आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सी-130 जे’ : चीनच्या तयारीला उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या वाढत्या लष्करी शक्तीचा हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्यावर परिणाम होत आहे. त्यातून चीनच्या आक्रमकतेमुळे भारताच्या हिंदी महासागरीय क्षेत्रातील राष्ट्रहितांना आव्हान मिळू लागले आहे. त्याच वेळी चिनी लष्कराकडून सातत्याने भारतीय प्रदेशात घुसखोरीचे प्रकार वाढलेले असून त्यातून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरही आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताने गेल्या काही वर्षांपासून आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण आणि क्षमतेचा विस्तार सुरू केला आहे. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून पश्चिम बंगालमध्ये पनागड येथील ‘अर्जन सिंग’ हा भारतीय हवाई दलाचा नवा तळ सुरू करण्यात आला आहे. सध्या भूतानमधील डोकलाम येथील चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. योगायोगाने त्या पार्श्वभूमीवर हा नवा हवाई तळ सुरू झाला आहे. 

‘अर्जन सिंग’ हवाई तळाची सुरुवात भारतीय हवाई दलाची पूर्वेकडील आघाडीवरील तयारी अधिक बळकट करणारी घटना ठरली आहे. या तळावर सध्या हवाई दलाच्या ‘सी-१३० जे सुपर हर्क्युलिस’ या मालवाहू विमानांची तुकडी तैनात केली गेली असून तिच्या दिमतीला एक ‘आयएल-७८ एमकेआय’ हे इंधनवाहू विमानही तैनात करण्यात आले आहे. ‘सी-१३० जे’ विमानांचा हा देशातील दुसराच तळ ठरला आहे. हा तळ कार्यान्वित झाल्याचे वृत्त येताच भारतातील प्रसारमाध्यमांनी या घटनेकडे डोकलामच्या घटनेच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. मात्र, हवाई दलासाठी या विमानतळाचे पुनरुज्जीवन करून तेथे ‘सी-१३० जे’साठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची सुरुवात २०१५मध्येच झाली होती. त्या सुविधांच्या निर्मितीसाठी ‘सी-१०३ जे’ तयार करणाऱ्या ‘लॉकहिड मार्टिन’ कंपनीच्या तंत्रज्ञांनी मदत घेण्यात आली होती. ते काम २०१७ च्या मध्यावर पूर्ण झाल्यावर ‘सी-१३० जे’ची पूर्ण तुकडी या तळावर कार्यान्वित करण्यात आली आहे. 

कोलकात्यापासून १५० किलोमीटरवर वसलेला पनागडचा हवाई तळ दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी १९४४ मध्ये अमेरिकेने आपल्या भूदल आणि हवाई दलासाठी बांधला होता. त्या तळावरून अमेरिकेचे जवान, विमाने चीन आणि बर्मावरील मोहिमांसाठी धाडले जात होते. पुढे स्वातंत्र्यानंतर १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धांमध्येही या हवाई तळाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर मात्र पनागडच्या धावपट्टीचा लष्करी कारणांसाठी वापर बंद करण्यात आला होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये चीनकडून भारताच्या सुरक्षेसमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा विचार करून हवाई दलाने हा तळ लष्करी हेतूंनी पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेत २०१५ पासून या तळाच्या विकासाचे काम सुरू केले. भारतीय हवाई दलातील सर्वोच्च पद भूषवणारे ‘मार्शल ऑफ द इंडियन एअरफोर्स अर्जन सिंग’ यांच्या सन्मानार्थ २०१६ मध्ये पनागडच्या हवाई तळाला ‘एअरफोर्स स्टेशन अर्जन सिंग’ असे नाव देण्यात आले. या तळामुळे आणीबाणीच्या प्रसंगी ईशान्येकडील सीमांवरील दुर्गम प्रदेशांमध्ये विशेष दलांना तातडीने पोहोचवणे भारतीय हवाई दलाला शक्य झाले आहे. या तळावरील ‘आयएल-७८’ विमानामुळे पूर्वेकडील तसेच ईशान्येकडील हवाई तळांवरील ‘सुखोई-३० एमकेआय’ लढाऊ विमानांचा पल्ला वाढवण्यासाठी मदत झाली आहे. पश्चिम बंगालच्या उत्तरेला वसलेल्या हाशिमारा हवाई तळावर फ्रान्सकडून विकत घेतलेल्या अत्याधुनिक ‘रफाल’ लढाऊ विमानांची तुकडी तैनात केली जाणार आहे. त्या विमानांचा पल्ला वाढवण्यासाठीही ‘अर्जन सिंग’ तळावरचे ‘आयएल-७८’ विमान उपयुक्त ठरणार आहे. रशियन बनावटीचे ‘आयएल-७८ एमकेआय’ हे विमान सहा कर्मचाऱ्यांमार्फत संचालित केले जाते. हवेत उडत असताना या विमानातून एकाच वेळी तीन लढाऊ विमानांमध्ये इंधन भरता येऊ शकते. या विमानातून एकावेळी ११० टन इंधन वाहून नेता येते. या विमानावर भारतीय बनावटीच्या संपर्क यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. 

