आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नीट’ ऐवजी ‘सीईटी’ च योग्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात सध्या बारावीच्या परीक्षेसाठी मुख्यत्वेकरून तीन पद्धती उपलब्ध आहेत. प्रत्येक राज्याची ‘राज्य मंडळ परीक्षा’. महाराष्‍ट्रापुरते सांगायचे झाले तर महाराष्‍ट्रातील साधारण 85 ते 90 टक्के विद्यार्थी राज्य शासनाचा अभ्यासक्रम घेतात. कारण लहान गावे तसेच तालुक्यातही ही शिक्षण पद्धती उपलब्ध आहे व शिक्षकसुद्धा उपलब्ध आहेत. दुसरी देशांतर्गत घेतली जाणारी परीक्षा पद्धती म्हणजे सीबीएसई अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. या मंडळाचं शिक्षण लहान शहरांमध्येही काही वर्षांपूर्वी सुरू झालं आहे. तरीही त्या शहरांतील साधारण 10 ते 12 टक्के विद्यार्थीच या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतात, असा अनुभव आहे. तिसरी पद्धत म्हणजे सीआयएससीई अर्थात कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट. ही पद्धतही देशपातळीवर आहे; पण साधारण 1 टक्क्यापेक्षाही कमी विद्यार्थी या पद्धतीचं शिक्षण घेतात किंवा घेऊ शकतात. कारण या पद्धतीचं शिक्षण देणा-या शाळा देशात सर्वत्र उपलब्ध नाहीत आणि शैक्षणिक शुल्कही जास्त असते.


वैद्यकीय शिक्षणासाठी घेतली जाणारी ‘नीट’ अर्थात नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ही परीक्षा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मागील वर्षी सुरू केली होती व ती महाराष्‍ट्रातही घेण्यात आली. ही परीक्षा सीबीएसई तसेच एनसीईआरटी (नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशन अँड रिसर्च ट्रेनिंग) च्या अभ्यासक्रमावर आधारित होती. इयत्ता 11 वी आणि 12 वीचा सामाईक अभ्यासक्रम त्यासाठी अभ्यासाला होता. त्याच पद्धतीने यंदाही वैद्यकीय प्रवेश परीक्षा होईल हे गृहीत धरून विद्यार्थी अभ्यासाला लागले होते. परंतु 18 जुलै 2013 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या परीक्षेला सध्यातरी स्थगिती देण्यात आली आहे. अर्थात, मेडिकल कौन्सिलने केंद्र सरकार व कायदा मंत्रालयामार्फत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्याचा निर्णय केव्हा व काय लागतो हे कुणीही सांगू शकत नसल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी अजूनही संभ्रमावस्थेत आहेत. परिणामी ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.


संपूर्ण भारतात एकच प्रवेश परीक्षा असावी म्हणजे विद्यार्थ्यांना जास्त परीक्षा द्याव्या लागणार नाहीत हा ‘नीट’ सुरू करण्यामागचा उद्देश निश्चितच चांगला आहे. पण सध्याच्या परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना एकाच तराजूत मोजणे कितपत योग्य आहे, हाही प्रश्न आहेच. सर्वच राज्यांतील किंवा महाराष्‍ट्राच्या कानाकोप-यातील सर्वच मुलांची तयारी या अभ्यासक्रमाच्या व्याप्तीनुसार झालेली निश्चितच आढळत नाही. हे मागच्या वर्षीच्या निकालावरूनदेखील पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. मागच्या ‘नीट’ परीक्षेमध्ये केरळ, बिहार, दिल्ली, हरियाणा या राज्यांतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश समाधानकारक आहे. महाराष्‍ट्रात मात्र केवळ 35 ते 36 टक्केच विद्यार्थी पात्र ठरले आहेत.


‘नीट’साठी लहान गावांत किंबहुना तालुक्याच्या ठिकाणीदेखील शिक्षण संस्था आणि शिक्षक सध्यातरी उपलब्ध नाहीत. कारण सीबीएससी, आयएसईसारखे अभ्यासक्रम महाग आहेत आणि सर्वसामान्यांना ते परवडणारेही नाहीत. सीबीएससीच्या महाविद्यालयातील 11 वीची प्रवेश फी साधारण 25 ते 30 हजार रुपये आहे, तर राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील 11 वीच्या विद्यार्थ्यांची फी साधारण 3 ते 4 हजार रुपये आहे, ही वस्तुस्थिती आहे.


अलीकडेच राज्य शासनाने 11 व 12 वीचा अभ्यासक्रम सीबीएससीप्रमाणे बदललेला आहे. तरीही त्यात 20 ते 25 टक्के फरक आहे. त्यामुळे मुलांना राज्य मंडळाबरोबरच सीबीएसईचीही पुस्तके वाचावी लागतात. त्यातून काही ठिकाणी संभ्रम निर्माण होतो. कारण दोन्ही अभ्यासक्रमातील काही समान प्रश्नांच्या उत्तरांमध्ये फरक आहे. अशा वेळी ‘अचूक’ उत्तर काय लिहावे, असा प्रश्न मुलांना पडतो आणि त्यामुळे त्यांचे गुण कमी होण्याची भीती आहे. आतापर्यंत झालेल्या महाराष्‍ट्राच्या ‘सीईटी’मध्ये केवळ 12 वीचा अभ्यासक्रम समाविष्ट होता आणि चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा करण्याची पद्धत नव्हती. ‘नीट’मध्ये 1 प्रश्न चुकल्यास 1 गुण कमी होतो, हेही अशा वेळी लक्षात घेतले पाहिजे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ऐवजी ‘सीईटी’ होईल, असे सांगण्यात येते आहे. मात्र, अभ्यासक्रमाबद्दल व परीक्षेच्या पद्धतीबद्दल अजूनही पुरेसा स्पष्ट खुलासा झालेला नाही. इंडियन मेडिकल कौन्सिलच्या अपिलावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडेही सर्वांचे डोळे लागले आहेत. त्यामुळे यंदा 12 वीला असलेले आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत.


यंदा 12वीला असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता फक्त 5 ते 6 महिने अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. वैद्यकीय प्रवेश परीक्षा साधारण मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात होते. त्यामुळे आताच वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम तसेच परीक्षेची पद्धती जाहीर करायला हवी, अशी अपेक्षा सर्व विद्यार्थी करीत आहेत.