आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉब डिलनची बंडखोर लोकधून (जयराज साळगावकर)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहित्याचे नोबेल जाहीर झालेल्या रॉबर्ट अॅलन झिमरमन ऊर्फ बॉब डिलन (२४ मे १९४१) या कवी-गायकाची यशोगाथा अविस्मरणीय आणि अविश्वसनीय आहे. व्हिएतनाम युद्ध, रिचर्ड निक्सन यांची अरेरावी राजवट हा डिलनच्या कारकीर्दीचा परमोच्च बिंदू होता. पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या या कवीने अमेरिकन नागरी हक्काचे समर्थन आणि युद्धविरोधी भूमिकेद्वारे जगातील तरुणांना भुरळ घातली होती. त्याच्या गाण्याचा मूळ गाभा हा अमेरिकन लोकसंगीताच्या अंगाने जातो. परंतु डिलन जेव्हा न्यूपोर्ट फोक फेस्टिव्हलमध्ये गेला होता, तेव्हा त्याने लोकसंगीतातील अॅकॉस्टिक गिटारला फाटा देऊन, प्रस्थापितांच्या विरोधात बंड पुकारत इलेक्ट्रिक गिटार वापरायला सुरुवात केली. त्याच्या या कृतीने संगीतक्षेत्रात मोठाच गदारोळ माजला होता. नंतर मात्र फोक रॉक वाजवणारे, गाणारे नील यंगसारखे कलाकारही इलेक्ट्रिक गिटार वाजवू लागले.
डिलनचे दोन आदर्श होते. दोघेही प्रस्थापितांविरुद्ध चळवळीत रस्त्यावर उतरून बंड पुकाणारे. त्यातील एक म्हणजे, वुडी गथ्री. पेशाने हा साइन बोर्ड रंगारी होता व भावनेने युनियन लीडर होता. रेल्वेने गावोगाव फिरून बोर्ड रंगवणे,फॅक्टऱ्यांच्या दारावर गिटार वाजवत कामगारांचे प्रबोधन करणे, हा त्याचा धंदा. तर जॉनी कॅश देशभरच्या तुरुंगांत जाऊन पर्यावरणवादी आणि मानवी भावनेने आेथंबलेली गाणी गात होता. दोघेही रूढार्थाने पॉप रॉक सिंगर. डिलन या दोघांच्या खांद्यावर उभा. त्यांच्याप्रमाणेच कविता, गाणी लिहीत होता, गात होता, फिरत होता. थॉमस डिलन या इंग्लिश कवीकडून त्याने डिलन हे नाव उचलले. डत्याच्यावर रॉबर्ट जॉन्सन हा अंध गायक व हँक विलियम्सचाही प्रभाव होता. पुढे त्याने फोक, ब्लूज, रॉक अँड रोल हे सर्व प्रकार हाताळले.
आमच्या पिढीला डिलनचे दर्शन अगदी प्रथम झाले, ते त्याने गायलेल्या ‘कॉन्सर्ट फॉर बांगलादेश’ या सिनेडॉक्युमेंट्रीतून (१९७१). ‘ब्लोइन इन द विंड’, ‘जस्ट लाइक अ विमेन’ ही पुढे विश्वगीत बनलेली गाणी त्याने जॉर्ज हॅरिसन (बिटल्स) यांच्यासाठी आणि बांगलादेशाच्या मदतीसाठी गायली. वयाच्या सोळा-सतराव्या वर्षी अनुभवास आलेल्या त्या क्षणांमध्ये पुढचे सगळे आयुष्य बदलवून टाकण्याची ताकद होती, एवढे मात्र खरे.
