आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Lalkrishna Adwani And Narendra Modi Issue

अडवाणींच्या आट्यापाट्या, मोदींचा मल्लखांब! (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता लहान मुलेही आट्यापाट्या हा खेळ फारसा खेळत नाहीत. परंतु भारतीय जनता पक्षाने हा अस्सल आणि बिनखर्चिक खेळ लोकप्रिय करायचा निर्धार केलेला दिसतो. नरेंद्र मोदींना अडवण्यासाठी आता संपूर्ण भाजप नेत्यांची फळी सिद्ध झालेली दिसते. परंतु मोदींची पक्षात एवढी दहशत आहे की ते खेळाचे सगळे नियम झुगारून देऊन ‘भाजपच्या संघाला’च कायमचे बाद करण्याच्या तयारीने मैदानात उतरले आहेत. नरेंद्र मोदी मैदानात उतरले की पंच तेच (आणि सरपंचही!), खेळाडू तेच, नियम तेच ठरवणार आणि ते बाद झाले की नाही हेही तेच जाहीर करणार. सध्या सर्वांचे लक्ष ‘आयपीएल’च्या फिक्सिंगकडे लागलेले असल्यामुळे मोदींच्या या भाजपमधील ‘आट्यापाट्या फिक्सिंग’कडे मीडियाचे पुरेसे लक्ष गेलेले नाही. (जसे ‘आयपीएल’मध्ये गुजरातचे मुख्यमंत्रीही आहेत, हेही मीडियाने दडवून ठेवले आहे.) सध्या देशात दोनच मुख्य प्रश्न आणि दोनच मुख्य व्यक्ती आहेत. ‘बीसीसीआय’चे (अध्यक्ष?) श्रीनिवासन यांचे भवितव्य काय आणि नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार का? परंतु लालकृष्ण अडवाणी यांना नरेंद्र मोदींच्या आक्रमकतेचा अंदाज आला नाही किंवा असेही म्हणता येईल की, मोदींना पक्षांतर्गत शह देण्यासाठी त्यांनी व्यूहरचना बांधायला सुरुवात केली. आट्यापाट्यांमध्ये फिक्सिंग कसे करायचे, हे नरेंद्र मोदींना कळत नाही (आणि ललित मोदींनाही उमगत नाही.) त्यामुळे अडवाणींनी नरेंद्र मोदींच्या चौखूर उधळलेल्या घोड्याला अडवल्याबरोबर सर्वत्र एकच ‘राडा’सुरू झाला. अडवाणी गेली सुमारे 65 वर्षे राजकारणात आहेत. म्हणजे मोदींचे एकूण वय आहे त्याहीपेक्षा जास्त. अडवाणींच्या 1990च्या रथयात्रेचे सारथ्य मोदींनी केले होते. ‘मंदिर वहीं बनाएंगे’चा नारा घेऊन निघालेल्या अडवाणींच्या यात्रेदरम्यानच मोदींनी त्यांच्या ‘स्वदेशी फॅसिझम’चे धडे गिरवले. पुढे हा शिष्य गुरूपेक्षा इतका सवाई निघाला की त्याने गुरूचाच अंगठा कापायचे ठरवले. जेव्हा गुरूला लक्षात आले की आपला हा सारथी-विद्यार्थी आपल्यावरच उलटला आहे, तेव्हा अडवाणींनी मोदींचाच अंगठा मागितला आहे. खरे म्हणजे आट्यापाट्यांमध्ये अंगठा तसा महत्त्वाचा नाही, जसा तो धनुर्धारीला आवश्यक आहे. परंतु भाजपच्या संघात नक्की कोणता खेळ खेळायचा, याबद्दलही एकमत नाही. त्यामुळे मैदान ‘आयपीएल’चे असले तरी त्यात अडवाणी आट्यापाट्यांची रेघ आखतात, तर सुषमा स्वराज ‘खो-खो’ची तयारी करतात. राजनाथसिंह कुस्त्यांचा फड लावतात, तर नितीन गडकरी बॉक्सिंग खेळण्याची तयारी करून हातात ग्लोव्हज घालून येतात. यशवंत सिन्हा लाँग जम्पची तयारी करतात, तेव्हा शिवराजसिंह चौहान उंच उडी आणि पोल जम्पची प्रॅक्टिस करत असतात. नरेंद्र मोदी मात्र गेली 12 वर्षे नेमाने मल्लखांब करत आहेत. अरुण जेटली मात्र अजून आयपीएलची निष्ठा बाळगून आहेत. भाजपचा संघ 2014 च्या फायनलमध्ये काँग्रेसविरोधात उतरणार हे जाहीर झाले असले, तरी नक्की कोणत्या खेळाची ती फायनल असेल, याबद्दल मात्र संघ परिवारात खात्री नाही. मोदींना वाटते की