आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा नवा अंतर्कलह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील वर्षी या सुमारास लोकसभा निवडणुका झालेल्या असतील. यूपीए त्या निवडणुका मनमोहन सिंग व राहुल गांधी या वयस्कर व युवा चेहर्‍यांच्या जोडीला पुढे करूनच लढवील, असे राजकीय चित्र आज तरी देशाच्या समोर दिसत आहे. अनेक घोटाळ्यांचे आरोप झेलत, अनेक मंत्र्यांना वेळोवेळी मंत्रिमंडळातून डच्चू देत, अनेक चौकशी आयोग वगैरे नेमत नेमत प्रचंड डागाळलेला चेहरा घेऊन का होईना दहा वर्षे सलग सरकार चालवल्याचे श्रेय अर्थतज्ज्ञ-पंतप्रधानांना द्यावेच लागेल. काँग्रेसकडून (पुन्हा निवडणुका जिंकल्या तर) कोण पंतप्रधान होईल याबद्दल यूपीएच्या घटक पक्षांमध्ये किंवा खुद्द
काँग्रेसमध्ये अजूनही उघडपणे विशेष चर्चा सुरू झालेली नाही.

परंतु 2014 मध्ये आजचे प्रमुख विरोधी पक्ष भाजप व एनडीए दिल्लीत आपले सरकार स्थापण्याचे मनसुबे रचत असताना त्यांच्यामध्ये किती वैचारिक मतभेद आहेत व पंतप्रधानपदासाठी अनेक उमेदवार इच्छुक असतील असे चित्र दिसतेय. आतापर्यंत आधी गुजरातचे कार्यक्षम, यशस्वी आणि तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झालेले नरेंद्रभाई मोदी यांचे नाव सर्वात पुढे होते. त्यावरूनही भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू होती आणि त्यातच अप्रत्यक्षपणे बिहारचे तितकेच यशस्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शड्डू ठोकून स्वत: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे अत्यंत हुशारीने सुचवले. त्यामुळे भाजप व एनडीएमध्ये पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मोदींवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवून त्यांनी ज्याला राजकारणात ‘पोझिशनिंग’ म्हणतात, ती व्यवस्थितपणे घेतली.
परंतु आता तिसराच ‘उमेदवार’ स्वत: लालकृष्ण अडवाणी यांनीच पुढे ढकललाय, ते म्हणजे मध्य प्रदेशचे शांत, सरळ स्वभावाचे व कुठलाही ‘डाग’ नसलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान. अडवाणी (वय 85) यांचे आणि नरेंद्र मोदी (62) यांचे सूत आता जमत नाही. अडवाणी यांना स्वत: पंतप्रधान व्हायला केव्हाही आवडेलच; परंतु हवी तशी परिस्थिती जर पुढील वर्षी विविध राजकीय कारणांमुळे आली नाही तर अडवाणी पक्षामध्ये मोदींसाठी अडथळे निर्माण करू इच्छितात, हे काही आता गुपित राहिलेले नाही. मागील आठवड्यात मध्य प्रदेश शासनाच्या एका कार्यक्रमात चौहान यांच्या कामाची केवळ तोंडभरून स्तुतीच न करता पुढे जाऊन त्यांनी गुजरातशी मध्य प्रदेशची तुलना केली व मोदी यांना खाली दाखवण्याचे काम शिताफीने केले. माजी उपपंतप्रधान म्हणून अडवाणी अटलबिहारी वाजपेयींबरोबर पाच वर्षे सत्तेत होते. ग्वाल्हेरच्या कार्यक्रमात त्यांनी शिवराज यांची वाजपेयी यांच्याबरोबर तुलना करून पुढचे पंतप्रधान शिवराजसिंह असू शकतील, असे विधान करून भाजपमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण केला. मोदी यामुळे खूपच रागावले. मध्य प्रदेश हे मागासलेले राज्य. अर्थात बिहार, राजस्थान व उत्तर प्रदेशबरोबर ‘बिमारू’ श्रेणीतील. शिवराज (54) अचानक बाबुलाल गोर यांना हटवून प्रमोद महाजन यांच्या आशीर्वादाने नोव्हेंबर 2005 मध्ये मुख्यमंत्री बनले. 2003 च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांंमध्ये 10 वर्षे सलग सरकार चालवलेले दिग्विजयसिंह यांच्या काँग्रेसला पराभूत करून उमा भारती मुख्यमंत्री झाल्या, परंतु त्यांना डबळीच्या एका न्यायालयीन प्रकरणामुळे पद सोडावे लागले. मग काही दिवस गोर यांनी भाजपचा गाडा पुढे ओढला व लगेचच शिवराजसिंह यांना मुख्यमंत्री बनवण्यात ‘हायकमांड’नी आपली खेळी खेळली. अर्थात गेली जवळपास नऊ वर्षे ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. आधी ते विदिशा या भोपाळजवळच्या जागेवरून खासदार बनले होते, जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी लखनऊची जागा स्वत:जवळ ठेवत विदिशातून राजीनामा देत पंतप्रधानपद सांभाळले होते. विदिशाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन शिवराज यांनी पुढे बुदनीची विधानसभेची जागा जिंकल्यावर आता सुषमा स्वराज विदिशाच्या खासदार आहेत. ही पार्श्वभूमी मोदी-शिवराज-अडवाणी या नव्या समीकरणाला (?)समजायला सोपी जाईल.