चक्क फुटबॉलच्या आकाराचे कुरळे केस, स्टँडवर लोड केलेली हार्मोनिका, हातात गिटार, शरीराच्या मागील बाजूने टाकलेला आर्कलाइट, त्यामुळे अंधुकसा दिसणारा चेहरा आणि मॅडिसन स्क्वेअर न्यूयॉर्कमध्ये जमलेली प्रचंड गर्दी. असे दृश्य तोवर कुणी पाहिलेच नव्हते, ऐकलेच नव्हते, अनुभवलेच नव्हते. त्या वेळी डिलनबरोबर लिहिता, गाता, वाजवता यावे, अशी इच्छा जगातील तमाम कंट्री, फोक, रॉक, जॅझ कलेतील दिग्गजांची होती. त्यातही जॉन बेझ या लोकसंगीत गाणाऱ्या कवयित्रीशी त्याची मैत्री काही काळ टिकली होती. आणि त्यातून ‘लीली रोजमेरी अँड जॅक ऑफ हार्ट््स’सारख्या अप्रतिम बॅलडची निर्मिती झाली. रॉबी रॉबर्टसन यांच्या ‘द बँड’, जेरी गार्सिया यांच्या ‘ग्रेटफुल डेड’, जॉनी कॅश, जॉर्ज हॅरिसन, मार्क नॉफलर आणि डायर स्ट्रेट्स , टॉम पिटी अँड द हार्टब्रेकर्स, ‘ट्रॅव्हलिंग विल्बरीज’ अशा दिग्गज आणि त्यांच्या बँडबरोबर बॉब डिलनने अविस्मरणीय अशा मेगा, गीगा कॉन्सर्ट््स केल्या आहेत. १८ वर्षांच्या कारकीर्दीनंतर ‘द बँड’ या ग्रुपने निवृत्त व्हायचे ठरवले. त्यासाठी ‘द लास्ट वॉल्ट्झ’ म्हणून एक मोठी पार्टी दिली. त्यात ‘द बँड’ बरोबर काम केलेले सगळे कलाकार सहभाग घेताना दिसतात. या पार्टीचे चित्रीकरण करून त्याची ‘द लास्ट वॉल्ट्झ’ ही डॉक्युमेंट्री फिल्म मार्टिन सार्कोझी यांनी दिग्दर्शित केलेली आहे. मार्टिन सार्काेझीच्या अनेक सिनेमांमध्ये पार्श्वसंगीतात (त्याच्या सिनेमांचे पार्श्वसंगीत हा व्यक्तिरेखेप्रमाणे अतिशय महत्त्वाचा भाग असतो) बॉब डिलनच्या संगीताचा वापर होतो. एकूणच डिलनला आजपर्यंत मिळालेल्या मानसन्मानांची यादी केली तर ती यादी म्हणजेच एक लेख हेाईल. ग्रॅमी, गोल्डन ग्लोब, अकॅडमी, हॉल ऑफ फेम (चारदा), पुलित्झर वगैरे वगैरे. मे २०१२मध्ये मिशेल ओबामा यांनी त्याला मेडल ऑफ फ्रीडम हा सन्मान राष्ट्राध्यक्षांच्या वतीने दिला आहे.
डिलनने अमेरिकन सत्तेविरुद्ध बंड करून नेता व्हावे, असा जनमताचा रेटा त्याच्यावर ६०च्या दशकात मोठ्या प्रमाणात आला होता. परंतु डिलनने त्याला दाद दिली नाही. मी एक कलाकार आहे, नेता नाही. जी चळवळ करायची ती मी माझ्या कलेतून करीन, हे त्याचे आजवर ब्रीदवाक्य राहिले. बॉब डिलन (१९६२) ते फॉलन एंजल (२०१६)असे ३६ अल्बम त्याने आतापर्यंत केले अाहेत. त्यातील पहिल्या काळातील दहाहून अधिक अल्बम प्लॅटिनम पदाला पोहोचले आहेत. डिलनला गाता येत नाही, त्याने फक्त लिहावे, असे म्हणणाऱ्या टीकाकारांना त्याने कायम उडवून लावले आहे.
डिलनसारख्या बंडखोर कवीला नोबेल मिळणे विस्मयजनकच आहे. हे म्हणजे जणू चे गव्हेराला नोबेल देण्यासारखे आहे. आयुष्यभर व्यवस्थेच्या विरोधात झगडून लोकप्रियता मिळवणाऱ्या कवीला त्याच व्यवस्थेने नोबेल देणे म्हणजे व्यवस्था आणि डिलन या दोघांनीही एकमेकांसमोर झुकण्यासारखे आहे. ‘टाइम्स दे आर चेंजिंग’ या डिलनच्या गाण्याप्रमाणेच! एरवी निक्सनच्या वॉटर गेट प्रकरणावर ‘इव्हन द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स विल हॅव स्टँड नेकेड’ असे सडेतोड भाष्य करणाऱ्या कवीला ४० वर्षांनी प्रेसिडेंट अवॉर्ड मिळणे, हा अमेरिकन व्यवस्थेचा समंजसपणा म्हणायचा की शरणागती? आणि तो घेणाऱ्या डिलनचे व्यवहारचातुर्य की अलविदा?
Jayraj3june@gmail.com
बातम्या आणखी आहेत...