आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिजिटल युगातील ब्रेकिंग न्यूज ( अग्रलेख )

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात सेकंद-मिनिटाला घडणा-या हजारो घटना आज आपल्याला तंत्रज्ञानातील विस्मयकारी प्रगतीमुळे एकाच वेळी वाचायला-पाहायला मिळतात. अगदी 15 वर्षांपूर्वी जगात-देशात काल काय घडले हे कळण्यासाठी दुस-या दिवशी सकाळी घरात येणा-या वर्तमानपत्रांची वाट पाहावी लागत असे. पण हा काळ गेला. उदारीकरणामुळे उपग्रह वाहिन्यांची गर्दी वाढू लागली, घरोघरी टीव्ही पोहोचले आणि वर्तमानपत्रातील बातम्यांची जागा ‘ब्रेकिंग न्यूज’ने घेतली. आता हे पण सवयीचे झाले आहे. टीव्हीची जागा इंटरनेटने घेतली आहे आणि इंटरनेटवर सोशल मीडियाचा कब्जा आहे, तर ‘ब्रेकिंग न्यूज’ची जागा सोशल मीडियातील ‘स्टेटस अपडेट’ने घेतली आहे. हे सगळे स्थित्यंतर गेल्या 10-15 वर्षांतले आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्थित्यंतराच्या काळात न्यूज चॅनल आणि इंटरनेट या दोहोंचा प्रसार झाला. या कालावधीत पर्सनल कॉम्प्युटरपेक्षा टीव्ही चॅनल्सनी वेगाने प्रसार केला. पण मोबाइलच्या क्रांतिकारी प्रसारामुळे इंटरनेटने टीव्ही माध्यमाला झपाट्याने मागे टाकण्यास सुरुवात केली. आज देशातील अनेक गरीब कुटुंबांकडे टीव्ही नाहीत, पण मोबाइल आहेत.

उद्या स्वस्त दरात इंटरनेट या मोबाइलधारकांना मिळाल्यानंतर इंटरनेटच्या जाळ्यात मोठा जनसमूह येऊ शकतो. हा बदलही फार दूरचा नाही. आपण डिजिटल युगाच्या अशा काळात आहोत, की जी व्यक्ती कॉम्प्युटर किंवा मोबाइल इंटरनेटचा वापर करत आहे व जिचे फेसबुक किंवा ट्विटरचे अकाउंट आहे, ती व्यक्ती पत्रकार म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या जगड्व्याळ व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. म्हणजे वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनल समूहांना बातमीदारीसाठी नेमलेल्या पत्रकारांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यांना बातमीपलीकडे जाऊन नवे काहीतरी वाचक-प्रेक्षकांना द्यावे लागेल. सोशल मीडिया आता लोकांना जगभरातील, आपल्या भोवतालची घडामोड सांगण्याची जबाबदारी स्वीकारेल. गेल्या आठवड्यात ‘द फ्यूचर ऑफ जर्नालिझम इन डिजिटल मीडिया’ या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राचे मुख्य संपादक अ‍ॅलन रुजब्रिजर यांनी सोशल मीडियाच्या विस्तारामुळे पत्रकारिता व मीडिया क्षेत्रात वेगाने कसे बदल होत आहेत, याचे चित्र उलगडून दाखवले. त्यांच्या मते, सध्या सोशल मीडियाचा वापर करणा-या एनजीओ, फॅशन हाऊस, सुपर मार्केट, शेअर बाजार हे एक मीडिया हाऊस म्हणूनही काम करत आहेत आणि ते स्वत: त्यांच्या क्षेत्राची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. म्हणजे या व्यवसायांमध्ये चालणा-या घडामोडींची माहिती लोकांपर्यंत देण्याची जबाबदारी आता त्यांनी मीडिया व पत्रकारांकडे न देता स्वत:वर घेतली आहे.

पत्रकारिता क्षेत्राला हा बदल झटका देणारा आहे; पण असे धक्के यापुढे डिजिटल युगात वरचेवर बसत जाणार आहेत, असे रुजब्रिजर यांचे मत आहे. मीडियाची पारंपरिक चौकट मोडणारे हे बदल अपरिहार्य आहेत आणि ते स्वीकारूनच पत्रकारांना नव्या वाटा शोधाव्या लागतील. एखाद्या विषयाचे तज्ज्ञ म्हणून पत्रकारांची भूमिका सोशल मीडियामुळे संकुचित होऊ शकते. रुजब्रिजर यांनी वृत्तपत्र व्यवसायासमोर इंटरनेट हा प्रमुख धोका असल्याचे सांगितले. सध्याच्या वृत्तपत्रांना न्यूज चॅनलशी सामना करावा लागतो. प्रेक्षकांनी दिवसभरात टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज बघितल्या असल्याने त्याच बातम्या दुस-या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात छापून देण्यात फारसे हशील नसते. (ते अजूनही होते) अशा वेळी वर्तमानपत्रांनी बातमीपलीकडे जाऊन विश्लेषण देणे आवश्यक असते. अनेक वृत्तपत्रे विश्लेषण देण्यास असमर्थ असतात. काही वृत्तपत्रे देश किंवा विदेश पातळीवरील बातम्यांऐवजी स्थानिक बातम्यांवर भर देतात. (जिथे न्यूज चॅनलचे कॅमेरे पोहोचू शकत नाहीत.) ब-याचशा वृत्तपत्रांनी टीव्हीचे आव्हान स्वीकारून त्यांच्या स्वत:च्या इंटरनेट आवृत्त्या सुरू केल्या आहेत.

