आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विद्यापीठासमोरील आव्हाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उत्तम व्हावा आणि सर्व वैद्यकीय शाखांचे शिक्षणक्रम एका यंत्रणेकडून नियंत्रित व्हावेत, या चांगल्या उद्देशाने 10 जून 1998 रोजी नाशिक येथे महाराष्‍ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाली. यंदा या विद्यापीठाला 15 वर्षे पूर्ण होत आहे. स्थापनेपासून आजपर्यंत गेल्या पंधरा वर्षांत या विद्यापीठाने बरीच प्रगती केली असली तरीदेखील वैद्यकीय शिक्षणातील अनेक आव्हाने या विद्यापीठासमोर आजही आहेत, हे विसरून चालणार नाही. विद्यापीठाला आज म्हसरूळच्या पुढे दिंडोरी रोडवर स्वत:ची भव्य वास्तू लाभलेली आहे. या विद्यापीठाने अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमही गेल्या काही वर्षांत सुरू केले. आयुर्वेद अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि युनानी या वैद्यक शाखांचे अभ्यासक्रम या विद्यापीठांमार्फत चालतात.

वैद्यकीय पदवी घेतलेले अनेक डॉक्टर समाजात जाऊन वैद्यकीय सेवा पुरवतात, परंतु ही वैद्यकीय सेवा दर्जेदार असणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्या वैद्यकीय विद्यार्थ्याला उत्तम, दर्जेदार असे वैद्यकीय शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. असे दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देण्याची व्यवस्था करणे, हे आरोग्य विद्यापीठाचेच काम आहे. आज महाराष्‍ट्रात शासकीय, अनुदानित आणि खासगी अशा तीन प्रकारच्या वैद्यकीय शिक्षण संस्था आहेत. खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांची संख्याही मोठी असल्याने त्या ठिकाणच्या शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्याचे आव्हान आरोग्य विद्यापीठासमोर आहे.


वैद्यकीय शिक्षण देणा-या महाविद्यालयांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे आणखी एक मोठे आव्हान आहे. विशेषत: आयुर्वेद आणि होमिओपॅथी या शाखांची महाविद्यालये वाढत चाललेली आहे. अशी संख्या वाढत गेल्यास पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्राध्यापकांचा तुटवडा आज भासतो त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात भासू लागेल, अशी भीती आहे.
उत्तम प्राध्यापक निपजणे आवश्यक : विविध वैद्यकीय शाखांच्या महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करणारे अध्यापक आपापल्या विषयात निपुण असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच सदरचा वैद्यकीय विषय शिकवण्याची हातोटीदेखील त्या अध्यापकांकडे असणे आवश्यक आहे. म्हणून विविध वैद्यक शाखांच्या अध्यापकांसाठी अध्यापन कौशल्य निर्माण करणे हेदेखील एक आव्हानच आहे.

त्यासाठी वैद्यकीय अध्यापन कौशल्य असा एक स्वतंत्र अभ्यासक्रम आरोग्य विद्यापीठानेच तयार करावा आणि वैद्यकीय क्षेत्रात अध्यापन करण्यासाठी जसे त्या विषयातील पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असते, तसेच अध्यापन कौशल्याचा हा अभ्यासक्रमही वैद्यकीय अध्यापाकांसाठी सक्तीचा करावा. आज माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक स्थरावर अध्यापन करावयाचे असल्यास बी. एड. असणे ही किमान पात्रता आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय अध्यापक बनण्यासाठी वरीलप्रमाणे अध्यापन कौशल्य आत्मसात करणे सक्तीचे केल्यास एकूणच वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा चांगला राखणे सोपे जाईल आणि आरोग्य विद्यापीठ आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकच जोमाने वाटचाल करू शकेल.
क्रॉस पॅथी प्रॅक्टिसचे आव्हान : आरोग्य विद्यापीठातर्फे आयुर्वेद अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि युनानी असे विविध अभ्यासक्रम चालवले जातात. असे अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेतलेल्या डॉक्टरांची मानसिकता मिश्र पद्धतीची प्रॅक्टिस करण्याची आहे. याचे कारण म्हणजे ज्या पॅथीचे शिक्षण त्या विद्यार्थ्याने घ्यावे, असे अपेक्षित आहे. ते त्याला पूर्णत: मिळतेच असे नाही, उदा. होमिओपॅथीच्या पदवीधर डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचा अधिकार हवा आहे. याचे कारण त्यांना होमिओपॅथी प्रॅक्टिसचा आत्मविश्वास नाही आणि तो तसा नाही, याचे कारण त्यांना विद्यार्थी दशेत पूर्णत: होमिओपॅथीचे शिक्षण मिळताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर त्या त्या वैद्यकीय शाखांच्या महाविद्यालयामध्ये त्याच वैद्यकीय शाखेचे उत्तम शिक्षण मिळण्याची व्यवस्था करणे, हीदेखील खरे तर आरोग्य विद्यापीठाची जबाबदारी आहे. संशोधन कार्याला गती हवी : कोणतेही विद्यापीठ हे केवळ परीक्षेचे केंद्र न बनता त्या विषयामधील संशोधनाचे केंद्र बनले पाहिजे. आरोग्य विद्यापीठानेही सर्व वैद्यक शाखांमध्ये समन्वय साधून एक उत्तम संशोधन केंद्र विकसित करण्याची गरज आहे. यामुळे सामान्य जनतेला त्रस्त करणा-या अनेक असाध्य किंवा कष्टसाध्य अशा व्याधींवर विविध पॅथींमध्ये विशिष्ट उपचार शोधण्यास मदत होईल, यासाठी खरे तर आरोग्य विद्यापीठाचे स्वत: चे सुसज्ज असे रुग्णालय स्थापन होणे आवश्यक आहे. यामध्ये विविध पॅथींचे उपचार उपलब्ध असावेत. याबरोबरच संशोधनासाठी विविध प्रयोगशाळांचीही गरज भासेल, अशा रीतीने हे सर्व निर्माण करून ते नियंत्रित आणि पुढे विकसित करण्याचे मोठे आव्हान आरोग्य विद्यापीठाने या वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्वीकारले तर ते वैद्यकीय क्षेत्राच्या आणि सामान्य जनतेच्याही दृष्टीने हिताचे ठरेल, असे वाटते.