आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईश्वर, देवता अन् व्रत वैकल्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाशिवरात्र आणि आषाढी-कार्तिकी एकादशी म्हणजे आम्हा पोरांना पर्वणी असायची. एरवी आईचे अनेक उपवास असायचे, पण तिचे हे उपवास म्हणजे नुसते केळी आणि दूध अगदी क्वचित भगर किंवा साबुदाण्याची खिचडी केली जायची. त्यामुळे आम्हाला त्यात फारसा रस नसायचा.
 
अर्थात, साबुदाणा खिचडीला फार मागणी असे, पण ती अगदीच थोडी थोडी वाट्याला यायची.  हे मोठे उपवास म्हणजे जंगी तयारी असे. दाण्याचे लाडू, रताळ्याचा कीस, दही, भगर, दाण्याची आमटी, काकडीची कोशिंबीर असा झक्क बेत असायचा. त्यामुळे आमचा उपास अगदी पोटभर होत असे. शंभू हलवाई सकाळी दुधाबरोबर पेढे पण देऊन जायचा. असा पेढा परत खायला नाही मिळाला. छोट्या लाडवाएवढा आकार, साखर बेताची आणि वेलदोड्याचा अगदी हवा एवढाच वापर. त्यामुळे खाल्ल्यानंतर बराच वेळ चव जिभेवर रेंगाळत राहायची. 
 
त्या मानाने मुस्लिम मित्रांकडचे रोजे फारच कडक असायचे. संध्याकाळच्या इफ्तारची मिठाई मात्र फारच उत्तम असे. परत ईदच्या दिवशी  शिरकुर्मा आवर्जून आमच्याकडे येत असे. माझी मुस्लिम मित्रांशी मैत्री घट्ट व्हायला ही मिठाई आणि खीर अर्थातच खूप उपयोगी पडली. आपण उपवास करायचे आणि मिठाई खायला मात्र सर्वांना बोलवायचे ही पद्धत मला फार आवडली होती आणि मी तसे त्यांना बोलूनही दाखवत असे. त्यांच्या आणि आपल्या पंचांगाच्या फरकामुळे ईद वर्षातून केव्हाही येत असे, पण महाशिवरात्र मात्र नेमकी परीक्षेचे दिवस जवळ आल्यावर येत असल्याने आम्ही तेव्हा फारच धार्मिक झालेलो असायचो. उगीच काहीतरी चुकले आणि परीक्षेत फटका बसला तर काय करायचे? ही भीती आमच्या धार्मिक होण्याच्या मागे असे. भीतीमुळे जर माणूस धर्माकडे वळला तर अंधश्रद्धेचा धोका जास्त असतो. समाजातल्या अनिष्ट रूढी या अंधश्रद्धेचा आधार घेऊनच जास्त बळकट होत जातात. 
 
कित्येक हजार वर्षांपूर्वी शारीरिकदृष्ट्या दुबळा असलेला मानव निसर्गातल्या शक्तींनाच नव्हे, तर इतर वन्य पशूंनाही घाबरत असे. पण आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने सर्वांना नमवायला सुरुवात केली. पण निसर्गाचा प्रकोप झाला तर त्याची डाळ शिजत नसे. म्हणून मग निसर्गातल्या शक्तींना दैवी स्वरूप देऊन त्याने त्यांची आराधना सुरू केली. मृत्यू आणि निसर्गाचा प्रकोप यावर विजय मिळवणे अवघडच होते. याबद्दलच्या भयाचे उन्नयन करण्याच्या प्रयत्नात संहारक रुद्राची संकल्पना निर्माण झाली. निसर्गाची कृपा आणि मृत्यूपासून संरक्षण हे दोन्ही असले तरच दीर्घायुष्य व संपत्ती यांचा लाभ होऊ शकेल. म्हणून मग रुद्राच्या संहारकतेबरोबरच मंगलता आणि प्रेमळपणा हेही गुण त्याला जोडण्यात आले. शिस्त लावणारा पिता आपण जर चांगले वागलो तर प्रसन्न होऊन आपल्याशी प्रेमाने वागतो. तसाच रुद्रही वागेल म्हणून त्याला मंगलकारक शिवाची भूमिका देण्यात आली. 
 
