आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचारांचा कळस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाचा इतिहास हा जसा माणुसकीच्या कथांनी भारलेला आहे तसाच तो माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटनांनीही भरलेला आहे. फार जुन्या-पुराण्या इतिहासात जायची गरज नाही, पण दुसर्‍या महायुद्धात हिटलरने ज्यूंवर जे अनन्वित अत्याचार केले, त्याच्या कहाण्या वाचताना आजही अंगावर काटा उभा राहतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात विविध देश, त्यातील सत्ताधीश, दहशतवादी संघटना आपले स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी ज्या घटकांवर सातत्याने अन्याय करतात त्यामध्ये महिला वर्गाचे नाना प्रकारे शोषण होत असते. आफ्रिका खंडातील नायजेरिया देशापासून त्याचा उत्तर भाग अलग करून त्यातून स्वतंत्र इस्लामी देश निर्माण करण्याचे लक्ष्य बोको हराम या दहशतवादी संघटनेने डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्या पायी या भागातील बिगरइस्लामी रहिवासी, सरकारी नोकर यांचा अनन्वित छळ करणे, त्यांना ओलिस ठेवणे, हिंसाचार घडवणे अशा कारवाया करून नायजेरियाच्या सत्ताधार्‍यांना जेरीस आणण्याचे धोरण बोको हरामने अवलंबले आहे. नायजेरियाच्या बोर्नो राज्यातील चिबोक येथील एका शाळेतून सुमारे 250 विद्यार्र्थिनींचे बोको हरामने अपहरण केले होते. या कृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र निषेध करण्यात आला होता. त्याला अजिबात भीक न घालता बोको हरामचा प्रमुख अबू बकर शेकाऊ याने या 250 विद्यार्थिनींना बाजारात गुलाम म्हणून विकण्याची धमकी दिली आहे! लोकशाही, पाश्चिमात्य शिक्षण पद्धती यांच्याविषयी विलक्षण तिटकारा असलेल्या बोको हराम संघटनेच्या तावडीत असलेल्या विद्यार्थिनींची सुटका केली जाईल, अशी नायजेरियाचे अध्यक्ष गुडलक जोनाथन यांनी अपेक्षा केली असली, तरी त्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही.
नायजेरियामध्ये बोको हरामने जे रक्तरंजित पर्व सुरू केले, त्याला तेथील सत्ताधारी अजिबात आळा घालू शकलेले नाहीत. बोको हरामने अपहरण केलेल्या शेकडो विद्यार्थिनींचे भवितव्य अंधकारमय होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे व बोको हरामच्या दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे पाऊल आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित उचलायला हवे, पण तसे न होता केवळ बोको हरामच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यावरच काम भागवले जात आहे.