आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैदासीन्याची काजळी पुसणारे निरागस हसू!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमचे एक प्राध्यापक होते. निवृत्तीकडे झुकलेले. अतिशय विद्वान पण गबाळे आणि विसराळू. त्यांचे सहकारी आणि अनेकदा विद्यार्थीही त्यांची थट्टा करत असत. क्रीडा विषय काही दिवस त्यांच्याकडे आल्याने माझा त्यांचा जवळून परिचय झाला. कॉलेजच्या रस्त्यावर त्यांचे घर होते. त्यामुळे मी कधी-कधी संध्याकाळी त्यांच्या घरी थांबून गप्पा मारीत असे. ते आणि त्यांच्या प्रेमळ पत्नी असे दोघेच तिथे राहत असत. त्या दक्षिणी स्वयंपाक उत्तम करत असत. मला त्यांच्याकडे चांगले पदार्थ खायला मिळत. त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशात होता; पण तो आणि त्याची पत्नी या दोघांना चांगले वागवत नसत. त्यांचे नातेवाईक याबद्दल त्यांना टोमणे मारत असत. असे काही झालेले असले म्हणजे ती दोघेही उदास असत. मग मी जास्त वेळ न थांबता लवकर काढता पाय घेत असे. 
एकदा मी त्यांच्या घरी डोकावलो तेव्हा ते घरी नव्हते. त्यांच्या पत्नी म्हणाल्या, जरा थांब ते आता येतीलच. रडून त्यांचे डोळे सुजलेले होते. त्या फारसे काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. मी अवघडून पुस्तके मासिके चाळत बसून राहिलो. थोड्या वेळाने प्राध्यापक महाशय घरी आले. माझ्या अनुभवाने तेही उदास असतील असे वाटले होते, पण ते तर कधी नव्हे इतक्या खुशीत दिसले. त्यांचा चांगला मूड पाहून त्यांच्या पत्नीलाही बरे वाटले. त्यांनी काही खायला वगैरे केले. ते मला एकट्यालाच खावे लागले. कारण प्राध्यापक महाशय मित्राकडे फराळ करून आले होते. मी क्वचितच कोणाला इतक्या आनंदात पाहिले असेल; पण विचारायचे धाडस झाले नाही. त्यांच्या पत्नीलाही उत्सुकता होतीच. त्या म्हणाल्या, “अय्यर साहेबांकडे असे काय घडले की तुम्ही जाताना उदास होतात आणि आता इतके खुश आहात?” 
 
त्यांनी बरेच आढेवेढे घेऊन शेवटी सांगून टाकले. अय्यर साहेबांची मुलगी शकुंतला दिवाळीसाठी माहेरी आलेली होती. तिचे ५/६ महिन्यांचे तान्हे मूल तिला त्रास देत होते. ते तिने अय्यर साहेबांकडे आणून दिले आणि जरा याच्याकडे बघा असे सांगून ती आत निघून गेली. अय्यर साहेबांनी त्याचे रडे थांबवले आणि त्याला सोफ्यावर ठेवून तो वळू नये म्हणून बाजूला उशी ठेवून तेही आलोच असे म्हणून आत गेले. प्राध्यापक महाशयांनी त्या मुलाचे लक्ष वेधण्यासाठी चुटक्या वाजवल्या तेव्हा ते त्यांच्याकडे पाहून हसायला लागले आणि त्याने त्यांचे बोट घट्ट धरून ठेवले. त्याला उचलून घेतले तेव्हा त्यांचा चष्मा आणि पेन ओढून खाली टाकून दिले. ते त्या तान्ह्या बाळाशी खेळण्यात इतके गुंग होऊन गेले की अय्यर साहेब बाहेर आलेले त्यांच्या लक्षातही आले नाही. ते गमतीने प्राध्यापक महाशयांना म्हणाले, “तुला लहान मुलांची इतकी आवड आहे हे मला माहीतच नव्हते. तू याला दत्तकच घेऊन टाक. शकुंतला पोटात दुसरे मूल घेऊनच आली आहे.” त्या लहान बाळाने आपल्या स्पर्शाने आणि हसण्याने त्यांना खुश करून टाकले होते. 
 