निरनिराळ्या ऋषींनी रुद्र आणि शिव या महादेवाच्या भूमिकांवर सूक्ते रचली. ती एकत्र करून रुद्र सूक्त निर्माण झाले आहे. त्याची रौद्रता वर्णन करून त्याला नमन करणारे मंत्र यात आहेत तसेच त्याच्या प्रेमाचा अाविष्कार करणारे मंत्रदेखील आहेत. नमन केल्यानंतर समृद्धीसाठी निरनिराळ्या मागण्या करून प्रार्थना केल्या आहेत. अभिषेकाच्या वेळी हे दोन्ही नमक म्हणजे नमन करणारे आणि चमक म्हणजे मागण्या मांडणारे अध्याय म्हटले जातात. पण नुसत्या नमन आणि मागण्या एवढ्यासाठी हे सूक्त नाही तर उपासनेसाठी अतिशय प्रभावी विचार मांडणारे म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. पाच मुखे असलेल्या महादेवाचे वर्णन आहे. ही पाच मुखे म्हणजे सृष्टीत असलेली पंचमहाभूते. त्या साऱ्यांची शक्ती रुद्रामध्ये एकवटलेली आहे अशी कल्पना आहे. म्हणून तर तो महादेव. 
 
भौतिक समृद्धी प्राप्त झाल्यावर विज्ञानाच्या साहाय्याने ती वाढवणे आणि टिकवणे शक्य झाले. पण मानवाचे लक्ष भौतिक सुखात गुंतले आणि त्याची अाध्यात्मिक शक्ती कमी झाली. ही शक्ती वाढवण्यासाठी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यांनी खरोखर थक्क व्हायला होते. संपूर्ण रुद्र सूक्त म्हणजे ऋषींच्या प्रतिभेचा उत्कृष्ट अाविष्कार आहे. पण नमक अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या अनुवाकामध्ये संपन्न माणसालाही मनःशांतीसाठी जे गुण आवश्यक आहेत तेच मागितलेले आहेत. हे गुण उपासनेशिवाय आपल्यामध्ये उतरणे शक्य नाही. ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांची सावधानता, प्राणांचे नियंत्रण, शारीरिक व आंतरिक सामर्थ्य, मधुर वाणी, जिंकण्याचे सामर्थ्य, साधनांचे सामर्थ्य सामर्थ्य, विवेचक आणि अचूक बुद्धी हे सर्व त्यात मागितलेले आहे. 
 
योग्य मार्गाने समृद्धी मिळवण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. पण त्याच वेळी समाजातल्या इतरांचाही विचार करायला हवा. समृद्धीचा वाटा सर्वांपर्यंत पोहोचला नाही तर समाजात गुन्हेगारी वाढते. तो दोष सबंध समाजाचा असतो. तो नष्ट करण्यासाठी रुद्र गुन्ह्यांना उत्तेजन देतो. तो चोरांचा, फसवणूक करणाऱ्यांचा, धनधान्य लुबाडणाऱ्यांचा अधिपती आहे. यासाठी समाजातल्या सर्वानीच जागरूक राहून समृद्धी सर्वांपर्यंत पोहोचेल असे पाहायला हवे. महाशिवरात्रीचे व्रत करायचे झाले तर पुजाऱ्यांना पैसे देऊन अभिषेक करण्यात अर्थ नाही. आपण या सूक्ताचा अर्थ समजून घेऊन म्हणायला किंवा ऐकायला हवे. तरच आपल्या शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढून आपल्याला महादेवाचा खरा प्रसाद मिळेल, नाहीतर व्रत दुसऱ्याने करायचे आणि आपण जिभेचे चोचले पुरवायला जायचे यात चैन असली तरी लाभ निश्चितच नाही.
बातम्या आणखी आहेत...