आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगीतिक साहित्यिकाचा गौरव (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा मार्टिन ल्यूथर किंग जगाच्या इतिहासाला वळण देणारे वर्णद्वेषविरोधी ‘I Have A Dream’ असे उद््बोधन असलेले ऐतिहासिक भाषण देत होते, त्या वेळी वयाच्या विशीत असलेला बॉब डिलन स्टेजवर किंग यांच्यापासून काही फुटांवर उभा होता. त्याच ऐतिहासिक सभेत डिलनने गायलेली ‘Only a Pawn in Their Game’,‘Blowin in the Wind’, ही दोन गाणी केवळ अमेरिकेतल्या मानवी हक्क, वंशवादाच्या लढ्याला नव्हे तर जगातल्या शोषितांच्या लढ्यांना प्रेरणा देणारी ठरली. अमेरिकेचे युद्धपिपासू धोरण, व्हिएतनामवरचा हल्ला, कृष्णवर्णीयांना मिळणारी सापत्नभावाची वागणूक, मानवी हक्कांसाठी सुरू असलेले लढे यामुळे अमेरिकेचे केवळ राजकारण नव्हे तर सांस्कृतिक वातावरणही कमालीचे तप्त झाले होते. ६०चे दशक हा ‘काउंटर कल्चर मुव्हमेंट’चा काळ होता. (याच काळात शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, आत्माराम पाटील, वसंत बापट, लीलाधर हेगडे यांनी महाराष्ट्र ढवळून काढला होता) युरोप-अमेरिकेत सिनेमा, नाटक, साहित्य, संगीत आणि राजकीय विश्वात परंपरेला धक्के देत दिवसागणिक स्फोट होत होते. अशा परिस्थितीत व्यक्तिस्वातंत्र्य, मानवाधिकार, आर्थिक संधी, निर्वासितांचे लोंढे व त्याला कवेत घेणारे ‘अमेरिकन ड्रीम’ रुजत होते. रोमँटिसिझमच्या या भारावलेल्या काळात बॉब डिलनचे संगीत अमेरिकेच्या लोकसाहित्यात लपलेल्या विद्रोहाला वाट करून देत होते. कथा, कादंबरी, नाटकाबरोबर संगीतही राजकीय भाष्य करणारे माध्यम असते, असे सांगणाऱ्या बंडखोरांचा तो नायक होता. म्हणून डिलन हा निषेध, आव्हान व असहकार अशा गोष्टींनी भारलेल्या अस्वस्थ काळाचा दूत होता, असेही गौरवाने म्हटले जाते. नोबेल पुरस्कार हा गीतकार-संगीतकाराला देण्याची प्रथा नाही. अपवादात्मक म्हणता येईल असा १९१३मध्ये रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पुरस्कार त्यांच्या ‘गीतांजली’ काव्यसंग्रहाला दिला होता. पण डिलनची बाब वेगळी होती. त्याच्याकडे शब्द व संगीत अशी दुपेडी प्रतिभा होती. म्हणून नोबेल कमिटीला त्याला पुरस्कार देताना डिलनची काव्यप्रतिभा ही अमेरिकी लोकसंगीत परंपरेला पुढे घेऊन जाणारी असल्याचे कौतुकाने नमूद करावे लागले. जर अडीच हजार वर्षांपूर्वीचा मानवी इतिहास पाहिला तर होमर व सप्फो या महापंडितांनी लिहिलेली महाकाव्ये ही श्रवणीय होती आणि त्यांचे सांगीतिक सादरीकरणही केले जात होते. त्यांच्या पंक्तीत बॉब डिलन येतो व तो अाज आपल्यासोबत असल्याचे गौरवोद््गार नोबेल कमिटीने काढले आहेत.
एका अर्थाने यंदा नोबेल कमिटीने शांततेचा व साहित्याचा पुरस्कार देताना मोठे राजकीय धक्के दिले आहेत. गेल्या आठवड्यात कोलंबियाचे अध्यक्ष ज्युआन मॅन्युएल सँतोस यांना आंतरराष्ट्रीय शांततेचा पुरस्कार देताना कोलंबियातील यादवी पुन्हा उफाळू नये, यासाठी अप्रत्यक्ष नैतिक दबाव टाकलेला आहे. तसाच दबाव डिलन यांना पुरस्कार जाहीर करून नोबेल कमिटीने अमेरिकेवर टाकला आहे. २००९मध्ये अध्यक्षपदाचे एक वर्ष पुरे होतानाच बराक ओबामा यांना शांततेचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याला पार्श्वभूमी अमेरिकेत आलेली महामंदी (ओबामांनी ‘अमेरिकन होप’ची दिलेली घोषणा), इराक-अफगाणिस्तानातून अमेरिका फौजांचे मायदेशी परतणे, सद्दाम हुसेन याला फाशी दिल्यामुळे उद्ध्वस्त झालेला इराक आणि ओसामा बिन लादेन याने पसरवलेला आंतरराष्ट्रीय दहशतवाद अशी व्यापक होती. अशा अस्थिर परिस्थितीत ओबामा यांनी युद्धखोर अमेरिकेची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला होता. आता सुमारे दशकानंतर अमेरिका पुन्हा वंशवाद, भ्रष्टाचार, मुस्लिम द्वेष, निर्वासितांवर बंदी अशा वावटळीत सापडली आहे. दुर्दैवाने रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर त्यांची दांभिकता व मस्तवालपणा हा जगाला पुन्हा युद्धाच्या खाईत घालू शकतो ही भीती आहे. अशा काळात बॉब डिलनची युद्धविरोधी, मानवी हक्कांची भाषा, त्याच्या संगीतातील सामर्थ्य आजही आपल्यामध्ये जिवंत आहे, असा महत्त्वाचा संदेश नोबेल कमिटीला द्यावासा वाटतो आहे. अनेक पिढ्यांना नादावणारा डिलन स्वत:ला लोकसंगीतातली गुह्ये शोधणारा संशोधक म्हणवून घेतो. ‘मी जेव्हा इतिहासात शिरतो तेव्हा मी एका परंपरेचा शोध घेत जातो, आणि त्या परंपरांना पुढे घेऊन जाणारा मी पाईक आहे,’ असे तो सांगतो. जेव्हा नोबेल पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा बड्या साहित्यिकांनी संगीताला नोबेल मिळाले याची तारीफ केली. पूर्वी काही टीकाकार डिलन याला संगीतातले काही येत नाही अशी टीका करत होते. या टीकाकारांना डिलन त्याच्या काव्यप्रतिभेबरोबर आवाजानेही पुरून उरला आहे. साहित्य व संगीत यांच्यात पूल बांधणारा डिलन हा ‘अमेरिकन ड्रीम’चे प्रतीक नव्हे, तर समस्त मानवतेला कवेत घेणारा शांतता दूत आहे. त्याचे शब्द व सांगीतिक धून या चिरंतन आहेत. या चिरंतन शब्दसुरांना नोबेल जाहीर करून कमिटीने अभिजात साहित्याची व्याख्याही विस्तारली आहे.
बातम्या आणखी आहेत...