हे ऐकून त्यांच्या पत्नी म्हणाल्या, “शकुंतला आली आहे हे मला माहिती नव्हते, नाहीतर मीसुद्धा आले असते तुमच्याबरोबर.” त्या दोघांच्या पुढल्या बोलण्यातून मला सगळा उलगडा झाला. त्यांची सून आपल्या लहान बाळाला घेऊन माहेरी आलेली होती, पण तिने त्याला दाखवायलासुद्धा घेऊन यायला नकार दिला होता. यांच्याशी संबंधही ठेवणे तिला नको होते. कारण ही दोघं निवृत्तीनंतर अमेरिकेला येऊन राहण्याचा प्रयत्न करतील, अशी तिला भीती वाटत होती. ती दिवाळी प्राध्यापक महाशय आणि त्यांची पत्नी या दोघांचीही खूपच आनंदात गेली. आपल्या लेकीचे किंवा सुनेचे लाड करावेत तसे त्यांनी शकुंतलाचे केले. तिच्या बाळात त्यांना आपला नातू दिसत होता. नातवाला दत्तक घ्यायची सोय असती तर त्यांनी त्याला दत्तक घेतले असते हे नक्की. 
 
पुढल्या दिवाळीला मी त्यांच्याकडे फराळासाठी गेलो तेव्हा अय्यर साहेब सहकुटुंब सहपरिवार त्यांच्याकडे आलेले होते. शकुंतला दोन छोट्या मुलांना घेऊन आली होती. तिचे आणि तिच्या दोन्ही मुलांचे प्राध्यापक महाशय आणि त्यांची पत्नी नजरेत भरावे असे कोडकौतुक करत होती. अय्यर साहेब त्यांना म्हणाले, “तुम्हा दोघांना लहान मुलांची इतकी आवड आहे तर आमच्या वस्तीत अनाथाश्रम आहे, त्याच्या कमिटीवर काम करायला या. तुम्हाला भरपूर सहवास मिळेल लहान बाळांचा.” मला वाटले होते, हे त्या दोघांनाही ताबडतोब पटेल. पण त्यांनी कधीच अनाथाश्रमाच्या कामात रस दाखवला नाही. शकुंतलाच्या मुलांचा मात्र त्यांनी शिक्षणाचाही काही भार उचलला. 
 
मला मनुष्य स्वभावाचे राहून राहून नवल वाटते. स्वतःच्या मुला-नातवंडांचे चांगले व्हावे यासाठी आटोकाट प्रयत्न होतात; पण ते वात्सल्य इतरांच्या मुलांविषयी, त्यातल्या त्यात अनाथांविषयी वाटणारे फार थोडे. प्राध्यापक महाशयांच्या बाबतीत जे घडले ते त्यांच्या उदास मन:स्थितीत त्या तान्ह्या बाळाने आपल्या हास्याने आणि स्पर्शाने ही किमया केली होती. नाहीतर ती पती-पत्नी आपल्याच नातवंडांची आठवण काढत उदासवाणे जगत राहिली असती. त्यांच्या पुढल्या आयुष्यात मी त्यांना उदास झालेले क्वचितच पाहिले. अशी किमया करण्याची शक्ती साऱ्याच बालकांच्या हास्यात असते, पण माणसे त्यांच्या बाबतीत आपले मन मिटून घेतात. हे आठवण्याचे कारण म्हणजे परवाच एका समारंभात आईच्या कडेवरून एका तान्ह्या बाळाने माझ्याकडे पाहत पुन्हा पुन्हा हसून मला केवढा तरी आनंद दिला होता.
 

क्रीडा मानसशास्त्र तज्ज्ञ  bpbam.nasik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...