आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नास रुपयांत पुस्तक - एक विचारमंथन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्या एका प्रकाशकांनी किंवा वितरकांनी 100 रुपये ते 600 रुपयांचे पुस्तक केवळ 50 रुपयांत अशी विक्रीची योजना आणलेली असून लोकांचा त्याला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. मुंबईत, दादर येथील पुस्तकांच्या दुकानात तर लोकांची मोठी रांग लागलेली दिसली. ही योजना व तिला मिळणारा प्रतिसाद यावर दोन-तीन अंगाने चर्चा करता येईल. प्रथम फक्त व्यावसायिक अंगाने विचार करायचा तर प्रकाशक असे का करत असावेत, यामुळे त्यांना तोटा होत आहे की फायदा, आणि त्यांनी अशी योजना आणावी का? एका पुस्तकाचा निर्मिती खर्च व दुकानदारांना द्यायचे कमिशन मिळून जर 50 रुपयांपेक्षा कमी खर्च असेल तर ते पुस्तक 50 रुपयांना विकून प्रकाशकांना तोटा नाही. जर निर्मिती खर्च व कमिशन मिळून एका पुस्तकामागे त्यांचा खर्च 50 रुपयांपेक्षा जास्त आहे तर ते तोट्यात विक्री करत आहेत.

अनेक वस्तू जशा ‘क्लिअरन्स सेल’ लावून काढल्या जातात, तसेच त्यातल्या त्यात जो भाव मिळेल त्या भावात विक्री करून गुंतलेले भांडवल मोकळे करणे, हा हेतू असू शकतो. व्यवसाय करताना, विशेषत: प्रकाशन व्यवसायात तर प्रत्येक पुस्तकाची तडाखेबंद विक्री होईल, अशी अपेक्षा ठेवता येत नाही. काही वेळा नुकसान सहन करून त्यातून बाहेर पडणे श्रेयस्कर असते. मराठी पुस्तकांची हजार प्रतींची पहिली आवृत्ती संपायला दहा-पंधरा वर्षे लागतात. ती पुस्तके सांभाळण्याचा खर्च विचारात घेता काढून टाकणे काय वाईट? खरे तर इतर प्रकाशकांनीही जुनी पुस्तके सेल लावून काढून टाकायला हवीत. 1960-70मध्ये छापलेली पुस्तके ज्यावर किंमत 20-30 रुपये लिहिलेली आहे, ती जाहिरात करून काढून टाकायला हवीत. या सेलबाबत मुद्दा येईल, पुस्तक ही काही शर्टासारखी वगैरे उपभोग्य वस्तू नाही.
वाचकांनी किंमत बघून नव्हे तर साहित्याच्या दर्जावर ते वाचावे की नाही ते ठरवावे. फालतू, टुकार पुस्तक स्वस्तात मिळतंय म्हणून वाचू नये; तर अभिजात, चांगले साहित्य वाचावे. साहित्याच्या अंगाने हा मुद्दा बरोबरच आहे. पण अशी चांगली पुस्तके विकली जात नाहीत, मग प्रकाशकांनी काय करायचे? आणि ती का विकली जात नाहीत? कारण मराठी लोकांना पुस्तक विकत घेऊन वाचायची सवय नाही (काहींचा अपवाद). या सेलमुळे निदान लोकांना पुस्तक विकत घेण्याची सवय लागेल. या रांगेत मला असे लोक आढळले, जे आयुष्यात पहिल्यांदाच पुस्तक विकत घेण्यासाठी पैसे खर्च करत होते, तेही 600 रुपयांचे पुस्तक 50 रुपयात मिळते म्हणून; त्यांना त्यात ‘बार्गेन’ दिसते म्हणून. जे असे ‘नवे’ वाचक आहेत, ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पुस्तक विकत घेतले त्यातील काही पुढेही पुस्तक विकत घेत राहतील, ही आशा आपण करू शकतो. म्हणजेच, अभिजात पुस्तके वाचण्यासाठी आधी आवश्यक आहे निदान एक वाचक होणे. भलेही सोपी, लोकप्रिय पुस्तके लोक आधी वाचतील. जसजशी त्यांची जाणीव वाढेल, चांगल्या साहित्याशी परिचय होईल, तीही पुस्तके लोक वाचतील. सुरुवातीला कदाचित त्यांना त्याचा अर्थ समजावून सांगावा लागेल. पण ते करणे आवश्यक आहे. 50 रुपयात पुस्तक मिळतंय म्हणून जसे लोक गर्दी करत आहेत, तसेच आज आपण बघतो ‘सेल्फ-हेल्प’ प्रकारातील म्हणजे यशस्वी जीवन कसे जगावे, गुंतवणूक मार्गदर्शन, पालकत्व अशा प्रकारची पुस्तके खपतात. तसेच ‘नॉन-फिक्शन’ म्हणजे कथा-कादंबरीशिवाय इतर प्रकारातील उदा. आत्मकथा, चरित्र, यशोगाथा अशा प्रकारची पुस्तके खपतात. अशी पुस्तके लोकांना उपयुक्त वाटतात म्हणून ती घेतली जातात.

चेतन भगत यांची चटपटीत पुस्तके खपतात, कारण तरुणांना ती आपली वाटतात. हॅरी पॉटर, ट्वॉयलाइट सिरीजची पुस्तके खपतात, कारण त्यांची एक क्रेझ तयार होते. त्याचबरोबर अरविंद अडिगाचे व्हाइट टायगर हे पुस्तकही खपते. म्हणजेच समाजात वाचकांचे वेगवेगळे स्तर असतात. त्यांचे वय, त्यांची समज याप्रमाणे ते पुस्तके वाचतात. मराठीत आधी तरुणांना वाचनाकडे आकर्षित केले पाहिजे. त्यातून मग काही चांगले वाचक तयार होऊ शकतील. त्यासाठी अशा विक्रीच्या नव्या नव्या योजना आणाव्या लागतील. कदाचित लोकप्रिय पुस्तकाबरोबर अभिजात पुस्तक फ्री किंवा निम्म्या किमतीत; अशा योजना आणाव्या लागतील. लेखकाला हे क्लेशकारक आहे, त्याच्या अहमला दुखावणारे आहे; पण तसे करून जर त्यांची पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचणार असतील, त्यांचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचणार असेल तर ते व्हायला हवे.
अगदी या 50 रुपयात पुस्तक योजनेत आपण बघितले तर श्यामची आई आहे, सावरकरांची पुस्तके आहेत, तसेच सत्यशोधकांची भाषणे हे पुस्तकही आहे. आजची पुस्तके म्हणजे आजच्या काळाची पुस्तके नाहीत. अकादमी पुरस्कार मिळालेली मराठी पुस्तके अशी स्वस्त किमतीत कशी देता येतील, याचा विचार व्हायला हवा. साहित्य संमेलन हे मुख्यत: लेखकांचे असते. सर्व प्रकाशकांनी एकत्र येऊन पुस्तकांचा खप कसा वाढेल याचा विचार करून योजना आखायला हव्यात. साहित्य ही अतिशय पवित्र गोष्ट आहे, त्याच्या बाबतीत मार्केटिंगचे वगैरे नावसुद्धा नको... शिव-शिव.. या वृत्तीचा त्याग करायला हवा. पुस्तकाची विक्री म्हणजे चांगले साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, हे लक्षात घ्यायला हवे.

kuluday@rediffmail.com