आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्न भंगले, झोप उडाली( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लालकृष्ण अडवाणींनी त्यांचा राजीनामा मागे घेतल्यामुळे भाजपमधील ‘संशयकल्लोळ’ व ‘मानापमान’ या दोन्ही नाटकांवर पडदा पडला आहे, अशी दवंडी मीडियामार्फत संघ परिवार पसरवत आहे. भाजपला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तसा पडदा पाडून पुढच्या ‘सत्ताकांक्षी’ नाटकाच्या तालमी सुरू करायच्या असल्यामुळे त्यांनी ती दवंडी पिटली आहे. वस्तुत: राजीनामा हा नाटकाचा पहिला अंक होता. दुस-या अंकाचा शेवट राजीनामा मागे घेण्याने झाला. परंतु हे नाटक पाचअंकी आहे. तिस-या अंकापूर्वीचे मध्यंतर झाले आहे - नाटकावर पडदा पडलेला नाही. नाटकावर पडदा पडेल पुढल्या वर्षी मे महिन्यात. त्या वेळेस भाजपला आणि नरेंद्र मोदींना कळून चुकेल की, भारतीय मतदाराने त्या सर्वांना दूर केले आहे आणि पाचअंकी नाटकाचे दिग्दर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नागपूरमध्येच राहायला सांगितले आहे. म्हणजेच, नागपूरला पडलेले दिल्लीचे स्वप्न पूर्णपणे भंगेल तेव्हाच ‘सत्ताकांक्षी’ नंतरच्या या आधुनिक ‘स्वप्नमोहनदत्तम्’ नाटकावर ख-या अर्थाने पडदा पडेल आणि ‘वंदे मातरम्’ म्हटले जाईल. त्या वेळेस भाजपमधील सत्ताकांक्षी मंडळी म्हणतील की, ‘अडवाणींनी अपशकुन केला नसता तर दिल्लीवर संघाचा भगवा फडकला असता!’ परंतु आज मात्र ते म्हणत होते की, अडवाणींचा बार फुसका निघाला, नाहीतरी ते इतिहासजमा झाले होते, त्यांची किंमत त्यांनी स्वत:हून कमी करून घेतली आणि प्रत्यक्षात मोदींचा मार्ग मोकळा करून दिला.

आज जरी मोदी समर्थकांनी अडवाणींच्या राजीनाम्यानंतर असा उन्माद प्रगट केला असला तरी हळूहळू त्यांच्याही लक्षात येऊ लागेल की, या पितामहांनी बाणांच्या शय्येवर झोपलेले असतानाच पाठीखालून एकेक बाण हलकेच काढून शरसंधान सुरू केले होते. म्हणूनच अडवाणींनी राजीनामा मागे घेतल्यानंतर 24 तासांच्या आत एनडीए ऊर्फ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शरद यादवांचा युनायटेड जनता दल आणि नितीशकुमारांचा समता पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीला लागले आहेत. त्याचप्रमाणे कधी नव्हे इतका जोर आता तथाकथित ‘तिस-या’ आघाडीला आला आहे. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, बंगालच्या ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू, अशा अनेक प्रादेशिक नेत्यांनी स्वतंत्रपणे व संयुक्तपणे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. म्हणजेच अडवाणींच्या राजीनामानाट्यानंतर राजकारणात एक प्रकारचा विस्फोट झाला आहे.

सुरुंग तर होतेच, पण वात पेटवली गेली नव्हती. अडवाणींनी भले राजीनामा मागे घेऊन ‘पराभव’ पत्करला असेल, पण त्यांनीच ही वात पेटवली हे उघड आहे. मोदीप्रणीत संघाच्या नाट्यसंहितेमध्ये असे प्रवेश घुसडले जात होते की, ज्यात बहुतेक प्रादेशिक पक्ष ‘मुकाट्याने’ भाजपप्रणीत ‘एनडीए’मध्ये सामील होतील. नरेंद्रभाईंना अडवाणींची अडचण दूर झाल्यानंतर सहज दोनशे जागा मिळतील आणि उरलेल्या 75-80 जागा प्रादेशिक पक्ष पुरवतील. आम्ही याच स्तंभात म्हटल्याप्रमाणे भोपळ्यांचे हे भ्रम आता अधिकाधिक फुगत होते. ‘सोशल मीडिया’ म्हणजे जणू एक नवे प्रचार व्यवस्थापन व मनमोहिनी तंत्र आहे, असा मोदींनी नेमलेल्या एमबीए चमूंचा कयास होता आणि अजूनही आहे. परंतु सोशल मीडियाचे आभासी तंत्रज्ञान वास्तवात उपयोगी पडत नाही, हे साधे सामान्यज्ञान मात्र भल्या भल्या मॅनेजमेंट एक्स्पर्ट्सना नसते. अमेरिकेकडे सर्व आधुनिक तंत्रज्ञान आणि अण्वस्त्रे-क्षेपणास्त्रे असूनही, व्हिएतनाम युद्धात त्यांचा दारुण पराभव झाला आणि अफगाणिस्तानातही त्यांचा मुखभंग झाला आहे. इराक, इजिप्त, लिबिया व कुठेही ते स्थैर्य व लोकशाही प्रस्थापित करू शकलेले नाहीत.

