा करीत नाहीत. या अशा मंडळींच्या मुळे भारतात क्रीडा संस्कृतीच उभी राहू शकलेली नाही.

क्रीडा मानसशास्त्राचा मी गेली चाळीस वर्षे अभ्यास करत आहे. योगशास्त्र हे आपले मानसशास्त्र आहे. त्यातल्या संकल्पना आणि तंत्रे आम्ही वापरून पाहिली, त्यात निरनिराळ्या खेळात असंख्य खेळाडूंना स्पृहणीय यश मिळाले, बरेच जण जागतिक पातळीवरसुद्धा चमकले. योगशास्त्राच्या वापराबद्दल आपल्याकडे अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. आपल्याला ऑलिम्पिक पदके मिळवायची असतील तर भारतीय मानसशास्त्र अत्यंत उपयोगी ठरेल असे वाटते. कारण आपल्या संस्कृतीत विकसित झालेल्या या संकल्पना आपले खेळाडू अगदी सहज ग्रहण करून यश मिळवू शकतात, असे वारंवार आढळून आले आहे.

भीष्मराज बाम
क्रीडा मानसशास्त्रज्ञ
bpbam.nasik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...