आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bill And Melinda Gates Foundation To Work For Social Drive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारी स्वप्नाबद्दल धन्यवाद बिल गेट्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यासारख्या आधुनिक आणि समृद्ध मानल्या गेलेल्या शहारात महिला खरेदीला लक्ष्मी रोडवर निघतात तेव्हा त्यांना तेथे गरज पडल्यास स्वच्छतागृह मिळेलच याची खात्री नसते. पुरुषांसाठी शहरात स्वच्छतागृह आहेत मात्र ते वापरायचे म्हणजे जणू शिक्षा, अशी त्यांची बहुतांश वेळा स्थिती असते.
आपल्या देशात कोठेही प्रवासाला निघालात आणि कोणत्याही थांब्यावर स्वच्छतागृह वापरण्याची गरज पडल्यास नाक दाबूनच आत प्रवेश करावा लागतो. साधा धाबा असल्यास तेथे महिलांसाठी स्वच्छतागृह असतीलच याची खात्री नसते.
आमच्या घरांचा आकार जागेअभावी आणि महागाईमुळे कमीकमी होत चालला असून, जागा वाचवण्याचा मुद्दा येतो तेव्हा घरातील स्वच्छतागृहांच्या जागेचा संकोच केला जातो. अलीकडच्या काही वर्षात महागड्या घरांमध्ये स्वच्छतागृहांना पुरेशी जागा देण्याची पद्धत मान्य झाली आहे. मात्र हे भाग्य फारच कमी भारतीयांच्या वाट्याला येते.
मध्यम हॉटेलात गेलात आणि तेथे स्वच्छतागृह शोधण्याचा प्रयत्न केला तर ब-याच प्रयत्नांनी तुम्हाला यश येते. त्या स्वच्छतागृहाची काय अवस्था असेल, याची मात्र काहीच खात्री नाही. देशात कोणत्याही बसस्थानकातील स्वच्छतागृहाकडे तुम्ही डोळे झाकून जाऊ शकाल आणि नाक दाबून त्याचा वापर करू शकाल एवढेच काय पण सरकारी आणि अनेक खासगीही कार्यालयात तुम्हाला हाच अनुभव येईल.
एखाद्या छोट्या गावात, अगदी निर्मलग्राममध्ये गेलात तरी विविध योजनांखाली बांधलेल्या स्वच्छतागृहांचा वापर वेगळ्याच कारणांसाठी केला जातो आणि गावातील पाणंदी आहे तशीच वापरली जाते आहे, असे लक्षात येईल.
लांबच्या प्रवासात रेल्वेच्या डब्यात स्वच्छतागृहात पाणीच नाही, असे अनेकवेळा घडते आणि स्टेशनवर गाडी उभी राहिली की फलाटावर उभे राहायला नको नको होते. आपल्या देशातील स्वच्छतागृहाची स्थिती ही अशी आहे. दैनंदिन जीवनात नैसर्गिक म्हणून जे आपण टाळू शकत नाही, अशा अत्यावश्यक आन्हिके किंवा नित्यक्रमाची आपण समाज म्हणून काय दशा करून ठेवली आहे. हे यावरून लक्षात यावे. आधुनिक म्हणविल्या जाणा-या आजच्या समाजात ही स्थिती आहे. अर्थात ही काही केवळ आपल्या देशातील परिस्थिती आहे, असे मानण्याचे कारण नाही. जगातील 2.5 अब्ज म्हणजेच प्रत्येक पाचातील दोघांना स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. अस्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहांची दुर्दशा यामुळे जी रोगराई पसरते. त्यामुळे जगात दरवर्षी 14 लाख मुले मृत्युमुखी पडतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जगात दुस-या क्रमांकाची लोकसंख्या असलेला आपला देश या आघाडीवर लगेच लक्षात येतो, एवढे मात्र खरे.
मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून जगात संगणक क्रांती करणा-या आणि जगातल्या श्रीमंतातल्या श्रीमंत अमेरिकन माणसाने म्हणजे बिल गेट्स यांनी सर्वांसाठी स्वस्तातील स्वच्छतागृह हे आपल्या आयुष्यातील एक स्वप्न असल्याचे परवा दिल्लीत जाहीर केले धन्यवाद बिल गेट्स याचा आनंद योग्यवेळी स्वच्छ स्वच्छतागृहात प्रवेश मिळवण्याच्या आनंदासारखाच आहे. त्यापेक्षा जास्त आनंद झाला, असे मी म्हणणार होतो. मात्र त्यापेक्षा जास्त आनंद असू शकत नाही, असे नंतर लक्षात आले. हा महाआनंद कोट्यवधी माणसांच्या आयुष्यात निर्माण करण्याचे संवेदनशील स्वप्न पाहिल्याबद्दल धन्यवाद बिल गेट्स, आज हे स्वप्न जगाला सांगून बिल गेट्स नावाच्या जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाने आपल्याकडे शहाणपणही आहे, हे दाखवून दिले, याचा आनंद काही वेगळाच आहे. (नाहीतर आमच्या देशात काय कमी श्रीमंत माणसे आहेत. ती तर याच देशात राहतात, प्रवास करतात आणि उघड्या डोळ्यांनी ही परिस्थिती पाहतात. आशा करूयात की तीही बिल गेट्स यांच्याकडून प्रेरणा घेतील.)
बिल गेट्स केवळ स्वप्न सांगून थांबले नाहीत, त्यांनी येत्या आॅगस्टमध्ये जगातील आघाडीचे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची या विषयावर अमेरिकेत एक परिषद घेण्याचा निर्णय जाहीर केला. जेथे सारे जग वाट पाहते आहे अशा स्वस्तात स्वस्त आणि कमीतकमी पाण्याचा वापर होणा-या स्वच्छतागृहांचे मॉडेल तयार करण्याचे आव्हान त्यांना दिले जाईल किंवा ज्यांनी तसे काही केले असेल, त्यांच्या मॉडेलची शहानिशा केली जाईल. भरपूर पैसा कमावल्यानंतर गेट्स यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनची स्थापना केली असून सामाजिक कामांसाठी कोट्यवधी डॉलरची तरतूद केली आहे. गेट्स यांनी आपली इतरही काही स्वप्ने या वेळी सांगितली, ज्यात पोलिओमुक्त जग, मलेरियामुक्त जग आणि एचआयव्हीमुक्त जग अशा स्वप्नांचा समावेश आहे. होईल तेही होईल मात्र स्वतात स्वस्त आणि कमीतकमी पाण्याचा वापर होणा-या स्वच्छतागृहांचे स्वप्न फार भारी आहे. माणसे आजारी पडून मृत्युमुखी पडतात. त्याचे काही वाटत नाही, मात्र जेव्हा ती आन्हिके ‘उरकण्यासाठी’ दररोज आणि क्षणोक्षणी मरत असतात तेव्हा मात्र एकविसाव्या शतकाचा आणि अत्याधुनिक तंत्राचा बोळा करून..... फेकून द्यावा वाटतो!

भारतात हे स्वप्न पाहायचे असल्यास

- 25 कोटी घरांपैकी 50 टक्के म्हणजे 12.50 कोटी घरांमध्येच स्वच्छतागृहांची सोय.
- त्यातील 3.2 टक्के कुटुंब सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरतात.
- सार्वजनिक आणि स्वस्त स्वच्छतागृहांचा सुलभ इंटरनॅशनलतर्फे चांगला प्रयोग
- सुलभ इंटरनॅशनलने या प्रश्नाचे संधीत रूपांतर करून त्याला यशस्वी व्यवसाय बनविले.
- सुलभ इंटरनॅशनलने अशी एक लाख स्वच्छतागृहे देशात उभी केली आहेत.
- बिल गेट्स आणि भारत सरकारचे ग्रामीण विकास मंत्रालय एकत्र येऊन या प्रकल्पावर काम करणार.