आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा ‘नमो’निया( अग्रलेख )

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मला ‘नमो’निया झालेला नाही, मी ठणठणीत आहे’ असे उद्गार विलक्षण उद्वेगाने यशवंत सिन्हा यांनी काढले तेव्हा अर्थातच त्यांना म्हणायचे होते की, भाजपला भले संसर्ग झाला असेल; पण मला मात्र झालेला नाही. परंतु संघ परिवाराच्या परंपरेनुसार आजारपण एकाला आणि उपचार दुस-यावर, अशी स्थिती आहे. म्हणूनच भाजपमधील ‘नमोनिया’चा ताप फणफणल्यावर लालकृष्ण अडवाणींना विश्रांतीचा सल्ला दिला गेला आहे. नागपूरच्या विशेष वैद्यक पथकाने काढलेली ही समांतर आयुर्वेद पद्धती आहे! असे म्हणतात की, आयुर्वेदात रोगाचे मुळापासून उच्चाटन करण्याचे तंत्र आहे. परंतु नागपूरमधील तज्ज्ञ वैद्यांच्या समांतर आयुर्वेदानुसार रोग हा काहीसा भुताटकीसारखा असतो. त्यामुळे मंत्र-तंत्र करून तो रोग (किंवा ते भूत) उतरवावा लागतो! म्हणूनच अडवाणींना विश्रांतीचा सल्ला देऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

आता ‘नमो’ मंत्राने अवघा देश निदान एक वर्ष भारावला जाईल. टीव्ही, वृत्तपत्रे, फेसबुक, ट्विटरसारखा ‘सोशल मीडिया’ असा सर्वत्र आता मंत्रजागर सुरू होईल. या मंत्राच्या प्रभावाखाली येऊन भारतातील मतदार लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या भाजपला किमान 220 जागा मिळवून देईल, असा अंदाज मोदीप्रणीत काही तज्ज्ञ मंडळी करू लागली आहेत. यात मंत्रमोहिनीमुळे झालेला भ्रम किती आणि सत्य किती हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. पण निदान वर्षभर बरेच भोपळे भ्रमिष्टासारखे वागतील. अण्णांच्या भ्रमाचा भोपळा फुटायलाही वर्ष लागले होते. मोदींचाही अण्णा होईल की रामदेवबाबा हे पुढच्या वर्षी मे महिन्यातच कळेल. संघ परिवार नवनवीन संज्ञा व संकल्पना बाजारात आणण्यात तरबेज आहे.

लालकृष्ण अडवाणींना ‘लोहपुरुष’ आणि अटलबिहारी वाजपेयींना ‘विकासपुरुष’ असे संबोधले जात असे. अनेकदा ‘लोहपुरुष’ आणि ‘विकासपुरुष’ यांच्यात तीव्र सत्ताकलह होत असे. त्या कलहामुळेच 2004 मध्ये ‘इंडियाची शायनिंग’ कल्हई उडाली आणि भाजपचा दारुण पराभव झाला. भाजपची लोकसभेतील सदस्यसंख्या 182 वरून 138 वर आली आणि त्यांच्या तथाकथित राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीतून बरेच मित्रपक्ष बाहेर गेले. काही तर चक्क काँग्रेसप्रणीत यूपीएत सामील झाले. पुढे 2009 मध्ये तर लोहपुरुष अडवाणी यांचे नाव भाजपने पंतप्रधानपदासाठी घोषित केल्यानंतर पक्षाची सदस्यसंख्या 116 वर आली. राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाने असा निष्कर्ष काढला की, लोहपुरुष आणि विकासपुरुष या दोन व्यक्ती असल्यामुळे अशी पीछेहाट झाली. नरेंद्र मोदी हे ‘द्विपुरुष’ आहेत. म्हणजे ते लोहपुरुष असल्याचे त्यांनीच 2002 मध्ये मुस्लिमांच्या महाहत्याकांडावरून सिद्ध केले आहे. गेल्या पाच वर्षांत अंबानी, अदानी आदी उद्योगपतींना अब्जावधी रुपयांची अनुदाने देऊन मोदींनी आपण ‘विकासपुरुष’ही असल्याचे दाखवून दिले.

