आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि आमचा पुर्नजन्म झाला!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमीप्रमाणे पुण्यातून मुंबईला मंत्रालयामध्ये कामासाठी निघालो. आज त्या घटनेला बरोबर एक वर्ष झाले. दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कामानिमित्त भेटावयाचे होते. दुपारी मंत्रालयामध्ये पोहोचलो तेव्हा एक वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली होती. गेटवर पास घेऊन मंत्रालयामध्ये गेलो. मीटिंग असल्यामुळे सरळ सहावा मजला गाठला. दादा आले नव्हते. त्यामुळे पॅसेजमध्ये उभा होतो. दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी दादा आले, ते सरळ अँटी चेंबरमध्ये गेले व तेथे त्यांची चर्चा सुरू होती. आम्ही बाहेर मूळ केबिनमध्ये बसलो होतो. दोन वाजून चाळीस मिनिटांनी धुराचा वास येऊ लागला व चौथ्या मजल्यावर आग लागल्याचे वृत्त समजले. दादा चेंबरमधून बाहेर आले. त्यांनी केबिनची खिडकी उघडून बघितले. बाहेर धूरच धूर दिसत होता; परंतु दादांनी मीटिंग सुरू केली. आम्ही जवळजवळ वीस-पंचवीस जण केबिनमध्ये होतो. दोन वाजून पन्नास मिनिटे झाली व मीटिंग हॉलमधून एक सुरक्षा अधिकारी ‘लवकर बाहेर पडा, आग भयंकर वाढली आहे’, असे ओरडत बाहेर पडला व त्याने दादांना मीटिंगमधून खाली घेऊन गेल्याचे सांगितले. तोपर्यंत मीटिंग हॉल पूर्ण रिकामा झाला होता. हे पाहून माझ्या मनामध्ये चर्र झाले व एका थरारनाट्य सुरू झाले.


आम्ही केबिनमधील मंडळींनी मुख्य दार उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत प्रचंड मोठ्य प्रमाणात काळे-काळे धुराचे लोट पूर्ण पॅसेजमध्ये पसरले होते व त्यास रबर, वायरचा वास येत होता. मी त्या धुरामधून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला; परंतु शक्य होत नव्हते, कारण एक फूट अंतरावरचेसुद्धा दिसत नव्हते. आग चौथ्या मजल्यावरून पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. आम्ही धुराच्या वासामुळे अस्वस्थ झालो होतो. तोपर्यंत लाइट, एसी पूर्ण बंद झाले. आमच्या ग्रुपमधील लोकांनी पुन्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; परंतु ते शक्य नव्हते व दार उघडले तर धुराचे लोट आत येत होते. त्यामुळे सर्व जण ओरडायला लागलो. नंतर आम्ही सर्वांनी दार न उघडण्याचा निर्णय घेतला व खिडकीमधून खाली बघितले. तोपर्यंत दादा खाली पोहोचले होते व स्पीकरवरून आम्हास मदत पाठवत असल्याचे सांगत होते.

आमच्यासोबत असणा-या आमदार विनायक मेटेंनी दादांशी मोबाइलवर संवाद साधला होता. आग सहाव्या मजल्यावर पोहोच्ूान वा-याच्या दिशेमुळे मुख्यमंत्री दालनाकडे सरकत होती. आग वाढत असल्याचे खिडकीमधून दिसत होते. आमचा सर्वांचा धीर सुटत होता. काय करावे हे सुचत नव्हते. घरी फोन करून मी बिकट परिस्थितीमध्ये अडकल्याचे वृत्त कळवले होते. तोपर्यंत आमच्यामधील काही अधिकारी आपण आता वाचत नाही, कोणत्याही क्षणी आग पसरणार व आपण मरणार म्हणून रडू लागले. तो प्रसंग पाहून मी एकदम हतबल झालो. समोर मरण दिसू लागले. तो वार गुरुवार होता. मी मनात साईबाबांचे स्मरण केले व सर्वांना केबिनच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यास सांगितले व खुर्ची उचलून काचा फोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे थोडी हवा खेळती होऊ लागली. माझ्याबरोबर सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता पवार होते. आम्ही दोघे एकमेकांना धीर देत होतो. जिथून महाराष्‍ट्राची डिझास्टर मॅनेजमेंट केली जाते तेथेच तिची पूर्णपणे दाणादाण उडाली होती. आग लागल्यामुळे सायरन वाजत नव्हते. आग आटोक्यात आणण्याचे काहीच साधन नव्हते. खाली फायर ब्रिगेडच्या गाड्या आत येऊ शकत नव्हत्या. त्यामुळे मदत पोहोचत नव्हती. शेवटी आम्ही ठरवले की, खिडकीमधून खाली उतरायचे. मी एका खिडकीमधून व मुख्य अभियंता पवार एका खिडकीतून असे आम्ही सहाव्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर पडलो. इमारतीला लागून असणा-या पाइपला धरून खाली घसरत आलो; परंतु मध्येच असणा-या केबलमध्ये पाय अडकला. दुष्काळात तेरावा महिन्यासारखे झाले. परंतु, हवेत लटकत अडकलेला पाय ओढून काढत मी पुन्हा खाली घसरत आलो व खालच्या मजल्याच्या छज्ज्यावर उतरलो. तोपर्यंत तेथे बकेट असणारी क्रेन पोहोचली होती. त्यात बसल्यावर मी मनात देवाचे आभार मानले व सुटकेचा नि:श्वास सोडला. खाली पोहोचलो तेव्हा तीन वाजून चाळीस मिनिटे झाली होती. खाली आल्यावर समोरच दादा होते. त्यांच्या चेह-यावर काळजीचे सावट स्पष्ट दिसत होते. त्यांनी वर काय परिस्थिती आहे हे विचारले. खाली जवळजवळ पंधरा मिनिटे थांबलो. तोपर्यंत सर्व जण खाली उतरले होते. खिडकीमध्ये बेशुद्ध पडलेल्या एका व्यक्तीलासुद्धा अग्निशामक दलाच्या लोकांनी बाहेर काढले होते. तोपर्यंत केबिन पूर्णपणे पेटली होती. वरचे चित्र तापलेल्या लाल भट्टीसारखे दिसत होते. माझा पुनर्जन्मच झाला होता. साईबाबांचे मनापासून आभार मानत होतो. तोपर्यंत बातमी समजली की, या दुर्दैवी घटनेमध्ये चार जणांचा बळी गेला होता. मन स्तब्ध झाले होते. काळवंडलेले मंत्रालय बघत मी बाहेर पडलो. मोबाइलवर सर्वांना मी सुखरूप बाहेर आल्याचे कळवत मी गाडीत बसलो व परत पुण्याला जाण्याचा रस्ता पकडला.