आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आँग सान स्यू कींपुढील आव्हान, रोहिंग्या मुसलमानांवर विश्वास ठेवायला तयार नाही ब्रह्मदेशातील बुद्ध जनता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रह्मदेशातील बुद्ध जनता रोहिंग्या मुसलमानांवर विश्वास ठेवायला तयार नाही. १९४० पासून भारतात पाकिस्तान निर्मितीची चळवळ सुरू झाली होती. बंगालमधील मुसलमान चळवळीत आघाडीवर होते. रोहिंग्या मुसलमानांनी या चळवळीला पाठिंबा दिला आणि आजचा रकाईन (अरकान) प्रांत पाकिस्तानात सामील करण्याची त्यांनी चळवळ केली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या म्यानमार (ब्रह्मदेश) भेटीसाठी गेले असता आंतरराष्ट्रीय स्तरावर म्यानमारमधून निर्वासित होणाऱ्या रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न गरमागरम चर्चेचा विषय झालेला आहे. आतापर्यंत म्यानमारमधून जवळजवळ एक लाख रोहिंग्या मुसलमान निर्वासित झाले आहेत. यातील बहुसंख्य बांगलादेशात गेलेले आहेत. स्टेट कॉन्सुलर  आँग सान स्यू की यांच्याबरोबर मोदी यांनी जे संयुक्त पत्रक काढले त्यात रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नांचा उल्लेख करून म्हटले गेले की, म्यानमारची राष्ट्रीय अखंडता आणि ऐक्य यांच्या रक्षणासाठी भारत म्यानमारच्या मागे उभा राहील. आँग सान स्यू की यांनी रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर भाष्य करताना म्हटले की, म्यानमार विरोधासाठी अपप्रचाराचा फार मोठा हिमनग दहशतवादाच्या समर्थनासाठी तयार केला आहे.  

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न आजच उपस्थित झाला आहे असे नाही. दरवर्षी त्यांच्याविषयी बातम्या येतात की, ब्रह्मदेशाचे लष्कर आणि बुद्ध जनता रोहिंग्या मुसलमानांच्या खेड्यांना आगी लावत आहेत, त्यांच्या मुलांचे शिरच्छेद केले जात आहेत आणि पुरुषांना जिवंत जाळले जात आहे. या वर्षीही या प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रांतून येत आहेत. समुद्रमार्गे काही जण बांगलादेशात येण्याचा प्रयत्न करतात. या प्रवासात काही वेळा बोटी बुडतात. आताही ४० जणांना घेऊन येणारी एक नौका बुडाली आणि नौकेतील सर्व जण बुडून मेले. बांगलादेशाला लागून असलेल्या भूसीमेच्या मार्गानेसुद्धा जे स्थलांतर चालू आहे ते १९४७ च्या भारत विभाजनाची आठवण करून देणारे आहे.  

प्रश्न असा निर्माण होतो की, ब्रह्मदेशातील रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात ब्रह्मदेशाची बुद्ध जनता आणि लष्कर का आहेत? ब्रह्मदेशातील हे मुसलमान रकाइन प्रातांत राहतात. त्याचे पूर्वीचे नाव आहे अरकान. या प्रदेशात मुसलमानांची वस्ती इंग्रजांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली. बंगालमधून मुसलमानांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर या भागात झाले. वांशिकदृष्ट्या रोहिंग्या मुसलमान ब्रह्मदेशाचे नाहीत. ‘रोहिंग्या’ हा शब्द फार प्राचीन नाही. ईस्ट इंडिया कंपनीने सर्वात प्रथम या मुसलमानांना शब्द दिला, रुइंगा. त्याचे रूपांतर रोहिंग्या या शब्दात झाले. 
 
१९३७ पर्यंत ब्रह्मदेश ब्रिटिश भारताचा भाग होता. १९३७ मध्ये इंग्रजांनी ब्रह्मदेशाला भारतापासून वेगळे केले. १९३७ पर्यंत भारतातून व्यापारी, कामगार, कुशल कामगार यांचे फार मोठ्या प्रमाणात ब्रह्मदेशात स्थलांतर झाले आणि बंगालमधून मुसलमान अरकान प्रांतात आले. हा प्रांत बंगालला लागून आहे. १९५१ पर्यंत रोहिंग्या मुसलमानांना ब्रह्मदेशाच्या सत्ताकारणात आणि सैन्यदलात स्थान होते. झुराबेगम १९५१ मध्ये ब्रह्मदेशाच्या रोहिंग्या खासदार होत्या. सुलतान मेहमूद हा तेव्हा रोहिंग्यांचा नेता होता. रोहिंग्या मुसलमानांना अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा, त्यांचे वेगळे अस्तित्व मान्य केले जावे इत्यादी त्याच्या मागण्या होत्या. 
 
