Home | Editorial | Agralekh | bihar-jail-attack-on-doctor

तुरुंगातील अंदाधुंदी

divya marathi | Update - Jun 01, 2011, 08:20 PM IST

गुन्हेगार 'यादव' असले तरी त्यांना तुरुंगात पाठविण्यात मुख्यमंत्री यादव यांच्या प्रशासनाने कुचराई केली नाही. परंतु, एकूण समाजातले अराजक, अन्याय आणि असंतोष आटोक्यात येणे सोपे नसते.

  • bihar-jail-attack-on-doctor

    समाजात जे अराजक असते त्याचेच प्रतिबिंब ठळक व फिकट स्वरूपात तुरुंगात किंवा अगदी वेड्यांच्या इस्पितळातही उमटते. बिहारमधील गोपालगंज येथील तुरुंगात काही कैद्यांनी तेथील डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी आणि नंतर त्याचे डोके भिंतीवर आपटून ठार मारल्याच्या बातमीने देशभर एकच थरार व्यक्त झाला. एका बातमीनुसार, त्या डॉक्टरने काही कैद्यांना आजारपणाचे खोटे सर्टिफिकेट द्यायला नकार दिला होता. त्यामुळे ते कैदी संतप्त होते. डॉक्टरला तशा धमक्याही येत होत्या, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तुरुंगाधिकार्यांना त्या धमक्यांची कल्पना असूनही डॉक्टरला पुरेसे संरक्षण मिळाले नसेल तर ती अधिकच गंभीर गोष्ट आहे. त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवे की, ज्या कैद्यांनी डॉक्टरला तुडवून ठार केले ते सर्व यादव आहेत. याचा अर्थ सर्व यादव जात तशी हिंस्र आहे असे नाही. किंबहुना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यादव हे देशातील एक सर्वात सुसंस्कृत गृहस्थ म्हणून ओळखले जातात. नितीशकुमारांच्या कारकीर्दीतच बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा झाली. गुन्हेगार 'यादव' असले तरी त्यांना तुरुंगात पाठविण्यात मुख्यमंत्री यादव यांच्या प्रशासनाने कुचराई केली नाही. परंतु, एकूण समाजातले अराजक, अन्याय आणि असंतोष आटोक्यात येणे सोपे नसते. ते अगदी इंग्लंड-अमेरिकेलाही शक्य झालेले नाही. तेथील तुरुंगांमध्येही अनेक प्रकारच्या हिंस्र घटना घडत असतात. अमेरिकेतील तुरुंगव्यवस्था व तत्संबंधीचे कायदे हे जगातील सर्वात अमानुष असल्याचे मानले जाते. त्यामुळे बिहारमधील भीषण घटना समजून घेताना तुरुंगव्यवस्था, तेथील कैदी, त्यांना मिळणा-या वा न मिळणा:या सोयी, त्यांची मानसिक व शारीरिक अवस्था, त्यांना दिली जाणारी वागणूक याही गोष्टींचा विचार व्हायला हवा. त्याचप्रमाणे कैद्यांचा ताण कमी करण्यासाठी काही ठिकाणी नेमलेले समुपदेशक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी नेमलेले डॉक्टर्स हे कोणत्या परिस्थितीत (व काय वेतनावर) काम करतात हेसुद्धा पाहायची गरज आहे. समाजातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बेपर्वाई याचे प्रतिबिंबच तुरुंगात पडत असते. ज्या गुन्हेगारांना 'वरून' संरक्षण मिळत असते वा राजकीय आधार लाभत असतो त्यांचा माज तुरुंगात गेल्यावरही तसाच असतो. कित्येकदा त्या माजोरडेपणाचा जाच इतर कैद्यांना होत असतो. बरेच वेळा तुरुंगाधिकार्यांपासून कनिष्ठ कर्मचार्यांपर्यंत सर्वांवर त्या गुन्हेगाराचे तुरुंगाबाहेरील 'कॉन्टॅक्ट्स' आणि 'स्टेटस' यांचा प्रचंड दबाव असतो. काही कैद्यांना मिळणार्या सवलती - मोबाईल