आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२६/११ चा दहशतवादी हल्ला का झाला?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा कारभार कसा चालतो, यावर प्रकाश टाकणारे एक अनुवादित पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. हाइन किस्लिंग या राजकीय विश्लेषकाचे हे पुस्तक मूळ जर्मन भाषेत आहे. तो एका जर्मन संस्थेबरोबर काम करत होता.

पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे १९८८ ते १९९७ आणि इस्लामाबाद येथे १९९८ ते २००२ या कालावधीत तो नेमणुकीवर होता. त्याला नेमणारी संस्था ही जर्मन गुप्तहेर यंत्रणेशी संबंधित असावी. कारण गुप्तहेर यंत्रणा इतर देशात शैक्षणिक कार्य, व्यापार किंवा तत्सम कार्य करणाऱ्या संस्थांकरवी काम करून घेतात. त्या निमित्ताने गुप्तहेरांना परक्या देशात अनेक वर्षे वास्तव्य करून महत्त्वाची माहिती काढता येते. हाइन पाकिस्तानात असताना आयएसआयच्या आणि आणि भारतीय रॉ या संघटनेच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. २००२ नंतरही तो पाकिस्तानला नियमित भेटी देत राहून त्याच्या मैत्रीला उजाळा देत राहिला.

या पुस्तकाने पाकिस्तानमधील लष्करी अधिकाऱ्यांचा तेथील राजकीय नेतृत्वावर सतत दडपण ठेवत राहण्याचा डाव स्पष्टपणे उघड केला आहे. त्याच्या मते आयएसआय ही संघटना लष्कराच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये समन्वय साधण्याकरिता अस्तित्वात आलेली असली तरी ती लष्कर प्रमुखांना राजकीय पुढाऱ्यांच्या हालचाली आणि डावपेच यांच्याबद्दलसुद्धा माहिती पुरवत असते. या संघटनेच्या बऱ्याच कारवाया पाकिस्तान सरकारला न कळवताच होत असतात. त्याबद्दल अमेरिकेची गुप्तहेर संस्था नाराज होती आणि अमेरिकेने पाकिस्तानी सरकारवर दबाव आणून आयएसआयची देशांतर्गत ढवळाढवळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला. असे झाले तर काश्मीरमधील सैन्यदलाच्या डावपेचांवर परिणाम होईल आणि लष्कराच्या वर्चस्वालाच धक्का बसेल असे वाटून आयएसआयने २६/११/२००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला घडवून आणला. ही वेळसुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान जिलानी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाची साधलेली होती. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आसिफ झरदारी यांनी भारताशी व्यापाराचे आणि मैत्रीचे संबंध जोडण्याची घोषणा केलेली होती, ती पाकिस्तानमधील लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुखावून गेली होती. राजकीय सत्ता आपल्याला वरचढ होता कामा नये यासाठीच मुंबईवरचा हल्ला केला गेला. त्यामुळे भारत-पाक संबंधात पुन्हा दुरावा आला; पण मुंबई पोलिसांनी अतुलनीय शौर्य गाजवून अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडले. त्यासाठी सहायक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी आत्मबलिदानही केले. कसाबच्या जबाबातून आयएसआयचे खरे डावपेच उघड झाले आणि तपासामध्ये भक्कम पुरावा मिळू शकला. भारत सरकारने तो पाकिस्तान सरकारपुढे मांडला तेव्हा त्यांची फार मुश्कील झाली आणि त्यांना हाफिज सईद आणि झकी उर्रहमान लख्वी या दहशतवाद्यांच्या प्रमुखांना अटक करणे भाग पडले. यामागे अमेरिकेचेही दडपण अर्थातच होते. पण आयएसआय संघटनेने त्या दोघांवर कडक कारवाई होऊ दिली नाही आणि ते आपल्या कारवाया करायला परत मोकळे झाले. कसाबच्या जबाबामुळे दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणात लष्कराचा आणि आयएसआयचा उघड सहभाग असल्याचेही स्पष्ट झाले.

किस्लिंगला वाटते की ओसामा बिन लादेन अबोटाबाद येथे असल्याची माहिती सीआयएला पाकिस्तान सरकारनेच दिली. त्या घटनेची जी माहिती आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहे त्यावरून कोणाचीही अशीच समजूत होईल; पण या पुस्तकात सर्वात धक्कादायक माहिती आलेली आहे ती ही की बरीच वर्षे आयएसआय आणि सीआयए या दोन गुप्तहेर संघटना परस्पर सहकार्याने भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध मोहीम चालवत होत्या. ती मोहीम इंदिराजींची हत्या झाल्यावरच संपुष्टात आली. निदान त्या संघटनेला या हत्येबाबत माहिती तरी असावी असा निष्कर्ष किस्लिंगच्या लिखाणावरून निघतो. गुप्तहेर संघटनांचे कार्य सर्वांना अंधारात ठेवूनच चालत असते. कितीही सक्षम तपास यंत्रणा असली तरी त्यांना ते उजेडात आणणे शक्य होत नाही. याला अनेक कारणे असतात. सत्ताधीशांना पूर्ण सत्य उजेडात येणे परवडत नाही. त्यांच्यावर दडपण आणता येते आणि तपास भरकटवता येतो. कालांतराने जनता सर्व विसरते आणि पुढची येणारी पिढी त्याला फारसे महत्त्व देत नाही हा मानवी इतिहास आहे. वर्तमानाची मांडामांड करणेच अतिशय अवघड असते त्यात फार मागचा विचार होत नाही आणि फार पुढेही पाहता येत नाही. किस्लिंगच्या मते, भुत्तो हे पाक पंतप्रधान लष्कराचे महत्त्व कमी करण्याची क्षमता बाळगून होते; पण त्यांचा भारतद्वेष इतका प्रभावी ठरला की त्यांनीही काश्मीरमध्ये छुप्या दहशतवादी कारवाया करण्यालाच प्राधान्य दिले. त्यासाठी त्यांना लष्कर आणि आयएसआय यांचीच मदत घ्यावी लागली. हे पुढे जड जाणार आहे याची कल्पना असूनही त्यांनी तेच केले. राजकीय नेत्यांच्या चुका त्यांनाच नव्हे तर देशालाही महाग पडतात.

शहादत म्हणजे हौतात्म्याच्या कल्पना रुजवून दहशतवाद्यांना हिंसा करायला प्रभावित केले जाते; पण मुंबईत तुकाराम ओंबळे आणि इतर शहीद पोलिस अधिकारी व जवानांनी स्वतःच्या बलिदानाने दहशतवादालाच इशारा देऊन ठेवला आहे की या भूमीत पराक्रम आणि शौर्य याची मुळीच कमतरता नाही. सांडलेल्या रक्तातून परत नवे योद्धे निर्माण होतील आणि साऱ्या आक्रमकांचा समाचार घेतील. त्या सर्व शहिदांच्या स्मृतीला आणि मुंबई पोलिसांच्या पराक्रमाला या निमित्ताने पुन्हा पुन्हा सलाम.

भीष्मराज बाम
ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ
बातम्या आणखी आहेत...