आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यंगचित्रांस कोण घाबरतंय?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यंगचित्रांविना वर्तमानपत्र-नियतकालिके आणि नेत्याविना व्यंगचित्रांची कल्पनाच करता येत नाही. अनेक दशकांपासून व्यंगचित्रे आणि नेत्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. भारतातील राजकीय नेत्यांनी कधीही व्यंगचित्रे वाईट मानले नाहीत. मात्र, नेत्यांच्या भावी पिढीमध्ये व्यंगात्मक टीका सहन करण्याची क्षमता कमी होत चालली आहे काय? नेते व्यंगचित्रांना घाबरत आहेत काय? असे प्रश्न व्यंगचित्रांबाबत नुकत्याच उफाळून आलेल्या वादामुळे निर्माण झाले आहेत.
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू एकदा व्यंगचित्रकार शंकर पिल्लई यांना म्हणाले होते की, ‘तुम्ही आपल्या व्यंगचित्रांमध्ये मलाही सोडू नका.’ तसेही पिल्लई नेहरूंना सोडणार नव्हतेच. त्यांनी नेहरूंवर आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून अनेकवेळा बोचरी टीका केली. आर. के. लक्ष्मण यांनीही नेहरूंसह त्या काळातील दिग्गज नेत्यांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून फटकारे ओढलेले आहेत. मात्र, त्यावेळच्या एकाही नेत्याने किंवा त्यांच्या सर्मथकांनी आक्षेप घेतला नव्हता. एवढेच नाही तर एनसीईआरटीच्या पाठय़पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या व्यंगचित्रावर नुकताच वाद निर्माण झाला होता ते व्यंगचित्र स्वत: नेहरू आणि आंबेडकरांनीही पाहिले होते. त्या काळात हे व्यंगचित्र दलितविरोधी आणि आंबेडकरांची खिल्ली उडवणारे आहे, असे कोणीच म्हटले नव्हते.

मग अचानक असे काय झाले? यामागे राजकारण किंवा कमी होत चाललेली सहिष्णूता आहे काय? या व्यंगचित्राबाबत काही दिवसांपूर्वीच मोठा वाद उफाळून आला. त्यामुळे राज्यशास्त्राच्या सर्वच पुस्तकांचा पूर्ण आढावा घेतला जाईल आणि गरज भासल्यास खासदार, राजकीय नेते आणि राजकीय प्रक्रियेवर टीका करणारी सर्वच व्यंगचित्रे या पुस्तकातून काढून टाकले जातील, असे सरकारला याप्रकरणी स्पष्ट करावे लागले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुधीर तेलंग यांनी सरकारचे हे वक्तव्य गंभीर असल्याचे म्हटले आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. आता पुस्तकांमध्ये व्यंगचित्रे राहणार नाहीत आणि त्यानंतर क्रमांक लागेल तो वर्तमानपत्रांचा, असेही तेलंग म्हणाले.

समजण्यात चूक की राजकारण?
नेहरू आणि आंबेडकर यांच्यावर तयार करण्यात आलेले व्यंगचित्र प्रख्यात व्यंगचित्रकार शंकर पिल्लई यांनी 1949 मध्ये तयार केले होते. लोकांना या व्यंगचित्राचा अर्थ चांगल्या रीतीने समजला नाही, हेदेखील एक वादाचे कारण आहे. व्यंगचित्रात गोगलगाय हे घटना सभेचे रूपक आहे. जाणकारांच्या मते, नेहरू बाबासाहेबांवर चाबूक चालवत आहेत, असा अर्थ काही जणांनी या व्यंगचित्रातून काढला आहे. लोक याच चाबकाचा चुकीचा अर्थ काढत आहेत. खरे म्हणजे या व्यंगचित्रात राज्यघटना बनवण्यास झालेल्या अनपेक्षित विलंबामुळे नेहरू नाराज असल्याचे दाखवण्यात आले आहे. खरे तर या वादाचे मूळ कारणच राजकारण हे आहे. राजकीय पंडितांच्या मते, दलित मते आकर्षित करण्यासाठी काँग्रेस आणि बसप यांच्यातील संघर्ष या वादाचे कारण आहे.

व्यंगचित्रे नष्ट होतील काय?
संसदेत झालेल्या चर्चेनंतर पाठय़पुस्तकांमध्ये व्यंगचित्रांवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी चर्चा होत आहे. व्यंगचित्रांचा खरा अर्थ समजण्याइतपत लहान मुलांचा मेंदू विकसित झालेला नसतो, असा तर्क काढण्यात येत आहे. मात्र, सध्याच्या काळात लहान मुले माहितीच्या पूर्णपणे आहारी गेले आहेत, हे येथे उल्लेखनीय. टीव्ही आणि इंटरनेटच्या रूपात असलेल्या माध्यमांमुळे मुलांना ठरवूनही माहितीपासून वंचित ठेवता येणार नाही. अशावेळी व्यंगचित्रांवर बंदी घातल्यास मुलांवर परिणाम होईल किंवा नाही, हे माहीत नाही. मात्र व्यंगचित्रांचे भविष्य मात्र नक्कीच धोक्यात येईल. शिक्षणतज्ज्ञ ए. एस. सीतारामू यांच्या मते, व्यंगचित्रे आयुष्याचे वास्तव उघड करतात. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे एक माध्यम असून, त्यावर बंदी घालण्याचा निर्णय योग्य नाही.

पळपुट्या सरकारचा विक्षिप्त निर्णय
नेत्यांची मानसिकता कशी आहे, हे व्यंगचित्राच्या वादावर संसदेत झालेल्या चर्चेतून समजते. हे नेते वास्तव तर दूरच, पण थट्टाही सहन करू शकत नाहीत. 1949 मध्ये बनलेल्या व्यंगचित्रावर आता वाद निर्माण होण्याचे कोणते औचित्य आहे? मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम होत असल्याचा तर्कही वास्तवापासून कोसोदूर आहे. पुस्तकातून हटवल्यामुळे व्यंगचित्रे संपणार तर नाहीच, पण एक घाबरलेले सरकार यापेक्षा विक्षिप्त निर्णय घेऊ शकत नाही, हेही खरे आहे.
आशुतोष, ज्येष्ठ पत्रकार

व्यंगचित्रांचे राजकारण

मी जवळपास दोन वर्षे शंकर पिल्लई यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे मी त्यांची मानसिकता चांगल्या प्रकारे समजू शकतो. ते धार्मिक किंवा जातीय आधारे टीका करूच शकत नाहीत. या संपूर्ण प्रकरणाचे मूळ म्हणजे त्याला राजकीय रंग देण्यात आला आहे. तथापि, व्यंगचित्रांच्या भविष्याबाबत मला कसलीही शंका नाही. या वादामुळे व्यंगचित्रांच्या अस्तित्वाला कोणताच धोका निर्माण होणार नाही.
व्ही. जी. नरेंद्र, मॅनेजिंग ट्रस्टी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ काटरूनिस्ट्स, बंगळुरू