फोनपासून ते खास भोजनव्यवस्था - या तुरुंगातही एक वेगळी विषमता निर्माण करतात. सर्व गुन्हेगार व म्हणून कैदी झालेले. ते एकाच पातळीवर नसतात. जशा प्रकारची उतरंड व विषमता समाजात असते तशीच तुरुंगातही असते. समाजातील उपेक्षित जाती-जमातींच्या गुन्हेगारांना तुरुंगात मिळणारी वागणूक आणि उच्चभू्र, माफियासंबंधित, श्रीमंत कैद्यांना मिळणारी वागणूक यात बराच फरक असतो. खुद्द तुरुंगाधिकारी व कर्मचारी ज्या जाती-जमातीतून येतो त्याचाही परिणाम काही प्रमाणात उपेक्षित समाजातून आलेल्या कैद्यांना भोगावा लागतो. त्यातून भारतीय समाजात काही जाती एकेकाळी 'अधिकृतपणे' गुन्हेगार जमाती म्हणून नोंदल्या गेल्या होत्या. त्याविरुद्ध आंदोलने झाली; पण म्हणून गैरसमज व त्यातून येणारा दृष्टिकोन बदलला गेला असे अजिबात म्हणता येणार नाही. बिहारमधील घटनेला हा संदर्भ कदाचित लागू नसेलही; पण कैद्यांमधील विषमता आणि त्यांच्यापैकी काहींना 'आपल्याला खोटे आजारपणाचे सर्टिफिकेट मिळू शकेल' असा वाटणारा विश्वास या गोष्टी भ्रष्टाचाराची साखळी तुरुंगापर्यंत पोहोचल्याचे दाखवितात. खरे म्हणजे आपल्या देशात तुरुंगांची सर्वंकष पाहणी, कैद्यांचे जीवन आणि तुरुंग व्यवस्थापन याकडे फारसे लक्षच दिले गेलेले नाही. काही हजार कैदी कोणताही विशिष्ट गुन्हा न नोंदविला जाताच तुरुंगात खितपत पडले आहेत. आपल्याकडील सामाजिक संस्था, मीडिया, बहुतेक एनजीओज् या प्रश्राकडे दुर्लक्ष करतात. पण, लोकप्रतिनिधीही तुरुंग व्यवस्थापनाचा प्रश्र कधीही अजेंड्यावर आणत नाहीत. त्यामुळे तुरुंगातील जीवन हे खरोखरच लोकांच्या दृष्टिकोनातून गजाआडच राहते. ज्या कैद्यांचे नातेवाईक बाहेरून त्यांना मदत करू पाहतात, त्यांचेही लक्ष हळूहळू कमी होत जाते. जसजसा काळ पुढे जातो तसतसा तो कैदी एकटा पडू लागतो. त्यातूनही येणारी मानसिकता, विलक्षण 'डिप्रेशन', जगापासून तुटलेपणाची आलेली भावना यामुळे कैदी प्रक्षोभक अवस्थेत असतो. कुठे तरी, कधी तरी त्या प्रक्षोभाचा भडका उडतो आणि कुणी तरी त्यात बळी जातो. तुरुंगांमध्ये कैद्यांनी बंड करणे, तुरुंगातील कर्मचारी व संरक्षक पोलिसांवर हल्ला करणे, त्यंाची शस्त्रास्त्रे पळविणे, तुरुंग फोडून वा कुलुपे तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणे अशा गोष्टी अधूनमधून घडत असतातच. परंतु त्या घटना वेगûया स्वरूपाच्या आहेत. डॉक्टरला ठार मारण्याइतकी बेबंद लाथाबुक्की चालू असताना तुरुंगातील पोलिस वा कुणीही कर्मचारी तिकडे न फिरकणे ही बाबही अनाकलनीय आहे. याचे दोन अर्थ संभवतात. एक म्हणजे त्या पोलिस वा कर्मचा-यांचा कैद्यांनाच पाठिंबा होता किंवा त्यांचे संगनमत होते आणि दुसरी शक्यता म्हणजे पूर्ण बेपर्वाई. बेबंदशाहीची सुरुवात अशीच होते. बिहारमधील तुरुंगात डॉक्टरचा झालेला भीषण खून का व कसा झाला, यासंबंधात चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एक चौकशी समिती नेमली आहे. परंतु, त्या चौकशी समितीच्या कक्षेत न येणारा एकूणच तुरुंग व्यवस्थापनाचा मुद्दाही समाजाने विचारात घ्यायची वेळ आली आहे. नाही तर समाजातील अराजक तुरुंगात आणि तुरुंगातील अस्वस्थता समाजात, हे चित्र तसेच राहील.

Trending