आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निःशंक, निर्वैर आणि निर्भय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संध्या ही दक्षिण भारतातली एक चांगली बुद्धिबळपटू आहे. माझ्या एका मित्राने सांगितले की, तिला माझ्याकडे दडपण कसे हाताळायचे हे शिकायला यायचे आहे. ती युरोपमध्ये दोन स्पर्धा खेळण्याकरिता गेलेली होती. पहिली स्पर्धा जवळजवळ अर्धी संपल्यावर मला तिचा ईमेल आला. तिला प्रचंड दडपण आल्यामुळे खेळायलाच जमत नव्हते आणि तिने कसाबसा एक सामना जिंकला होता. ती उरलेले सामने आणि दुसरी स्पर्धा सोडून देऊन भारतात परतणार होती. याने तिच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीचा क्रमांक ढासळला असता आणि तिच्या उर्वरित करिअरवर अनिष्ट परिणाम झाला असता. पण तिला शक्य तितक्या लवकर मला येऊन भेटायचे होते. मी तिला संदेश पाठवला की उरलेले सामने सोडून न देता ते प्रयोग म्हणून खेळावेत आणि त्यामध्ये कसा दृष्टिकोन अवलंबायचा तेही सुचवले. तिने ते करून पाहिले आणि तिचा पुढला खेळ चांगलाच सुधारला. ती त्या स्पर्धेमध्ये सहावी आली. मग तिने पुढली स्पर्धाही खेळायचे ठरवले आणि मला तसे कळवले. मी तिला आणखी काही मुद्दे लिहून पाठवले आणि त्यांच्यावर गांभीर्याने विचार करण्यास सांगितले. तिने त्या स्पर्धेत चक्क दुसरा क्रमांक मिळवला आणि आंतरराष्ट्रीय क्रमवारीत गुण गमवायच्याऐवजी ते कमावून ती भारतात परतली. आता या आठवड्यात आम्ही पुढल्या तयारीसाठी भेटणार आहोत. 

मोठ्या स्पर्धांमध्ये भल्या भल्या खेळाडूंनाही दडपणाचा सामना करावा लागतो. ते जमले नाही तर अपयशसुद्धा वाट्याला येऊ शकते. आणि त्याचा पुढल्या कामगिरीवर अनिष्ट परिणाम हाेऊ शकतो. चांगले हुशार विद्यार्थी UPSC किंवा MPSC, CA, IIT, Medical किंवा Engineeringच्या प्रवेश परीक्षा यांच्यासाठी तयारी करीत असतात, त्यांच्यावर तर परीक्षेत येणाऱ्या यश-अपयशाच्या कल्पनेनेच प्रचंड दडपण येते. या परीक्षांत मोजकेच विद्यार्थी निवडले जाणार असल्याने जसजशी परीक्षा जवळ येईल तसतसे हे दडपण वाढतच जाते. 

आधी आपल्या क्षमतेबद्दल शंका निर्माण होते. त्या शंकेने मनात घर केले की एकाग्रतेचा बळी पडतो. मग ती शंका संपूर्ण नकारात्मकतेचे रूप घेऊन भेडसवायला लागते. ते भय मनाचा कब्जा घेऊन टाकते. आणि त्याचा प्रकृतीवरच परिणाम होतो. झोप उडते, भूक लागत नाही आणि प्रकृती क्षीण झाल्याने साध्या तक्रारीसुद्धा गंभीर रूप धारण करतात. काही विद्यार्थी क्लास आणि अभ्यासाच्या निमित्ताने दूरच्या शहरात जाऊन राहत असतात. त्यांना तर या समस्या फारच सतावतात. 