जसा मोदींनी गुजरातमध्ये विकास घडवून आणला, मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण केले, राज्याला स्थैर्य प्रदान केले, सांप्रदायिक दंगली होऊ दिल्या नाहीत तसेच शिवराजसिंह यांनी मध्य प्रदेशला विकासाच्या शर्यतीत बरेच पुढे नेऊन ठेवले आले. कृषी क्षेत्रातील विकास दर देशात सर्वात अधिक म्हणजे 18 टक्क्यांवर आणून ठेवला व एकूण विकास दरही देशात 5 टक्के असताना मध्य प्रदेशचा विकास दर 12-13 टक्क्यांवर नेला. मोदी आणि शिवराज यांच्यामध्ये जो फरक अडवाणी यांनी दाखवून दिला तो मुख्यत्वे असा होता की, गुजरात पहिल्यापासूनच प्रगत व समृद्ध राज्य होते; परंतु शिवराज यांनी वेगवेगळे कार्यक्रम व धोरणे राबवून मध्य प्रदेशला ‘बिमारू’च्या श्रेणीतून बाहेर काढण्याचे दिव्य करून दाखवले.

परंतु शिवराज हे नेहमीच वादविवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी लगेचच उत्तर देऊन वाद शमवण्याचा प्रयत्न केला व स्वत:ला मोदी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर नेऊन ठेवले.

मोदी आणि शिवराज यांची तुलना केली तर मोदी जितके अहंकारी आणि महत्त्वाकांक्षी आहेत तेवढे शिवराज निश्चितच नाहीत. शिवराज मुस्लिमद्वेष्टेही नाहीत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही प्रिय पात्र आहेत; परंतु त्यांच्यात आक्रमकता नाही, इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व खूपच कमी आणि अधूनमधून त्यांची पत्नी साधना सिंह यांच्यावर विरोधी पक्षातील नेते भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. शिवराज स्वत: निर्णय घेण्यात अनेक दिवस लावतात, परंतु तरीही मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागात ते एक ‘हीरो’ आहेत. मोदींचा गुजरातवाद व हिंदुत्ववाद जितका कडवट आहे तितका शिवराज यांचा नाही. ते अजून तरी राष्ट्रीय पातळीवरील नेते किंवा तसे वलय त्यांच्या आसपास अजून तयार झालेले नाही; परंतु अडवाणींनी त्यांची पुन्हा एकदा मोदींशी
तुलना करत (याआधी गुजरातमध्ये बोलताना दोन-तीन वर्षांपूर्वीही अडवाणी यांनी असेच विधान, पण थोडक्यात केले होते.) शिवराज यांना राष्ट्रीय पातळीचे महत्त्व दिले.

अडवाणी स्वत: गुजरातमधून निवडणूक लढवतात, परंतु मोदींशी त्यांचे पटत नसल्याने ते दुसरीकडून निवडणूक लढवतील, असा अंदाज आहे. मोदी व अडवाणी दोघेही कट्टर हिंदुत्ववादी आहेत. अडवाणींचा जहालपणा अटलबिहारी वाजपेयी मवाळपणे सांभाळून घेत असत. शिवराजही तसेच मवाळच, पण धीराचे नेते आहेत.

भारतात अमेरिकेसारख्या थेट निवडणुका होत नाहीत म्हणून शिवराज व मोदींमध्ये (समजा) सरळ लढत झाली तर मोदी निश्चितच शिवराजसिंह यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असतील. दोघेही एकाच पक्षाचे असल्याने शेवटी संघ व भाजपचा पार्लमेंटरी बोर्ड यांचे निर्णय बंधनकारक असतील. सध्या तरी शिवराज यांना नोव्हेंबरच्या मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अडकलेले आहेत. त्या जिंकल्यानंतर ते सलग तीन निवडणुका जिंकल्याचा विक्रम करतील. तोपर्यंत भाजपमध्ये तसेच काँग्रेसमध्येही अनेक बदल घडत राहतील. तेव्हा शिवराज यांना दिल्ली अभी बहुत दूर है...!
abhilash@dainikbhaskargroup.com