Home »Mukt Vyaspith» Big Shock

जोर का झटका...

प्रा. बाळासाहेब बोरसे, औरंगाबाद | Feb 22, 2013, 06:22 AM IST

  • जोर का झटका...

आम्ही त्या वेळी बीडला सुभाष रोडला एका सॉ मिलजवळील तांबेंच्या चाळीत राहत होतो. कॉलेजजवळच घर असावे म्हणून करीम पेठ भागातून इकडे राहण्यास आलो होतो. या घराच्या मागील बाजूस एक दार होते. एस. टी. स्टँड आणि बलभीम कॉलेज जवळ वाटायचे. या घरामागे स्वतंत्र बाथरूम होते, परंतु त्यावर आच्छादन नव्हते. त्याच्या दाराच्या चौकटीला बाहेरून बल्ब लावता येईल, अशी व्यवस्था होल्डरसह वायर सोडून केली होती. तेथे बल्ब लावल्यास साप, विंचू इत्यादींपासून संरक्षण होईल, असा त्यामागचा उद्देश होता. या दाराच्या चौकटीबाहेर अगदी जवळच ड्रेनेज होते. त्यावर लोखंडी झाकण टाकण्यात आले होते.

मी एका हातात बल्ब घेऊन तो लावण्याचा प्रयत्न करत होतो. होल्डरमध्ये बल्ब बसवूनही तो लागत नव्हता, म्हणून मी निरीक्षण करत असताना पितळी खाच वाकली असल्याचे दिसले. मग ती सरळ करण्यास गेलो तेव्हा क्षणातच माझ्या उजव्या हाताला विजेचा जोरदार झटका बसला. माझा हात जोरात बाहेर फेकल्या गेला. मी घाबरून जोरात ओरडलो. तेव्हा माझी पत्नी सुनीता धावतच आली. तिने मला सावरले. मी त्या लोखंडाच्या झाकणावर उभा असल्याने शॉक जोरातच लागलेला असावा.

जर मी चिकटलो असतो तर... या भीतीने आजही अंगावर काटा उभा राहतो. या घटनेनंतर बरेच दिवस मी अस्वस्थ होतो. त्यानंतर विजेसंबंधीची कामे सावध राहून करण्याची खबरदारी तर घेऊच लागलो, पण बाहेरगावी, लग्नसमारंभात, कार्यक्रमात असल्यास इतरांनाही विजेची उपकरणे हाताळताना काळजी घेण्याचे सुचवत होतो. वीज, पाणी आणि अग्नीपासून चार हात दूर राहावे असे म्हणतात. ते कायमचे मनावर ठसले आहे. थोडक्यात ‘जोर का झटका... धीरे से लगा’ असाच काहीसा अनुभव होता.

Next Article

Recommended