आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ब्राऊन वॉश’ ( अग्रलेख )

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट विश्वावर अधिसत्ता गाजवणा-या ऑस्ट्रेलियन संघाचे भारताने कसोटी मालिकेत पुरते वस्त्रहरण केले. ज्या काळात ऑस्ट्रेलियन संघाच्या सार्वभौमत्वाला कुणीही आव्हान देऊ शकत नव्हता, त्या काळात त्यांच्या विजयाचा अश्वमेध रोखण्याचे धाडस भारतीय क्रिकेट संघाने दाखवले होते. 1983 च्या सुमारास क्रिकेट विश्वावर राज्य करणा-या वेस्ट इंडीजलाही भारताने विंडीजमध्ये हरवून नव्या युगाच्या आरंभाचे संकेत दिले होते.

त्याच वर्षी भारताने इंग्लंडमध्ये जाऊन विश्वचषक जिंकला आणि क्रिकेटच्या वर्चस्वाची किरणे आशिया खंडावरही पडायला लागली. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाची धूळ चाखायला लावली आणि 2010 ते 2011 या कालावधीत कसोटी क्रिकेटच्याही अत्युच्च पदावर भारतीय संघ पोहोचला. क्रिकेटमधील दोन महासत्तांना आव्हान देणा-या भारतीय संघाने या वेळी तर त्यापेक्षाही मोठा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत मालिकेतील सर्वच्या सर्व कसोटीत हरवणे कुणालाही जमले नव्हते. भारतीय क्रिकेट संघाने या वेळी ते शक्य करून दाखवले. गो-यांच्याच भाषेत बोलायचे झाल्यास भारताने ऑस्ट्रेलियाला ‘ब्राऊन वॉश’ दिला. दोन महिन्यांपूर्वीच इंग्लंड संघाकडून भारतातच मालिकेत पराभूत झालेल्या भारतीय संघात अचानक असा कोणता बदल झाला? अपयशाची चाके अचानक उलटी कशी फिरली?

सेहवाग, गंभीर संघात नसताना आणि सचिन तेंडुलकर संघात नावापुरताच असताना भारतीय संघाने हा पराक्रम केला. राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, सौरव गांगुली, अनिल कुंबळे यांच्यासारखे रथी-महारथी निवृत्त झाल्यानंतर या भारतीय संघाचे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर या वेळी नवोदितांनी दिले आहे. ताशी 150 किलोमीटर्स वेगाने चेंडू फेकणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचे तोफखाने अंगावर घेत चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर खंबीरपणे उभा राहिला. मुरली विजयची बॅट सलामीलाच भेदता आली नाही. कसोटी पदार्पण करणा-या शिखर धवनने तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अशी पिटाई केली की क्षणभर कॅरिबियन बेटांवरचाच कुणी लारा किंवा रिचर्ड्स फलंदाजी करतोय, असा भास झाला. इंग्लंडविरुद्ध मालिकेदरम्यान दुस-या कसोटीपासून कायम वाटत राहायचे की धावा काढणार कोण? आणि क्षेत्ररक्षणाला उतरल्यानंतर सामन्यात 20 विकेट घेणार कोण, असा प्रश्न पडायचा. त्याच संघाने ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध मालिकेत अशा विचारांची गंगा उलट दिशेने वाहायला लावली. मुरली विजय, चेतेश्वर पुजारा यांनी अन्य फलंदाजांना फलंदाजीसाठी उतरण्याची संधीच दिली नाही.