केवळ आधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्व माणसांना बेमालूम फसवता येईल, हा समज इतिहासाने कायम खोटा ठरवला आहे आणि तरीही मोदींनी नेमलेल्या ‘तांत्रिकांना’ वाटते, 2014 ची निवडणूक जवळजवळ जिंकल्यातच जमा आहे! ‘काँग्रेसमुक्त भारत नवनिर्माण’ करण्याचा विडा मोदींनी ज्या आविर्भावात उचलला, ते पाहून काहींना अफझल खानाने शिवाजीमुक्त महाराष्ट्र करण्याचा विडा उचलला होता त्याचीच आठवण झाली. गंमत म्हणजे, ज्या वल्लभभाई पटेलांचा ‘महाभव्य’ पुतळा उभारण्याची तयारी मोदींनी विडा उचलल्याबरोबर सुरू केली, ते मूळचे व खरेखुरे लोहपुरुष पटेल हे कट्टर काँग्रेसवाले, कट्टर गांधीवादी आणि अगदी नेहरूंचे कट्टर सहकारीही होते. परंतु अनेक संघवाल्यांना असे वाटते की जणू सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल आणि लालबहादूर शास्त्री हे रोज संघाच्या शाखेवरच जात असत. ते तिघेही काँग्रेसचे होते आणि सर्वार्थाने देश काँग्रेसमुक्त झाला की ते तिघेही अंतर्धान पावतील. इतकेच नव्हे तर रा. स्व. संघाची स्थापना करणारे हेडगेवार हेही काँग्रेसचेच होते आणि 1925 मध्ये संघाची स्थापना केल्यानंतरसुद्धा ते काँग्रेसचे काम (अगदी महात्मा गांधी व पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली) करीत होते. परंतु संघाला व मोदींना स्मृतिभ्रंश झाला असल्याने त्यांना त्यांचा स्वत:चा भूतकाळही आठवत नाही, तर इतरांचा काय आठवणार? परंतु संघ स्थापनेला आता 90 वर्षे होत आली.

मोदींना व संघाला आता अटलबिहारी वाजपेयींचेही स्मरण होत नाही. तोंडदेखले वाजपेयींचे नाव घ्यायचे; पण त्यांना सफाईने इतिहासाच्या अडगळीत टाकायचे, असे तंत्र त्यांनी अवलंबले आहे. वाजपेयी पंतप्रधान असताना मोदींनी त्यांचा कसा जवळजवळ जाहीरपणे अपमान केला होता, हे त्यांना आठवत नसेल तरी अनेक लोकांना आठवते. संघाने स्वत:च पुढाकार घेऊन अडवाणींवर शरसंधान केले होते आणि त्यांच्या महंमद अली जिनांबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर अडवाणींना राजसंन्यास घेणे भाग पाडले होते. जसवंतसिंग असोत वा यशवंत सिन्हा, उमा भारती असोत वा राम जेठमलानी - अनेकांना भाजप, संघाच्या आदेशानुसार धडा शिकवीत असतो. एकजुटीची, शिस्तीची, नैतिकतेची भाषा करणारा संघ आणि भाजप हे प्रत्यक्षात पोकळ वाशांचे बडे घर आहे. ते डागडुजी करताकरताच आता पुन्हा पडू लागले आहे. मोदींना हवी होती दिल्लीमध्ये बडी हवेली; पण आता त्यांना गांधीनगरातच राहावे लागणार, अशी चिन्हे आहेत. अडवाणींनी लिहिलेल्या नाटकाचा तोच शेवट असणार आहे.