आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bindumadhav Khire Article About Homosexuality, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समलैंगिकतेविषयी अवैज्ञानिक माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचार्य वामनराव जगताप यांची समलैंगिकतेविषयीची बेताल वक्तव्ये वाचली. त्यांचे समलैंगिकतेबद्दल जे आक्षेप आहेत त्यांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वत: समलिंगी आहे व या विषयावर गेली 11 वर्षे काम करत आहे. जगताप यांनी म्हटले आहे की, ‘हा तर्कशास्त्राचा विषय नसून वैद्यकीय शास्त्राचा विषय आहे.’ ते पुढे म्हणतात की, अनेक डॉक्टरसुद्धा आता समलिंगी लोकांची बाजू घेत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘आयसीडी-10’ व ‘डीएसएमव्ही’ या दोन्ही याद्यांमध्ये समलिंगी असणे अनैसर्गिक आहे किंवा आजार आहे, असं सांगितलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच ‘इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटी (संदर्भ : टाइम्स ऑफ इंडिया 7 फेब्रुवारी 2014) या भारतातील सर्वात मोठय़ा मानसोपचार तज्ज्ञांच्या संस्थेने सांगितले आहे की, समलैंगिकता हा आजार वा विकृती नाही. पण त्यांचं मत जगताप यांना मान्य नाही. त्यांच्यापेक्षा जगताप यांना या विषयातील जास्त माहिती आहे असे म्हणायचे का?

त्यांचं दुसरं म्हणणं आहे की, निसर्गात समलैंगिकता दिसत नाही. प्रा. जगताप यांचे याविषयीचे अज्ञान किती आहे, याचे एकच उदाहरण देतो. त्यांनी ब्रुस बागेमिल यांचे ‘बायोलॉजिकल एक्झुबरन्स : अँनिमल होमोसेक्शुअँलिटी अँड नॅचरल डायव्हर्सिटी’ हे पुस्तक वाचावे. यात 450 पशुपक्ष्यांच्या जाती-प्रजातींमधील समलैंगिकता, ट्रान्सजेंडर याचा अभ्यास करून लेखन केले आहे. प्रा. जगताप यांचा समलैंगिकता ही अनैसर्गिक आहे, हा आरोप अज्ञानातून किंवा समलिंगी द्वेषातून किंवा दोन्हीतून आलेला आहे. जगताप असे म्हणतात की, तीन-एक शतकापूर्वी साम्राज्यवादी देशांनी, समलैंगिकतेवर कायद्याने लगाम घातला. हे खरे की, आठव्या हेन्रीच्या काळात समलिंगी संबंधांना देहांताची शिक्षा होती. (Buggery Act, 1533) त्या वेळच्या कायद्यांवर ख्रिश्चन धर्माचा पगडा होता. पुढे (1860 मध्ये) ब्रिटिशांनी 377 कायदा भारतात आणला. त्यानंतर मात्र समाजाची बदलती मानसिकता ध्यानात घेता 1956मध्ये हा कायदा बदलला. (संदर्भ : वुल्फ्रेंडेन कमिटी रिपोर्ट अँड फॉलोअप) आपण मात्र अजून मागेच आहोत. हा कायदा ब्रिटिशांनी आणला, पण तो यायच्या अगोदर आपल्या देशात समलैंगिकता नव्हती, असे नाही. त्याचे वर्णन वात्स्यायनांनी कामसूत्रात केले आहे. आपण कामसूत्र वाचले आहे का?

जगताप म्हणतात की, ही गोष्ट घृणास्पद आहे. अनेक जणांना अनेक लैंगिक कृत्ये (भिन्नलिंगी संबंधातीलसुद्धा) घृणास्पद वाटतात. पण ‘प्रौढ’ या शब्दाचा अर्थ असा की, आपली आवड, निवड, नैसर्गिक गरज पूर्ण करण्याचा मार्ग ठरवण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. जर तो पुरुष प्रौढ असेल, संमतीने, खासगीत व एका प्रौढ पुरुषाबरोबर ती क्रिया करत असेल, तर ती तुम्हाला घृणास्पद वाटते की नाही, याच्याशी संबंध काय? ते तुमचं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय आवडत नाही, तुमची गरज तुम्ही कशी भागवता, या गोष्टींवर मी किंवा इतर कोणी का भाष्य करावं?
जगताप आपल्या लेखाद्वारे पुरोगामित्वाचा झेंडा फडकवणार्‍यांवर, आगपाखड करत आहेत, ही या देशासाठी काही नवीन गोष्ट नाही. पूर्वी र. धों. कर्वेंनाही अशाच मानसिकतेच्या व्यक्तींकडून खूप विरोध झाला होता. मात्र आज सुदैवाने, पुरोगामी विचारांच्या व्यक्ती आम्हाला साथ देत आहेत. अशाच पुरोगामी विचारांचे न्या. ए. पी. शहा, न्या. एस. मुरलीधर यांना प्रकर्षाने जाणवलं की, आमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे. असाच पुरोगामी विचार करणार्‍या अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी समलैंगिकता नैसर्गिक आहे व आयपीसी 377 कलम बदलावे, अशी प्रतिज्ञापत्रके सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहेत. पुण्यात आम्ही दरवर्षी समलिंगी अभिमान मोर्चा काढतो. त्यात अनेक भिन्नलिंगी स्त्री-पुरुष आणि हो, काही जण आपल्या लहान मुलांना बरोबर घेऊन सहभागी होतात. गेल्या वर्षी फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बरगेसाहेब व त्यांच्या सहकार्‍यांनी आम्हाला गुलाबाची फुलं दिली. याला पुरोगामी म्हणतात. आमचा आवाज शहरातच नाही, तर हळूहळू खेड्यापाड्यांत पोहोचू लागला आहे. आपण आदिवासींचा उल्लेख केलात म्हणून आवर्जून सांगतो, मला भेटायला काही जण अगदी दुर्गम भागातून येतात. जिथे 377 कलम काय आहे, हे माहीत नाही; पण तिथेही काही पुरुष असे आहेत, की त्यांना दुसर्‍या पुरुषाची साथ हवी आहे, ती त्यांची गरज आहे. उघडपणे त्यांना बोलता येत नसले तरी त्यांची वेदना सर्वत्र दिसते. तो आवाज मला आणि या पुरोगामी विचारांच्या व्यक्तींना कळतो. हृदयाला भिडतो. तुमच्यासारख्याला तो कळणार नाही. त्यासाठी माणुसकी व प्रगल्भता या दोन्ही असाव्या लागतात व या दोन्हींचा अभाव तुमचा या लेखामध्ये ओसंडून वाहत आहे. खरं तर पुरोगामी विचारांतूनच देश घडतो. हजारो वर्षांची सनातनी संस्कृती डोक्यावर वाहून तो घडत नाही. आज आम्हाला सर्वोच्च न्यायालयाची साथ मिळाली नाही, हे खरं आहे. परंतु प्रौढ व संमतीने संग करणार्‍या भिन्नलिंगी व्यक्ती असोत किंवा समलिंगी व्यक्ती असोत, त्यांच्या शयनगृहात डोकावण्याचा प्रा. जगतापांनाच नाही तर कोणालाच अधिकार असता कामा नये.
(लेखक पुण्याच्या समपथिक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
(khirebindu@hotmail.com)