आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान भेटीचा धाडसी निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला भेट देण्याची जी घोषणा केली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणं भाग आहे. हा निर्णय धाडसी आहे. या निर्णयामागे अजून काही कारणे आहेत. पाकिस्तानला मी अनेक वेळा गेलो आहे; पण मला तिथे कधीही असुरक्षित वाटलं नाही. ही गोष्ट नक्की की, मोदी यांना तिथे सर्वाधिक सुरक्षितता दिली जाईल; पण असं असलं तरीही पाकिस्तानमधील सर्वाधिक सुरक्षित असलेली माणसं म्हणजे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या ताफ्यावर दोनदा बॉम्बहल्ला झाला. तशीच सुरक्षा लाभलेल्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांना ठार करण्यात आलं. त्यामुळे जिथे क्रिकेट संघ जाण्यास धजावत नाही अशा ठिकाणी मोदींनी जाण्यास तयार होणं हे धाडसाचं मानायला हवं. आणखी एका दृष्टीने ही गोष्ट धाडसी ठरते ती म्हणजे मोदींनी हा निर्णय घेताना मीडियाला तसेच व्यूहरचनात्मक विश्लेषण करणाऱ्या तज्ज्ञांना धुडकावून लावून पाकिस्तानला जाण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानबाबत कठोर भूमिकाच सतत घ्यायला हवी, असा आग्रह धरणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या चाहत्यांनाही मोदी यांनी हा निर्णय घेताना जमेस धरलेले नाही.
नवाझ शरीफ यांच्याकडे विशेष लक्ष दिल्याबद्दल मोदी यांचं खूप कौतुक झालं आहे. गेले वर्षभर भारत असे मानत होता की, पाकिस्तानला आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे वळवू. त्यामुळेच हुरियत समितीने पाकिस्तानी उच्चायुक्तांना भेटणं यांसारख्या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे भारताने दुर्लक्ष केलं. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सीमेपलीकडून होणाऱ्या बॉम्बहल्ल्यांची आणि गोळीबाराची. याबाबत आता भारतीय जनता पक्षाच्या हे लक्षात आलेलं आहे की, हा गोळीबार थांबवण्याइतका भारत देश प्रबळ नाही. त्यामुळे तो पाकिस्तानला आवाक्यात आणू शकत नाही. आता एकदा का ही वस्तुस्थिती मान्य केली की भारताला आजवरची पाकिस्तानबद्दलची भूमिका बदलणं मान्यच करावं लागेल आणि हेच मोदी यांनी मान्य केलेलं आहे.

माझे पूर्वाश्रमीचे बॉस एम. जे. अकबर हे आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. मोदी यांनी जो यू-टर्न घेतला आहे त्याबद्दल बोलताना त्यांनी मोठ्या धाडसाने म्हटलं आहे की, पाकिस्तानने पहिल्यांदाच सर्व प्रकारच्या अतिरेकी कारवायांना आळा घालण्याचे मान्य केले आहे. अर्थातच ही शुद्ध लोणकढी थाप आहे. पाकिस्तानने अशीच वाक्यरचना उदा. ‘सर्व प्रकारच्या कारवायांना आळा घालणे’ ही अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यापासून सतत केलेली आहे. भारत सरकारच्या काश्मीरमधील कथित कारवाईबद्दल पाकिस्तान याच भाषेत इशारे देत असते. त्यामुळे भाजपने पुन्हा त्याच वाक्यप्रयोगाचा आधार घेऊन दावा करणे हे थोडे अतिच म्हणायला हवं. वस्तुस्थिती अशी आहे की, मोदी मध्य आशियातील देशांच्या दौऱ्यावर जाऊन आले. मोदी यांच्या आता लक्षात आलेलं आहे की, मध्य आशियात कुठलीही व्यावसायिक बोलणी करायची असतील (विशेषत: वायूसारख्या नैसर्गिक संसाधनांवर) तर अशी बोलणी केवळ पाकिस्तानच्याच मदतीने होऊ शकतात. मध्य आशियाचं भौगोलिक महत्त्व विसरून थेट पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानला महत्त्व द्यावे, असा पवित्रा भारत सरकारला घेणे शक्य नव्हते. तुर्कमेनिस्तान, ताजिकीस्तान, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान यांसारख्या राष्ट्रांशी जर आपल्याला चांगले आणि सुदृढ संबंध हवे असतील तर भारताला तसेच उत्तम संबंध पाकिस्तानसोबत ठेवायला हवेत. शेवटी भौगोलिक रचनेपासून कोणालाही पळता येणार नाही. माजी पंतप्रधान व भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी ही वस्तुस्थिती पूर्वी कित्येकदा बोलून दाखवली होती आणि त्यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे.

