आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्टून्स बनली मार्केटिंग गुरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्कूल बॅग असो की वॉटर बॉटल, कम्पास बॉक्स असो की अगदी लेबल्स, नोटबुक की जेवणाचा डबा... प्रत्येक वस्तूवर पोकेमॉन, नॉडी, पॉवर रेंजर, डोरेमॉन, शिनचॅन, बॅटमॅन, बार्बी, बेन 10, डिस्ने आणि छोट्या पडद्यावरची समस्त कार्टून मंडळी वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवत आहेत. यापैकी एकही दोस्त जर या वस्तूंवर विराजमान नसेल तर ती वस्तू घरी येणार नाहीच म्हणून समजा. कार्टून व्यक्तिरेखांच्या या बहरत असलेल्या व्यापारी (मर्चंडाइझ) बाजारपेठेत आता तर छोट्या भीमनेही उडी मारली आहे. टीव्हीच्या छोट्या पडद्यातून बाहेर पडलेला ढोलकपूरचा हा छोटा भीम आपल्या शहरातील एखाद्या आऊटलेटमध्ये दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. या छोट्या भीमला विविध वस्तूंच्या रूपाने घराघरात पाठवण्याची कल्पना ग्रीनगोल्ड अ‍ॅनिमेशन या कंपनीला सुचली आहे. छोटा भीम या सर्वाधिक कमाई करून देणा-या मालिकेला गेल्या वर्षी 34 दशलक्ष व्ह्यूअरशिप मिळाली. त्यामुळे या कंपनीने आता काही लायसन्स डील करून देशाच्या विविध भागांत शंभरपेक्षा जास्त मर्चंडाइज स्टोअर्स उघडण्याची योजना आखली आहे. या दुकानांमधील टी शर्ट, फोटो फ्रेम्स, फॅशन अ‍ॅक्सेसरीज इतकेच नाही तर लेखन सामग्रीवर फक्त छोटा भीम बघायला मिळणार आहे.
तसे पाहायला गेले तर कार्टून कॅरेक्टर मर्चंडायझिंग अर्थात कार्टून व्यक्तिरेखांचा व्यापारी उपयोग करण्याची पहिली कल्पना सुचली ती कार्टून नेटवर्क या वाहिनीला. त्या काळात आतासारख्या ढिगावारी कार्टून वाहिन्याही नव्हत्या. लहान मुलांनी आपल्याच चॅनलला चिकटून बसावे असाही कदाचित ‘प्रमोशन’ हेतू यामागे असावा. पण काहीही असो, बच्चे कंपनीच्या विश्वात 10 वर्षे अढळ स्थान मिळवल्यानंतर 2005 मध्ये कार्टून नेटवर्क वाहिनीने द पॉवरपफ गर्ल्स, डेक्स्टर लॅबोरेटरी आणि जॉनी ब्रेव्हो या तीन कार्यक्रमांची लोकप्रियता कॅश करून लहानग्यांसाठी अगदी 4 रुपयांपासून ते 1,140 रुपयांपर्यंत विविध श्रेणीतील ब्रॅँडेड उत्पादने बाजारात आणली. कार्टून नेटवर्कला हा फंडा चांगलाच जमला. बच्चे कंपनीची ही छोट्या पडद्यावरची स्टार मंडळी थेट संगीतापासून ते चॉकलेट, पुस्तके, बिस्किटे, तयार कपडे, खेळणी, रेनकोट, कॅमेरा, लेखन साहित्य, भेटवस्तू, भेटकार्डांवर कधी येऊन अवतरली ते कळलेदेखील नाही. येथेच कार्टून नेटवर्क वाहिनीने ‘कार्टून कॅरेक्टर मर्चंडायझिंग’ बाजारपेठेची मुहूर्तमेढ रोवली. कार्टून व्यक्तिरेखांचा उत्पादनांच्या विक्रीसाठी वापर करणे हीदेखील एक कला आहे. विशेषकरून लहान मुलांच्या बाबतीत. कारण बच्चे कंपनीमध्ये सध्या लोकप्रिय असलेल्या कार्टून व्यक्तिरेखांचीच निवड त्यांना करावी लागते. मर्चंडायझर अर्थात व्यापारी कंपनी बाजारातील सध्याचा कल, ग्राहकाचे वय, लिंग आणि हंगाम लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादने तयार करते. त्यामुळेच रेनकोट, शाळेचे दप्तर, छत्री यासारख्या शालेय वस्तूंवर टॉम अ‍ॅँड जेरी, मिकी माऊस, स्कूबी डू अजूनही फेवरिट आहेत. एखाद्या उत्पादनावर या कार्टून्सचा एकवेळ फोटो नसला तरी चालेल, पण अगदी त्यांचे नाव असले तरी पुरेसे असते. त्यामुळे ग्राहकोपयोगी कंपन्यांपासून ते अगदी दूरचित्रवाणी वाहिन्यांपर्यंत प्रत्येक जण कॅरेक्टर मर्चंडायझिंग बाजारपेठेत शिरकाव करतोय.
वॉर्नर ब्रदर्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सनेही कार्टून व्यक्तिरेखांच्या उत्पादन विक्रीतून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय मिळवला. अलीकडेच फ्यूचर समूहाने आपल्या व्हेंचर फंडाच्या माध्यमातून ‘अमर चित्रकथा’ची मालकी असलेल्या एसीके मीडिया या कंपनीमधील 56 टक्के भागभांडवल खरेदी केले. आता अमर चित्रकथांमधील व्यक्तिरेखांचा व्यापारी उपयोग करण्यासाठी थीम पार्क उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. त्याहीअगोदर कोलगेट पामोलिव्ह, हिंदुस्तान लिव्हर, डाबर, टाटा समूहातील ट्रेंट, प्रायमस रिटेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांनाही आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कार्टून व्यक्तिरेखांचा उपयोग करण्याचा मोह टाळता आला नाही. म्हणता म्हणता आज फ्रॅँचायझिंग उद्योग 90 हजार कोटी रुपयांवर जाऊन पोचला असून या बाजारपेठेत वार्षिक 25 ते 30 टक्क्यांनी वाढ होत आहे. सिंगल ब्रॅँड रिटेलमध्ये विदेशी थेट गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे आता विदेशातील कार्टून मंडळीही ‘नेक्स्ट जनरेशन गुरुज’ ठरतील यात शंका नाही.