आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचा-भतीजा आणि खिल्लारी जोडी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाने वर्दी दिली तसे आम्ही ठरवून टाकले की, या आठवड्यात राजकारण नाही; फक्त शेतकर्‍याच्या विषयावरच ‘टच’ करणार. तसे आम्ही एका सधन शेतकर्‍याच्या शोधात फिर फिर फिरलो. अख्खा महाराष्ट्र धुंडाळला, पण सधन शेतकरी काही मिळेना. जिथे जावे तिथे लोक म्हणत होते की, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे घर पाहिजे असल्यास दाखवतो. सधन शेतकरी कुठून दाखवायचा? शेती म्हणजे काय आयपीएल मॅच आहे, ताबडतोब सधन व्हायला! तसे आम्ही पण निमूटपणे काढता पाय घ्यायचो. असेच फिरता फिरता एके दिवशी बारामतीच्या बसस्टँडवर पोहोचलो. एसटीचा आठवड्याचा पास असल्याने पाहिजे तसे पाहिजे तेवढे फिरा, अशी योजना. आम्ही पोहोचलो बारामतीच्या स्टँडवर. कुणाला तरी विचारावे म्हणून कट्ट्यावर बसलेल्या एका पोराजवळ जाऊन विचारले की इथे सधन शेतकरी हाय का रे? तसं पोरगं रोखून बघू लागलं आणि गुरकावून म्हणालं, ‘माझा काका काय तो एकटा सधन हाय अख्ख्या पंचक्रोशीत. बाकी पटापटा जीव देणारे हायेत खंडीभर.’ तसे मी चमकलो अन् पोराला म्हटले, ‘काकाकडे घेऊन चल.’ तसे पोरगा पुन्हा कपाळावर आठ्या पाडून म्हणाला, ‘आरं माझ्या काकाचे तू फक्त नाव घे, तुला घरापर्यंत सोडायला येईल कोणी बी.’ मी म्हटले, ‘तू चल की.’ तसा अंगावर धावून आला व म्हणाला, ‘मला शानपना शिकवतोस?’ मी गोंधळात पडलो. म्हटले, साहेब पुन्हा ओरिजनलवर आलेले दिसतात . हा काकावर प्रेम करतो की काकाचा हव्यास करतो? पण मरू दे ना, आपल्याला काय?’ असे मनात म्हटले आणि चडफडत पोराने दिशा दाखवली त्यानुसार चालायला सुरुवात केली. थोड्याच वेळात काकाच्या फार्महाऊसवर जाऊन पोहोचलो तर काका कार्यकर्त्यांच्या गराड्यात. तरी मला बघताच हसले. आपुलकीने विचारले, ‘का आलास?’ तसे म्हणालो, ‘सधन शेतकर्‍याला भेटायची ओढ म्हणून आलो बघा.’ त्यांनी बसण्याची खूण केली, तसे नरमनरम सोफ्यावर बसलो. पाणी, चहा आला. म्हटले, आता मुलाखत सुरू करायला हवी. तसा घसा उगाचच खाकरून साफ केला.
‘तुमचा पुतण्या फारच द्वाड आहे बुवा...’ काहीतरी सुरुवात करायची म्हणून पुतण्याला पुढे केले. ‘भेटला वाटतं त्याला, कमनशिबी आहात’ म्हणून काकांनी आम्हाला उडवून लावले. आम्ही ‘आँ’ म्हणत आवंढा गिळला अन् ताबडतोब कल्पना आली, काका-पुतण्या यांच्या प्रेमळ नात्याची. बरं काकाश्री, प्रश्न विचारायला सुरुवात करू का? मुलाखत घ्यावी म्हणतो...’ असे आम्ही बॅकफूटवर येताच काका मिश्कीलपणे हसले. मानेनेच होकार दिला. तसा मीही सरसावलो अन् मनाचा हिय्या करून प्रश्न विचारलाच. ‘पाऊस-पाणी?’
‘पाऊस-पाणी? झक्कास! हे काय सगळीकडे भरून आलंय. सर्व तयारीला लागलेत. किती जागा लढवायच्या? कुठे काय पेरायचं? कुणाला कुठनं पाडायचं? वगैरे वगैरे...! ‘म्हणजे? तयारी झाली ना? नांगरणी वगैरे?’
‘तर...! नांगरणी झालीय...! जमीन तैयार करून ठेवली पेरणीसाठी. एकसाथ 20 मंत्र्यांचा राजीनामा घेतला की राव ..! गंमत आहे ना?’
‘मी शेतीबद्दल बोलतोय काकाश्री..!’
‘मी पण शेतीबद्दलच बोलतोय. राजकारण हीच आमची शेती. म्हणून तर सधन शेतकरी झालो मी...!’ म्हणत काका फिस्सकन हसतात.
‘बरं बरं, अजून काय तयारी केली शेतीची?’
‘हे बघा... वातावरण कसं जमून आलंय. निवडणुकांचा मान्सूनही वेळेआधीच पोहोचणार आहे. तेव्हा आज 20 दबंग मंत्र्यांचे राजीनामे घेऊन शेत पेरणीसाठी पुन्हा नव्याने तैयार करून ठेवलंय. नवं पीक घेण्याची वेळ आली आहे ना...!’ ‘हो हो... खरंच! तुमचे धक्का तंत्र वेगळेच आहे हं...!’ ‘आम्ही आधुनिक शेतकरी! नवीन नवीन प्रयोग केल्याशिवाय काही खरे नाही बघा आता. पारंपरिक शेती करण्याने काय हाल होतात पाहतच आहात ना?’ ‘हो हो, आत्महत्या, कर्जबाजारी...’ ‘छे हो... ते शेतकरी नाही... आमच्या मित्रपक्षाविषयी बोलत आहोत आम्ही. पंजावाले शेतकरी हो...! पाहिलंत ना त्यांची काय अवस्था झाली आहे राज्यात...!’ ‘काकाश्री, तुम्हीच तर केलीत त्यांची ही अवस्था...’
‘खरंय! हळू बोला. आम्ही म्हणतो, त्यांच्या स्थितीला तेच जबाबदार आहेत म्हणून...! आम्ही आक्रमकपणे शेती करतो राजकारणाची... पीक बी कसे तरारून येतं बघताच ना दर खेपेला...!’ ‘हो हो... पाणी नसले की पुतण्या आहेच...’ ‘कशाला तो विषय काढता सारखा सारखा...! ‘बरं बरं...! नांगरणी कशाने केली हो? ट्रॅक्टरने की पारंपरिक?’ ‘बैलजोडी लावली... नवी बैलजोडी...!’ ‘नवी बैलजोडी?’ ‘तर, हे वर्ष महत्त्वाचे आहे ना? तेव्हा नवीन दमाची नवी बैलजोडी!’ असे म्हणत काका नव्या बैलजोडीला हाक मारतात. ‘ए भास्कर, अरे ए जितेंद्र! या की इकडे!’ ‘मग! एकदम तरणीबांड आहेत, नव्या दमाची...’ ‘पण काका, एवढे करूनही पीक जोमाने आले नाही तर?’ ‘काका हसलात? काय मनात आहे तुमच्या...?’ ‘अरे बाबा एवढे करूनही पीक जोमाने आले नाही तर दोष नव्या बैलजोडीला द्यायचा...! कसं!’ असे म्हणत काका खो खो करून हसत सुटतात...