इथे मला एक मुद्दा मांडायला हवा, ज्यामुळे मी माझीच टिमकी वाजवतो आहे असं वाटेलही. मी मागच्या नोव्हेंबरमध्येच लिहिले होते की, मोदी यांनी त्यांची पाकिस्तानबद्दलची भूमिका थोडीशी बदलली आहे. मोदी यांनी पूर्वी पाकिस्तानशी बोलणी थांबवली होती. हा निर्णय घेताना मोदींनी आपणच आधी टाकलेल्या पावलांचा विचारही केला नाही. त्यांनी तेव्हा पाकिस्तानबद्दल काही कठोर उद््गार काढले होते; परंतु नुकतेच रशियामध्ये एका परिषदेच्या दरम्यान मोदींना त्यांचा ‘शत्रू' नवाझ शरीफ यांच्याशी शेकहँड करावा लागलेला आहे. अगदी त्यांच्याशी सगळी बोलणी तोडल्यानंतरही. हे करण्याची पाळी मोदींवर का आली असावी? कारण ही भेट टाळता येण्याजोगी नव्हतीच. पाकिस्तानबाबत मोदींची भूमिका ना धड इथे आणि ना धड तिथे अशी होती. या भूमिकेत ते फक्त एक पोझ घेत होते. आपण कठोरपणे वागतोय आणि अजिबात लवचिक नाही, असं मोदींना दाखवायचं होतं. जे मुळात आपल्याला परवडणारं नव्हतं आणि वस्तुस्थितीला धरूनही नव्हतं. त्यामुळे आता मोदींनी पाकिस्तानबाबत जी भूमिका बदलली आहे त्याचा भारताला काय फायदा झाला? भाजपमधील कुणीही किंवा मोदी यांचे हार्डलायनर चाहतेही याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानने सीमेवर केलेल्या प्रत्येक हल्ल्याला भारताने नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले आहे. समजा, ही गोष्ट खरी मानली तरीही शेवटी पाकिस्तान सीमेपलीकडचे हल्ले थांबवेल, याची हमी कुणी देऊ शकेल का? अनेक भारतीयांनाही ही वस्तुस्थिती मान्य आहे. जर गोळीबार थांबेल अशी हमी राज्यकर्ते देऊ शकणार नसतील तर पाकिस्तानशी बोलणं थांबवण्यात अर्थ तरी काय?

जी कुणी कठोरपणे विचार करणारी मंडळी आहेत त्यांनाही भारताने पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही हे चांगलेच माहीत आहे. गेल्या २० वर्षांत हे वारंवार दिसून आले आहे. भारत व पाकिस्तान युद्ध हा पर्याय होऊ शकत नाही. भारतीय जनता पक्षानेच या उपखंडाचं आण्विक युद्धक्षेत्रात रूपांतर केलं. भारताला काश्मीरसंबंधात आंतरराष्ट्रीय मत नको आहे आणि तरीही आपल्याला पाकिस्तानशी विविध विषयांवर बोलणी सुरू ठेवावीच लागतील तसेच भारताबद्दल कठोर भूमिका घेणाऱ्यांनाही आपले विचार बदलावेच लागतील. भारतीय जनता पक्षाने पाकिस्तानबद्दल आपले मत थोडे बदलले आहे. एम. जे. अकबर यांनी पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल उच्चारलेले शब्द पोकळ आहेत. त्या वक्तव्याकडे चुकूनही लक्ष देऊ नका. पाकिस्तान अजिबातच बदललेला नाही; पण भारतीय जनता पक्ष आणि त्याचे चाहते मात्र थोडेसे बदलले आहेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे.
आकार पटेल
ज्येष्ठ पत्रकार
बातम्या आणखी आहेत...