मल्लखांब पुरेसा आहे. त्यावर एकटा व्यायामपटू सर्व प्रकारच्या कसरती निर्विकारपणे करून शेवटी मल्लखांबाच्या निमुळत्या गोट्यावर पद्मासन घालून बसतो. ज्यांनी ‘नमो’ची ती पद्मासनस्थिती छायाचित्रांमध्ये पाहिली असेल, त्यांना खात्री आहे की भाजपच्या इतर खेळाडूंनी कोणताही खेळ निवडला तरी अखेर मल्लखांबावरील कसरतच निर्णायक ठरणार! क्रिकेट असो वा खो-खो, कबड्डी असो वा आट्यापाट्या - त्यांना ‘संघ’ लागतो. मल्लखांबात एकटा जीव सदाशिव. नरेंद्र मोदींची तीच शैली आहे. म्हणूनच अडवाणींनी आकस्मिकपणे शिवराजसिंह चौहान यांना आट्यापाट्यांची रेघ पार करायला सांगितले, तेव्हा मोदी अजिबात डगमगले नाहीत. चौहान मात्र चांगलेच गडबडले. शिवाय मोदींची दहशत एवढी की त्यांनी अडवाणींना न जुमानता आपली कसरत चालूच ठेवली आणि चौहान यांनीच आपण पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत तिसर्‍या क्रमांकावरही नाही, असे जाहीर करून टाकले. फायनल सामन्याला अजून एक वर्ष बाकी आहे. ‘आयपीएल’मधील डावपेचांनी दोन्ही पक्षांना अनेक क्लृप्त्या सुचवल्या आहेत. किंबहुना जेटली आणि राजीव शुक्ला यांना तर आयपीएलमधील व्यूहरचना व खेळी म्हणजे त्या सामन्याची रंगीत तालीमच वाटते. मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग, इतकेच काय, कार्यकारिणीचे फिक्सिंग आणि अर्थातच मीडिया फिक्सिंग या सर्व गोष्टी यापुढच्या वर्षात पक्षांतर्गत आणि जाहीर लढतीत उपयोगी पडणार आहेत. एकेकाळी क्रिकेट हा ‘जंटलमन’ खेळ म्हणून ओळखला जात असे. संसदीय लोकशाहीची निवडणूक प्रक्रियासुद्धा ‘जंटलमनशिप’च होती. परंतु आता ‘फिक्सिंग’ हा नवा मूलमंत्र झाला आहे. नरेंद्र मोदींनी तर स्वत:च्याच संघात आपणहून स्पॉट फिक्सिंग सुरू केले आहे. म्हणजेच मल्लखांबावर बसलेला हा पद्मासनाधिष्ठ स्वामी पक्षातील इतर मंडळी काय काय ‘गेम’ करण्यात गुंतली आहेत, यावरही नजर ठेवून आहे. सोशल मीडिया, टीव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रे या सर्वांना ‘विकत’ घेण्यासाठी मोदींनी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी अमेरिका-प्रशिक्षित तरुणांची एक फळीच उभारली आहे. आता गोव्याची भाजपची बैठक होईल तेव्हा मोदी त्यांचे मल्लखांबावरचे कसब सादर करतीलच; पण ती बैठकच कशी हायजॅक करता येते, हेही दाखवून देतील. त्या बैठकीवर मोदींची असलेली दहशत आजच भासू लागली आहे. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनाच जर ‘फिक्स’ केले तर अडवाणी, सुषमा, जेटली वा अन्य कुणाची काळजी करण्याचे कारण नाही, असे मोदींना वाटते. मोदींचा कार्यक्रम तीन टप्प्यांत अमलात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जमले तर पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून स्वत:ला घोषित करून घेणे - न जमल्यास संपूर्ण प्रचार यंत्रणेचा प्रमुख ही भूमिका बजावायची. त्यानंतरच्या टप्प्यात उमेदवार निश्चित करायचे. तिसर्‍या टप्प्यात किमान 200 जागा जिंकायच्याच. सध्याच्या गणितात ज्या पक्षाला किमान तेवढ्या जागा मिळतील, त्या पक्षाचा पंतप्रधान होईल. मोदींनी त्या दृष्टिकोनातून सर्व व्यूहरचना केली आहे. म्हणूनच अडवाणींनी आट्यापाट्या खेळण्याचे दिलेले आव्हान भिरकावून मोदी मल्लखांबावर कसरती करत आहेत!