पण तरीही सोशल मीडियाशी स्पर्धा करताना वृत्तपत्रांची दमछाक होऊ शकते. कारण सोशल मीडियामध्ये कोणीही सामील होऊ शकतो. साध्या मोबाइल फोनच्या चित्रीकरणातून एखादी व्यक्ती बातमी एक मिनिटात जगभर पोहोचवू शकते. युरोप आणि अमेरिकेत सुमारे 90 टक्के बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘ब्रेक’ होतात (म्हणजे लोकांपुढे त्वरित जातात). या बातम्या ‘ब्रेक’ करण्यासाठी पत्रकार घटनास्थळी हजर असण्याची गरज नाही, की मीडियाच्या संपादकांच्या परवानगीची आवश्यकता नाही. कुणा एखाद्याला एखाद्या घटनेत स्फोटकता वाटल्यास तो सोशल मीडियाच्या मदतीने लोकांना ही घटना सांगू शकतो. काही काळाने अशी परिस्थिती होईल की या माध्यमातून येणा-या बातम्यांवर प्रस्थापित मीडियाला, पत्रकारांना अवलंबून राहावे लागेल. त्याची उदाहरणे गेल्या काही काळात घडलेली आहेत. अगदी गेल्या दोन वर्षांत सोशल मीडियामुळे जगभरातील अनेक जनआंदोलने, नैसर्गिक आपत्ती, अत्याचार, स्कँडल जगापुढे आले आहेत.

अनेकदा अशा बातम्यांमधील सत्यतेवर वादविवाद होऊ शकतात, त्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. पण घटना आणि माहिती म्हणून अशा बातम्या वेगाने प्रसारित होत आहेत, हे नाकारता येणार नाही. बातम्यांचा वेग हा वर्तमानपत्रांच्या दृष्टीने कळीचा प्रश्न आहे. ट्विटर हा सोशल मीडिया गेल्या चार वर्षांत जगभरात लोकप्रिय झाला आहे. हैतीमध्ये तीन वर्षांपूर्वी झालेल्या भीषण भूकंपावेळी ट्विटरमुळे आपद्ग्रस्तांपर्यंत त्वरेने मदत पोहोचू शकली. अनेक परदेशी न्यूज चॅनल्सना व्हिडिओ क्लिपसाठी ट्विटरवर अवलंबून राहावे लागले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी अरब राष्ट्रांमध्ये प्रस्थापित राजेशाही, हुकूमशाहीविरोधात उसळलेल्या लोकक्षोभात ट्विटर, यूट्यूब, फेसबुकचा वाटा प्रामुख्याने होता. सोशल मीडियामुळे लोकांमधील असंतोष जगापुढे आला होता. या माध्यमांनी या काळात जगभरात विखुरलेल्या अरब जनतेमध्ये संवाद घडवून आणला होता. त्यामध्ये प्रचंड माहितीचे आदानप्रदान झाले. जातपात, धर्म-वंश-भाषा यांच्या पलीकडे जाऊन जगाने या आंदोलनाची दखल घेतली. सोशल मीडियाच्या या आव्हानांकडे बघता वृत्तपत्रांनी लोकांचा जास्तीत जास्त सहभाग करून घेतला पाहिजे, असे रुजब्रिजर यांना वाटते. वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर प्रसारित झालेली बातमी ही केवळ एक सुरुवात असते. त्यानंतर या बातमीमध्ये अनेक घटना समाविष्ट होऊ शकतात. या ‘डेव्हलपिंग स्टोरी’वर काम करण्याची क्षमता सोशल मीडियामध्ये अधिक आहे. बातमी प्रसिद्ध झाली म्हणजे तो विषय संपला, असे नसते. बातम्यांनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया या समाजासाठी आवश्यक असतात.

वर्तमानपत्र असो वा न्यूज चॅनल, यांच्यामध्ये लोकांच्या प्रतिक्रियांना सोशल मीडियाच्या तुलनेत कमी वाव असतो. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया हे कोणत्याही महत्त्वाच्या बातमीच्या दृष्टीने बलस्थान ठरते. त्यामुळेच पत्रकारांचे सध्याच्या माध्यम जगतातील महत्त्व कमी होत चालले आहे. गेल्या दोनएक वर्षांत मेल ऑनलाइन, न्यूयॉर्क टाइम्स, द गार्डियन व द वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्रांनी त्यांच्या डिजिटल आवृत्त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियाचे आव्हान स्वीकारले आहे. हे बदलत्या पत्रकारितेचे प्रमुख उदाहरण आहे. रुजब्रिजर यांनी डिजिटल युगातील पत्रकारितेबाबत सर्वांनाच जागरूक केले आहे.