आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कापूस कोंड्या’चा धोंडा कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बी टी वाणामुळे कापसाचे उत्पादन वाढले. निर्यातीमुळे देशाच्या तिजोरीत परकीय चलनही मोठ्या प्रमाणात खुळखुळत आहे. परंतु खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याने ‘कापूस कोंड्या’तील कथेप्रमाणे शेतकर्‍यांच्या नशिबी दरवेळी धोंडा येत आहे. शेतकर्‍यांनी कपाशीच्या बीटी वाणाचा वापर सुरू केल्यानंतर कापूस उत्पादन वाढले आहे, यात शंका नाही. मात्र, मागील पाच वर्षांत या बीटी कपाशीवर करावा लागणारा खर्च व त्या तुलनेत मिळणारा भाव याचे गणित जुळत नसल्याने मागील हंगामात अमरावती विभागात शेतकर्‍यांनी सोयाबीनला पसंती दिली होती. परिणामी कपाशीच्या पेर्‍यात प्रचंड घट आली. कापसाचे एकरी सरासरी 10 ते 15 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांना एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च करावा लागतो. हा खर्च करूनही अपेक्षित उत्पादन होईलच, याची शाश्वती नसते. त्यातही विभागात कोरडवाहू क्षेत्र मोठे असल्यामुळे या क्षेत्रात पावसाच्या पाण्याचा एकदा जरी ताण बसला, तरी उत्पादन निम्म्यावर येण्याची शक्यता असते. यामुळे केलेला खर्च पूर्णपणे वाया जातो. कपाशीचा जुगार परवडत नसल्यामुळे शेतकर्‍यांना सोयाबीनच फायद्याचे वाटते. या वर्षी हंगामात कपाशीला सरासरी 5100 रुपये दर मिळाला. कपाशीचे उत्पादनही सरासरी सात ते दहा क्विंटल झाले. परंतु या वर्षी सततच्या पावसामुळे खर्चही प्रचंड वाढला. त्या तुलनेत मिळालेला भाव पाहता, कपाशीची पेरणी हा आतबट्ट्याचाच व्यवहार ठरला. किमान सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळेल, या आशेने अद्यापही शेतकर्‍यांनी कापूस साठवून ठेवला आहे. मात्र, सध्या कापसाचे दर पाच हजारांहूनही खाली घसरल्यामुळे पेरणीच्या तोंडावर या शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. आर्थिकदृष्ट्या कपाशी परवडत नसतानाही सोयाबीन बियाण्याची टंचाई, वन्यप्राण्यांपासून होणार्‍या कमी खर्चाच्या पिकांचे नुकसान, मजुरांची भीषण समस्या आदी अडचणींचे कायम दुखणे घेऊनच शेतकर्‍यांना या वर्षी नाइलाजाने कपाशी पेरून आपल्या पायावर पुन्हा धोंडा पाडून घ्यावा लागणार आहे.