आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपळ्यांचे भ्रम (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातसह चार राज्यांतील विधानसभा आणि लोकसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाने भाजपच्या मोदी कंपूत एकदमच उत्साहाचे भरते आले आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या सहा जागा भाजपने खेचून आणल्या. मतदारांनी काँग्रेसला दाखवलेला हा ठेंगा म्हणजे देशातील काँग्रेसचे काउंटडाऊन सुरू झाल्याचा स्पष्ट इशारा असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी ताबडतोब दिली. मोदी हे कसलेले राजकारणपटू आहेत. त्यांना कुठल्या गोष्टीचे श्रेय पटकन घ्यायचे, हे चांगले माहीत आहे आणि कुठे काय बोलायचे हे त्यांना कळते. म्हणजे गेल्याच महिन्यात कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला होता. कर्नाटकात मोदींनी दोन-तीन सभा घेतल्या होत्या, पण या थोड्याच सभांमुळे कर्नाटकातील भाजपविरोधी वारे काँग्रेसच्या शिडात जाऊन काँग्रेसचे जहाज बुडेल, असे भाजपचे सर्वच प्रमुख नेते सांगत होते. पण कर्नाटकच्या सर्वच थरांतल्या मतदारांनी भाजपला नाकारल्याने मोदींची पंचाईत झाली. पत्रकार जेव्हा प्रतिक्रिया घेण्यासाठी मोदींच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांच्या सचिवाने साहेबांना दातदुखीने सतावले असून ते प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत, असे सांगितले. त्यामुळे हिरमुसलेले पत्रकार मोदींच्या दातदुखीवर गॉसिप करू लागले. असे गॉसिप भविष्यात अंगावर येऊ नये म्हणून बुधवारी जेव्हा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले तेव्हा मोदी लगेचच मीडियापुढे आले. गेल्या महिन्यात आपल्याला दातदुखीने खरेच सतावले होते व पण आता दात उत्तम असल्याचा पुरावा म्हणून त्यांनी राजनाथसिंह यांनी भरवलेला पेढा पत्रकारांपुढे खाऊन दाखवला. पत्रकारांनादेखील मोदी धट्टेकट्टे असल्याने हायसे वाटले. कारण दोन दिवसांनी गोव्यात सुरू होणार्‍या भाजपच्या कार्यकारिणीत मोदींना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून जाहीर करण्याची शक्यता आहे. म्हणजे मोदी समर्थकांची तशी इच्छा आहे, परंतु बहुधा निवडणूक प्रचारयंत्रणेचे मुख्य सूत्रधार अशी त्यांची नियुक्ती होईल. पंतप्रधानपदाची उमेदवारी अनुस्यूत असेल. एकदा मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपले काम फत्ते झाले, असा सुस्कारा मीडिया टाकू शकतो. दुसरीकडे भाजपचे धुरीण अडवाणींना कंटाळले आहेत. अडवाणी हे मोदींच्या विकासरथाच्या नेहमी आडवे येत असतात, अशी त्यांची तक्रार आहे. अडवाणींना कायमचा कात्रजचा घाट दाखवण्याची संधी ते शोधत आहेत. आता गुजरातच्या पोटनिवडणुकांतील यशामुळे राजनाथसिंहांपासून जेटलीपर्यंतच्या सर्वच नेत्यांना गोव्यात मोदींच्या नावाने मोहोर प्रस्थापित करण्याची घाई झाली आहे. एकदा मोदींचे नाव पंतप्रधानपदाच्या दावेदारीसाठी घोषित केले की मग खर्‍या अर्थाने भारताचे दुसरे स्वातंत्र्ययुद्ध (की तिसरे?) सुरू होईल, अशी संघपरिवार-भाजपची खेळी आहे. भाजपने आपल्या ‘भारत विजय’ यात्रेची खरी सुरुवात 2002 पासून सुरू केली होती. त्याची प्रयोगशाळा त्यांनी गुजरातेत स्थापन केली होती. या प्रयोगशाळेत दोन प्रयोग नेटाने करण्यात आले. एक म्हणजे, अल्पसंख्याकांच्या मनात भीती उत्पन्न करणे आणि दुसरे विकासाचे मॉडेल विकसित करणे. या दोन्ही प्रयोगांत आपण यशस्वी ठरलो आहोत, याबाबत भाजपमध्ये एकमत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये सहा विधानसभा जागांमध्ये काँग्रेसला पराभूत केल्यामुळे काँग्रेसचे संपूर्ण देशात पतन झाले, अशा भ्रमात भाजप राजकीय गणित मांडून 2014 च्या निवडणुकांसाठी तयारी करत आहे. भाजपचा असाही ग्रह झालेला आहे की, आर्थिक घोटाळे, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि आर्थिक आघाडीवर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना आलेले अपयश (?) यामुळे काँग्रेसच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनमत आहे. पण प्रत्यक्षात अलीकडील निवडणुकांची आकडेवारी पाहता चित्र वेगळे दिसते. ‘बिझनेस स्टँडर्ड’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत 2009 पासून आतापर्यंत 21 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपच्या बाजूने नव्हे, तर काँग्रेसच्या बाजूने आपला कौल दिल्याचे म्हटले आहे. या 21 राज्यांमधील निवडणुकांत काँग्रेसने 177 जागा जिंकल्या असून 86 जागांवर त्यांचा पराभव झाला आहे, तर भाजपने केवळ 46 जागा जिंकून 133 गमावल्या आहेत. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास काँग्रेसने 91 जागा कमावल्या आहेत, तर भाजपने 87 जागा गमावल्या आहेत. भाजपची ही ‘पराभव यात्रा’ मोदींवरच्या आंधळ्या प्रेमापायी भाजपतीलच नेत्यांकडून दुर्लक्षिली जात आहे. हे नेते गुजरातमधील विजयामध्ये अजूनही मश्गुल आहेत, त्यांना कर्नाटकातील दारुण पराभवाबाबत आत्ममंथन करण्यास वेळ मिळालेला नाही. मोदी ब्रँड देशभर लोकप्रिय असल्याने कसलीच तयारी करण्याची या पक्षाची इच्छा नाही. काँग्रेसचा पराभव त्यांच्या कर्माने होईल, या थिअरीवर भाजपची श्रद्धा असल्याने त्यांच्यामध्ये शिथिलता आली आहे. या शैथिल्याचा फटका त्यांना या चार वर्षांत मतदारांनी दिला आहे. भाजपशासित असलेली उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक राज्यांत मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. पुदुचेरी, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांत भाजपचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पंजाबमध्येही गेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत भाजपला सात जागांचा फटका बसला होता, पण अकाली दलाशी युती केल्याने ते पुन्हा सत्तेत आहेत. भाजपला पूर्व भारतातील राज्यांमध्येही चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाही. आता डिसेंबरपर्यंत दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या राज्यांमध्ये भाजप विजयी झाला तर त्याचे श्रेय मोदींना मिळू नये यासाठी आतापासून भाजपमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवाय भाजप निवडणुका लढवणार फक्त 220 जागांसाठी. त्या सर्वच्या सर्व जिंकल्या तरी त्यांना गरज लागेल आणखी 53 जागांची. म्हणजेच एनडीए आघाडीतील मित्रपक्षांची मोदींच्या नावाला संमती असेल तरच ‘नमो’च्या गुढ्या उभ्या करता येतील. पण निदान तोपर्यंत संभाव्य विजयाच्या उन्मादात राहायला काय हरकत आहे? गोव्यात पक्षाची होणारी बैठक ही त्या दृष्टीने महत्त्वाची आहे.