इंग्लंडविरुद्ध मालिकेत एकेका बळीसाठी तब्बल शंभरावर धावा देणारा ऑफस्पिनर आर. अश्विन हाच होता की एवढी अप्रतिम गोलंदाजी त्याने केली. चार कसोटीत चार वेळा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा अश्विन मालिकेचा निकाल निश्चित करणारा ठरला. अधूनमधून भुवनेश्वरकुमार आणि रवींद्र जाडेजाने चमक दाखवली. रवींद्र जाडेजाचे कौतुक यासाठी व्हायला हवे की त्याला याआधी प्रत्येक वेळी संधी नाकारण्यात आली होती. त्याने फलंदाजीतील उपयुक्तता सिद्ध केलीच, परंतु अष्टपैलुत्वाची चमक दाखवताना ऑस्ट्रेलियाच्या जमलेल्या भागीदा-या तोडल्या. ‘मॅन विथ गोल्डन आर्म’ असा ऑस्ट्रेलियात सध्या त्याचा उल्लेख होतोय. कप्तानपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी ज्या धोनीबद्दल होत होती, त्याच धोनीला 2019 पर्यंत कप्तान करा, अशी वकिली तीच मंडळी करत आहेत. यशाचे सारेच साथीदार असतात, परंतु अपयश हे मात्र एकट्या कप्तानाचे असते. त्या अपयशाची जबाबदारी धोनीने स्वीकारली. चेन्नईच्या पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर मानसिक आघात करणारी द्विशतकी खेळी तो खेळला. कप्तानाचा आत्मविश्वास त्यानंतर संपूर्ण मालिकेत मैदानावर आणि त्याच्या तरुण सहका-यांवर परावर्तित होत राहिला. ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत करणा-या धोनीच्या धुरंधरांमध्ये मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, विराट कोहली, आर. अश्विन, भुवनेश्वरकुमार, रवींद्र जाडेजा ही सर्व तरुण व नवोदित खेळाडूंची फळीच आघाडीवर होती. दिग्गज खेळाडूंची आठवणही येऊ दिली नाही. भारतीय क्रिकेटसाठी ही चांगली गोष्ट आहे. धोनीने खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीचे आखाडे करण्याचे आदेश दिले होते, असे क्षणभर मानूया. मात्र दोन्ही संघांना तीच खेळपट्टी होती. प्रत्येकाला त्यावर येऊन कर्तृत्वाचे इमले उभे करायचे होते.

पाटा खेळपट्टीवरही धावा फटकावण्यासाठी संयम, चिकाटी, स्टॅमिना आणि समयसूचकता लागते. दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, मोहाली येथील खेळपट्ट्यांवरील भेगा, खड्डे आणि सतत चेंडूचा टप्पा पडल्यावर निघणारी माती प्रत्येक फलंदाजाच्या काळजाचा ठोका चुकवत होती. त्यामुळे त्यावर काढलेली प्रत्येक धाव बहुमूल्य होती. त्याच खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनाही चेंडूचा टप्पा अचूक ठेवणे महत्त्वाचे होते. प्रत्येक फलंदाजाचा अभ्यास करून त्याच्यासाठी सापळा लावणे निर्णायक ठरत होते. जे ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांना जमले नाही, ते भारतीय फिरकी गोलंदाजांनी करून दाखवले. इंग्लंडविरुद्ध मालिकेतील पराभवाने खचून न जाता भारतीय संघाने नव्याने मोर्चेबांधणी केली. गतअपयश विसरून हा संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर मानसिक सक्षमतेच्या युद्धातही हरला नाही. ‘स्लेजिंग’ (हिणकस शेरेबाजी), किंवा धक्काबुक्की तंत्र यामध्येही भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पुरून उरला, हे विशेष. मात्र आश्चर्य वाटते ते ऑस्ट्रेलियासारख्या पक्क्या व्यावसायिक संघाच्या या दौ-याच्या बाबतीतल्या अव्यावसायिक दृष्टिकोनाचे. इंग्लंडविरुद्ध मालिकेतील सामन्यांच्या चित्रफिती पाहूनही ऑस्ट्रेलियन संघ काहीच शिकला नाही, याचे आश्चर्य वाटते. इंग्लंडने भारतात येताना दोन दर्जेदार फिरकी गोलंदाज आणले होते.

भारतात खेळपट्ट्या फिरकीला पोषक आणि संथ असणार, हे ठाऊक असूनही ऑस्ट्रेलियन संघ या वेळी येताना सोबत पाच वेगवान गोलंदाजांचा तोफखाना घेऊन आला. या तोफखान्याचा दारूगोळा संथ खेळपट्ट्यांवर फुसका ठरला. पहिल्या कसोटीत चार वेगवान गोलंदाज खेळवून ऑस्ट्रेलियाने सलामीलाच आपली वैचारिक दिवाळखोरी जाहीर केली. चुकीच्या डावपेचांबरोबरच ऑस्ट्रेलियन संघातील अंतर्गत वादळदेखील या संघाचे हेलकावे खाणारे तारू सावरू शकले नाही. ऑस्ट्रेलियासारख्या व्यावसायिक संघावर 4-0 असा ऐतिहासिक विजय मिळवणा-या भारतीय संघाचे म्हणूनच कौतुक वाटते.