आता या द्विपुरुषी ‘अद्वैताच्या’ जोरावर 220 काय, स्वत:चे स्पष्ट बहुमतही प्रस्थापित करता येईल अशी खात्री भाजपला वाटू लागली आहे, हे गोवा येथील अधिवेशनात नव्या उन्मादात सांगितले जात होते. या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली आणि मिझोराम येथे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या उन्मादाची कसोटी तेव्हा लागेल. जर ही पाचही राज्ये भाजपने जिंकली तर हा उन्माद अधिकच उग्र होईल. उन्मादाचा सामना प्रतिउन्मादाने करायचा नसतो. उन्माद उतरवण्याचा एकच मार्ग म्हणजे कर्मवाद. काँग्रेसला लोकमान्य टिळकांनी सांगितलेला कर्मण्यवाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला संघर्षवाद अमलात आणावा लागेल. परंतु सध्या तरी काँग्रेस गलितगात्र अवस्थेत आहे. या नव्या ‘धर्मयुद्धा’साठी त्यांना प्रेरणा द्यायला व मार्गदर्शन करायला कुणीही भगवान श्रीकृष्ण नाही. परंतु नरेंद्र मोदींनी आक्रमकपणे चढाई करून आता पक्ष ताब्यात घेतला आणि अमेरिकास्थित ‘एमबीए’ तज्ज्ञांच्या मदतीने ते त्यांची ‘किलर इन्स्टिंक्ट’ दाखवू लागतील. आजवरचा त्यांचा इतिहास पाहता, ते ज्या शिडीवरून चढतात, तीच शिडी वर पोचल्यावर ढकलून देतात असा आहे. लालकृष्ण अडवाणींनी मोदींना 2002 मध्ये जीवदान दिले होते, त्या वेळी पंतप्रधान वाजपेयींनी नरेंद्र मोदी हा देशाला कलंक आहे असे म्हटले होते.

गुजरातमधील मुस्लिमांच्या हत्याकांडामुळे देशाची प्रतिमा डागाळली गेली आहे, असे वाजपेयींनी गोव्यालाच झालेल्या भाजप अधिवेशनात म्हटले होते. तेव्हा मोदींच्या रक्षणार्थ लालकृष्ण अडवाणी धावून आले आणि त्यांनी मोदींना ‘देशातील सर्वात समर्थ मुख्यमंत्री’ असा किताब बहाल केला. जर अडवाणींनी मोदींना तसे प्रशस्तिपत्र दिले नसते तर मोदींचा तेव्हाच राजकीय अस्त झाला असता. आता मोदी समर्थकांनी थेट अडवाणींच्याच घरावर मोर्चा काढून त्यांना लक्ष्य केले. गोव्यात तर इतका उन्माद होता की जर मोदींच्या नावाची, निवडणूक प्रचार मोहिमेचे सर्वेसर्वा म्हणून घोषणा केली गेली नसती तर तेथेच मोदी समर्थकांनी धिंगाणा घालून भाजप अध्यक्षांची कोंडी केली असती. त्यामुळे वातावरण चिघळले असते आणि पक्ष फुटणार की काय असे वातावरण तयार झाले असते. भाजप ही राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाने उभी केलेली राजकीय संघटना आहे. म्हणूनच संघाने हस्तक्षेप करून अध्यक्ष राजनाथसिंह यांना आदेश दिला की मोदींना ‘सरसेनापतीपद’ बहाल करा. संघाने अशा रीतीने पक्षांतर्गत यादवी टाळली असली तरी पक्षाच्या अंगात शिरलेला ताप उतरलेला नाही. तो उतरण्याची चिन्हे नाहीत. ज्या संघाने मोदींना चढवले आहे, त्या संघालाच मोदी पुढे ढकलून देऊ शकतील, ही जाणीवही काही संघनेत्यांना आहे. म्हणजेच ‘नमोनिया’ अधिक गंभीर होत जाणार आहे.