एकतर या मोठ्या परीक्षा नुसत्या पाठांतरावर निभावून नेण्यासारख्या नसतात. ज्ञानसंपादन आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्याची कला आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असते. बऱ्याच वेळा विद्यार्थी अनिच्छेनेच पालकांच्या दडपणाखाली या परीक्षा द्यायला तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांचे मनच बंड करून उठत असते. त्याने बुद्धी येत असलेल्या ज्ञानाचा स्वीकार करण्याचे नाकारते. मग तर पाठांतरसुद्धा साधत नाही. आतापर्यंत परीक्षांमध्ये मिळालेल्या यशांमुळे मनात एक विशिष्ट आत्मप्रतिमा तयार झालेली असते. ती आता डागाळली जाणार आणि दुसरे आपल्या पुढे जाणार याचे भय अंतःकरणाचा कब्जा घेऊन टाकते. ते भय उरलेले सारेच आयुष्य नासवून टाकण्याचा धोका असतो. अशा वेळी कठोर आत्मपरीक्षणाची गरज असते. स्मरणशक्तीचा एकाग्रतेशी आणि आत्मविश्वासाशी अतिशय घनिष्ठ संबंध असतो. खेळाडूंचा फायदा हा असतो की ते निदान शरीरप्रकृतीची तरी काळजी घेत असतात. पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर तेही होत नाही. महत्त्वाच्या परीक्षांची तयारी करण्याच्या सुरुवातीलाच सगळे खेळ आणि व्यायाम बंद करून टाकले जातात. 

अभ्यासासाठी जागरणे सुरू होतात आणि खाण्याच्या फक्त आवडींवरच भर दिला जातो. त्याने डोके व पोट दोन्ही बिघडतात. काही जण जिमच्या व्यायामावर भर देतात. याने तर काहीच साधत नाही. जिमचा व्यायाम हा काही विशिष्ट स्नायूंच्या विकसनासाठी करायचा असतो, त्यासाठी तो उत्तम आहे. पण प्रकृती आणि पचन सुधारण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याकरिता चालणे आणि योगासने हाच उत्कृष्ट उपाय आहे. त्याबरोबरच हलका आणि पाचक आहारही घ्यायलाच हवा. जिभेचे चोचले पुरवणे निदान परीक्षेच्या तयारीमध्ये तरी आंतरराष्ट्रीय क्रीडा सामन्यांप्रमाणेच बंद करायला हवे. 

प्राणायाम, शवासन, योगनिद्रा, न्यास आणि ध्यानाचा अभ्यास पुष्कळच उपयोगी पडतो. त्यांच्यामुळे निवडलेल्या आलम्बनावर चित्त स्थिर करता येऊन प्रलोभनांपासून दूर राहता येते. परीक्षेच्या तयारीसाठी हे फारच गरजेचे आहे. आतापर्यंत वाया गेलेला वेळ, अभ्यास पूर्ण न झाल्याची भावना, हे सारे परीक्षेत आठवेल आणि जमेल की नाही याची काळजी या सर्व गोष्टी आपल्या आकलनशक्तीवरच अनिष्ट परिणाम करतात. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाचे भूतकाळात, भविष्यकाळात आणि इतर ओढींवर भरकटणे बंद केले तरच उत्तम जगता येते. परीक्षेच्या आणि सामन्यांच्या तयारीत जगणे विसरायचे नसते. ज्ञानाची आणि कौशल्याची ओढ जागी ठेवता आली तरच आकलनाचा आणि कामगिरीचा दर्जा वाढत असतो. मी आता ज्या ज्ञानाची उजळणी करीत आहे ते मला परीक्षेतच नव्हे तर उर्वरित आयुष्यात केव्हाही गरज पडेल तेव्हा उपयोगी पडणार आहे, हे स्वसंवादाने मनाला पटवून देता आले पाहिजे. निःशंक, निर्वैर आणि निर्भय होता आले तरच झळाळते यश मिळवता येते. प्रयत्न त्यासाठी व्हायला हवेत. ते जितक्या गांभीर्याने केले जातील तितकी यशाची शक्यता वाढत असते. 

- भीष्मराज बाम, ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ 
bpbam.nasik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...