आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक व भारतातील अनागोंदी (भीष्मराज बाम )

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिकचे खेळ हे भारतीयांसाठी नाहीत. ज्या देशात खेळाडू म्हणजे फक्त सर्कशीतली जनावरेच आहेत, चांगला खेळ केला तर त्यांच्यापुढे चार तुकडे टाकले जातात आणि नाही केला तर चाबकाचे फटके मारले जातात.

ज्या देशात सुरेश कलमाडी, ललित भानोत आणि वाल्सन व आदिल सुमारीवालासारखे त्यांचे चमचे क्रीडा क्षेत्राचे शहेनशहा असतात, खेळाडूंनी जिवाची बाजी लावली तरी तो त्यांचा मूर्खपणा आहे, असे म्हणण्याचा निगरगट्टपणा दाखवू शकतात, त्या देशातल्या खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धा जिंकण्याची पात्रता येणे कसे शक्य आहे? भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा महानिदेशक असलेल्या आयएएस अधिकाऱ्याने क्रीडा खात्याला आणि सर्व क्रीडा संघटनांना क्लीन चिट देऊन रिओ ऑलिम्पिकच्या मानहानीला खेळाडूच जबाबदार असल्याचा अहवाल केंद्र शासनाला सादर केला आहे. हे अर्थातच अपेक्षित होते. भारतीय क्रीडाक्षेत्राचा ज्यांनी एकत्रितपणे सत्यानाश केला आहे, त्यांच्यावरच चौकशीचे काम सोपवले तर ते एकमेकांना सफाईदारपणे सांभाळून घेणारच. ज्या योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले गेले, त्या योजनांचेच हे अपयश आहे, हे मान्य करायला कोणीच तयार नाही. आता या मंडळींनीच नव्या योजना आखायच्या आहेत. मग तर अब्जावधी रुपये खर्च होतील, ते कोठे गडप होतील हे कोणाला कळणारसुद्धा नाही. चार वर्षांनी टोकियो ऑलिम्पिक येईल. तिथेही हेच होणार आहे आणि परत आपल्या खेळाडूंना फटके खावे लागणार आहेत. कशासाठी खेळायचे त्यांनी? त्यांचा राग अभिनव बिंद्रा, सायना नेहवाल, गगन नारंग आणि त्यांच्यासारख्या प्रथितयश खेळाडूंवर सर्वात जास्त आहे. कारण याच खेळाडूंनी पदके मिळवून यांची अब्रू झाकायची होती. भारताकडून पाच-दहाच नव्हे तर चांगल्या पंचवीस-तीस पदकांची अपेक्षा क्रीडा जगत करत असते. ब्राझीलसारखा सुमार संघटन कौशल्य असलेला आणि शिस्तीचा अभाव असलेला देशसुद्धा ७ सुवर्ण, ६ रजत आणि ६ कांस्यपदकांची कमाई करतो, तिथे जगभर आपल्या संस्कृतीचा, ज्ञानाचा आणि कौशल्याचा टेंभा मिरवणाऱ्या भारताकडून साहजिकच जास्त अपेक्षा असणार.

आपले नोकरशहा तर एकेक विनोदी संकल्पना पुढे आणून आपल्या राजकारण्यांना तोंडघशी पडण्याचे काम नेहमीच करत असतात. नवा विनोद म्हणजे २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकटा महाराष्ट्रच २० सुवर्णपदके मिळवणार आहे. उर्वरित भारतीय प्रांतांनीसुद्धा अशीच पदके मिळवली तर इतर कोणत्याही देशाला काही मिळण्याची संधीच राहणार नाही. ही बातमी समजल्यावर अमेरिका, चीन, इंग्लंड वगैरे देशातल्या लोकांना धडकीच भरेल! आपली मजल दक्षिण आशियाई स्पर्धांच्या पलीकडे जाऊच शकणार नाही हे या गुर्मीत असलेल्या लोकांना कोण समजावणार?

या वेळी मी रिओ ऑलिम्पिकसाठी बंगळुरू येथे भरलेल्या सराव शिबिरात तीन आठवडे हजर होतो. तिथे चाललेले क्रीडाक्षेत्राचे धिंडवडे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्याने मला या मंडळींच्या कारवायांचा अगदी उबग आला. अॅथलेटिक्स फेडरेशनचा हट्ट असतो की त्यांनी आणलेल्या परदेशी प्रशिक्षकांकडूनच सर्वांनी प्रशिक्षण घ्यायला हवे; पण रशियन प्रशिक्षक निकोलाय स्नेसेरेव्ह हा तिरशिंगराव म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या कित्येक खेळाडूंना त्याच्या ओव्हर ट्रेनिंगच्या पद्धतीमुळे खेळच सोडून द्यावा लागलेला आहे. ते बिचारे कोणाकडे तक्रार करणार? जैशाव्यतिरिक्त सारे मॅरेथॉन धावपटू आपापल्या भारतीय प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आणि फेडरेशनने दिलेल्या हुकुमाप्रमाणे सराव करत होते. त्यांच्या सरावात जास्तीत जास्त अडथळे आणण्याचे काम दिल्लीहून ललित भानोत आणि त्यांचे पित्ते करत होते. त्यांना जुलै महिन्यात हैदराबादला जाऊन शर्यतीत भाग घ्यावा लागला. त्यांचा फॉर्म जावा आणि ते थकून जाऊन त्यांची कामगिरी खराब व्हावी याकरता त्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चाळीस किलोमीटर धावायला लावण्यात आले. त्यांना आणि त्यांचे प्रशिक्षक सुरेंद्रसिंग यांना रिओला खूप उशिरा पाठवण्यात आले. फेडरेशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी तर कमालच केली. स्पर्धेच्या आधी दोन दिवस कविता राऊतचा सर्वांसमोर अपमान केला, हेही आम्हाला इतरांनी सांगितले. कारण तिने तक्रार केली तर तिचे पुढचे करिअर धोक्यात येणार, हे तिला ठाऊक होते.

सर्वांवर कडी तर महाराष्ट्र असोसिएशन आणि महाराष्ट्र शासनाने केली. पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, ललिता बाबर या रिओ ऑलिम्पिक गाजवणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कविता राऊतचाही त्यांच्याबरोबर गौरव केला गेला; पण यातून तिचे प्रशिक्षक विजेंदरसिंग यांना कटाक्षाने वगळण्यात आले. कविता आकाशातून पडली असे या मंडळींचे म्हणणे आहे काय? पण विजेंदरसिंग हे सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे खेळाडू नाशिकमध्ये घडवत आहेत आणि हे खेळाडू त्यांच्या लाडक्या रशियन प्रशिक्षकाच्या शिष्यांना मागे टाकत आहेत. यासाठी महाराष्ट्र असोसिएशन आणि भारतीय फेडरेशनचा त्यांच्यावर राग आहे. आता तर त्यांच्या मागे उभ्या राहिलेल्या नाशिक जिल्हा अॅथलेटिक्सलाच बरखास्त करून तिथे आपल्या पित्त्यांची समिती या लोकांनी नेमली आहे. ज्या देशात संघटनाच भारतीय खेळाडूंच्या विरुद्ध असेल त्या देशाने उगीच ऑलिम्पिक स्पर्धांची पदके मिळवण्याची आशा कशाला करायची?