ब्रह्मदेशात १९६२ मध्ये सैन्याने सत्ता आपल्या हातात घेतली. जनरल ने विन ब्रह्मदेशाचे लष्करशहा झाले. १९८२ मध्ये त्यांनी ब्रह्मदेशाचा राष्ट्रीयता कायदा आणला. या कायद्याने रोहिंग्या मुसलमान राज्य नसलेले (स्टेटलेस) मुसलमान झाले. त्यांना नागरिकत्वाचे अधिकार नाकारण्यात आले. सैन्यात ते भरती होऊ शकत नाहीत, मतदान करू शकत नाहीत, निवडणुकीला ते उभे राहू शकत नाहीत आणि शासकीय नोकऱ्यांत त्यांना स्थान नाही व ते ब्रह्मदेशाचे नागरिक नाहीत, बांगलादेशी आहेत, असे शासनाचे मत झाले.  यामुळे रोहिंग्या मुसलमान आणि ब्रह्मदेशी शासन यांच्यात संघर्ष अटळ झाला. २०१२ मध्ये आजच्यासारखाच रोहिंग्या निर्वासिंताचा प्रश्न जागतिक चर्चेचा विषय झाला. २०१५ मध्ये पुन्हा भीषण संघर्ष झाला आणि आजही तो तसाच चालू आहे. रोहिंग्या मुसलमानांनी ‘अराकन रोहिंग्या सालव्हेशन आर्मी’ स्थापन केली. हे सशस्त्र दल आहे. त्याने म्यानमारच्या २५ पोलिस चौक्यांवर हल्ले केले. त्यांच्या नेत्याचे नाव आहे - अबू अमर जुनुनी. ब्रह्मदेशाचे सैन्य जे आमच्यावर अत्याचार करते, त्याच्या प्रतिकारासाठी आम्ही उभे आहोत, असे त्याचे म्हणणे. त्याने जागतिक समुदायाकडे मदतीची मागणी केली आहे. या हल्ल्यानंतर सैन्य दलाने रोहिंग्यांच्या खेड्यांवर हल्ले सुरू केले. हेलिकॉप्टरमधूनही गोळीबार केला. या हल्ल्यानंतर झालेल्या संघर्षात ४०२ लोक ठार झाले, त्यात ३७० रोहिंगे मुसलमान आहेत, १५ पोलिसही मारले गेलेले आहेत.  

रोहिंग्या मुसलमानांच्या दृष्टीने प्रश्न त्यांना नागरी अधिकार मिळवण्याचा आहे. कारण ब्रह्मदेशाच्या दृष्टीने प्रश्न देशाचे ऐक्य अबाधित राखण्याचा आणि रोहिंग्या मुस्लिम हिंसेला रोखण्याचा आहे. या लढाईत आज तरी रोहिंग्या मुसलमान अत्यंत दुर्बळ आहेत. बांगलादेश त्यांना आपल्या देशातदेखील घ्यायला तयार नाहीत. तसाही बांगलादेश हा लोकसंख्येचा विस्फोट झालेला देश आहे. जगातील इतर मुसलमान देश रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नांवर कडक शब्दांत आपला निषेध व्यक्त करतात. तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रोहिंग्या मुसलमानांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.  

ब्रह्मदेशातील बुद्ध जनता रोहिंग्या मुसलमानांवर विश्वास ठेवायला तयार नाही. १९४० पासून भारतात पाकिस्तान निर्मितीची चळवळ सुरू झाली होती. बंगालमधील मुसलमान चळवळीत आघाडीवर होते. रोहिंग्या मुसलमानांनी या चळवळीला पाठिंबा दिला आणि आजचा रकाईन (अरकान) प्रांत पाकिस्तानात सामील करण्याची त्यांनी चळवळ केली होती. १९४८ मध्ये ब्रह्मदेश स्वतंत्र झाल्यानंतर रकाईन प्रांतात मार्शल लॉ पुकारला गेला होता. रोहिंग्यांची चळवळ काही त्यामुळे दबली गेली नाही. त्यांनी रोहिंग्या लिबरेशन पार्टी, रोहिंग्या पॅट्रियॉटिक फ्रंट स्थापन करून गनिमी युद्ध १९७४ पासून चालू ठेवले.  

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नाला अनेक पदर आहेत. निर्वासितांचा प्रश्न झाल्यामुळे तो मानवतेचा प्रश्न होतो. लहान मुले, स्त्रिया, वृद्ध यांचे स्थलांतर करताना फार हाल होतात. रोहिंग्या मुसलमानांना नागरिकत्वाचे अधिकार नसल्यामुळे हा प्रश्न मानवाधिकाराचाही होतो. ब्रह्मदेशाच्या शासनाविरुद्ध रोहिंग्या मुसलमानांनी शस्त्रे घेतल्यामुळे ब्रह्मदेशाच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि एकात्मतेचा प्रश्नही निर्माण होतो. भारत आणि बांगलादेशाच्या सीमा ब्रह्मदेशाला लागून असल्यामुळे निर्वासितांचे लोंढे या देशात येतात. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाची सर्वमान्य सोडवणूक करण्यासाठी भारत, बांगलादेश आणि म्यानमार यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. कोणत्याही लोकसमूहाचे नागरी हक्काचे प्रश्न दडपून टाकता येत नाहीत. त्यांचे समाधान शोधावे लागते. ब्रह्मदेशात बौद्धांची बहुसंख्या आहे म्हणून या प्रश्नाला बुद्ध जनता आणि रोहिंग्या मुस्लिम जनता असा एक पदरदेखील आहे. या दृष्टीनेदेखील प्रश्न नाजूक होतो. आँग सान स्यू की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्नदेखील शांततेने सोडवून या पुरस्काराचे सार्थक त्यांना करावे लागेल.
रमेश पतंगे, ज्येष्ठ पत्रकार
बातम्या आणखी आहेत...