‘सी-१३० जे सुपर हर्क्युलिस’ ही व्यूहात्मक मालवाहू विमाने खरेदी करण्यासंबंधी भारताने २००८ मध्ये अमेरिकेशी करार केला होता. त्यानुसार २०११ पासून ही विमाने भारतीय हवाई दलात सामील होण्यास सुरुवात झाली. भारताने अमेरिकेकडून अशी १२ विमाने खरेदी केली आहेत. ‘सी-१३० जे’ हे त्याच्या श्रेणीतील सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आणि सर्वात शक्तिशाली असे विमान आहे. छोट्यात छोट्या धावपट्टीवरूनही हे विमान सहजतेने उड्डाण करू वा उतरू शकते. त्यामुळे लडाखपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत चीनच्या सीमेजवळ उभारलेल्या ‘ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड’वरून आणि अगदी सीमेजवळच्या कच्च्या धावपट्ट्यांवरूनही हे विमान संचालित केले जाऊ शकते आणि दुर्गम भागांमध्ये ते आपल्या सैन्याला तातडीने पोहोचवू शकते. 

सध्या लॉकहिड मार्टिन कंपनीकडून ‘सी-१३०’ श्रेणीतील केवळ ‘सी-१३० जे’ या विमानाचेच उत्पादन होत आहे. जगातील विविध देशांच्या हवाई दलांमध्ये हे विमान कार्यरत आहे. या विमानात अत्याधुनिक आणि संगणकीकृत यंत्रणा बसवण्यात आल्यामुळे याच्या संचालनासाठी अतिशय कमी मनुष्यबळाची आवश्यकता भासते. केवळ ३ कर्मचाऱ्यांच्या मदतीने या विमानांचे संपूर्ण संचालन करता येते. ‘सी-१३० जे’ हे प्रवासी व मालवाहू विमान असल्यामुळे त्याच्यातून एकाच वेळी ९२ प्रवासी किंवा ६४ पॅराट्रुपरना घेऊन जाता येते. मानवी मदतकार्याच्या वेळी ‘सी-१३० जे’मधून ७४ रुग्णांची वाहतूक करता येते. त्या वेळी त्यांच्यावर देखरेखीसाठी ५ वैद्यकीय कर्मचारीही विमानामध्ये तैनात करता येतात. इतकेच नाही तर हे विमान हलक्या लष्करी वाहनांचीही वाहतूक करू शकते. समुद्रसपाटीपासून सुमारे सव्वाबारा हजार मीटर उंचीवरून हे विमान उडू शकते. चार रॉल्स-रॉइस एई-२१०० डी ३ टर्बोप्रॉप इंजिनांच्या मदतीने ताशी ६७० किलोमीटर वेगाने जाऊ शकणाऱ्या ‘सी-१३० जे’चा पल्ला सुमारे सव्वातीन हजार किलोमीटर आहे. अशा प्रकारे सुमारे १९ टन वजनाचे साहित्य अत्यंत खडतर परिस्थितीतही सीमेवर तैनात असलेल्या आपल्या लष्करी तुकड्यांपर्यंत पोहोचवण्याची आणि अन्य भूमिकाही बजावण्याची ‘सी-१३० जे’ची क्षमता या विमानाला हवाई दलाचे विशेष अस्त्र बनवते. ‘सी-१३० जे’ विमान मानवी मदत आणि आपत्ती निवारणामध्येही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. उत्तराखंडमधील ढगफुटीच्या वेळी या विमानांनी दुर्गम भागांमध्ये मदत साहित्य पोहोचवले होते. त्यामुळे ‘अर्जन सिंग’ तळावरील ‘सी-१३० जे’ विमानांवर संरक्षणाबरोबरच मानवी मदतीचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आपत्तीच्या वेळी त्वरित मदत पोहोचवणे शक्य झाले आहे. इतकेच नव्हे तर या तळावरून शेजारील देशांनाही आपत्तीच्या काळात भारत त्वरित मदत साहित्य पोहोचवू शकणार आहे. याचा भारताला आपल्या परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीसाठी लाभ होणार आहे. 

सुरक्षाविषयक आवश्यकता लक्षात घेऊन ‘अर्जन सिंग’ तळावर विशेष दलांसाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. ईशान्येकडील चीनला लागून असलेल्या सीमेच्या संरक्षणासाठी भूदलात स्वतंत्र ‘१७ स्ट्राइक कोअर’ विभाग स्थापन करण्यात आला असून त्याचे मुख्यालयही पनागडमध्येच आहे. त्यामुळे भूदलाला गरजेनुसार तातडीने सीमेवर पोहोचवणे शक्य झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘सी-१३० जे’ची तुकडी ‘अर्जन सिंग’ तळावर कार्यरत होणे व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरले आहे. 

सध्या ‘अर्जन सिंग’ तळावर ‘सी-१३० जे’ आणि ‘आयएल-७८’ विमाने तैनात असली तरी हवाई दलाच्या गरजांनुसार या तळावरून अन्य मालवाहू विमानेही संचालित केली जाऊ शकतील. 

- पराग पुरोहित, (संरक्षण अभ्यासक)
parag12951@gmail.com
बातम्या आणखी आहेत...