आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुक्राचे दिवसा दर्शन घेण्याची अपूर्व संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या बुधवारी म्हणजे 6 जून 2012 रोजी दिवसाउजेडी शुक्र दिसणार आहे. शुक्राचे सुमारे 1 कला व्यासाचे काळे बिंब आपल्याला दिसणार आहे. सूर्योदयापासून साधारण सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ 4 तास हे दृश्य आपण पाहू शकू. या काळात सूर्यबिंब ओलांडून शुक्र पुढे सरकणार आहे. त्यामुळे सूर्यबिंबाच्या पार्श्वभूमीवर हे विलोभनीय दृश्य दिसेल.
आकृतीत सूर्यबिंबावरून जाणारा शुक्राचा मार्ग रेखाटला आहे. शुक्र वक्री असल्याने पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. त्यामुळे सूर्यबिंबावर उत्तर-पूर्व कोप-यात तो सूर्यबिंबाला स्पर्श करील. ती जागा क्र. 1 ने दाखवली आहे. त्यानंतर शुक्रबिंब पूर्णपणे सूर्यबिंबावर येऊन क्र. 2 मध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्यबिंबाला आतून स्पर्श करील. या वेळी पहाटेचे साधारण 4 वाजलेले असतील. पण तेव्हा सूर्य क्षितिजाच्या खाली असल्याने या अवस्था पाहता येणार नाहीत. शुक्र त्याच्या मार्गाच्या मध्याजवळ असताना म्हणजे सूर्योदयाच्या सुमारास दिसू लागेल आणि त्यानंतर अधिक्रमण संपेपर्यंत हे दृश्य पाहता येईल. क्र. 3 या ठिकाणी शुक्र असताना तो सूर्यबिंबाच्या केंद्रापासून साधारण 9 विकला एवढ्या किमान अंतरावर असेल. ही अवस्था सकाळी 7 ची असेल. त्यानंतरचा उरलेला मार्ग शुक्र सुमारे 3 तासांत पार करील. 10 च्या सुमारास सूर्यबिंबाच्या उत्तर-पश्चिम बाजूस शुक्र पूर्णपणे बाहेर पडेल. आकृतीत सूर्यबिंबाचा उत्तर बिंदू वर दाखवला आहे. सकाळी सूर्यबिंब पूर्व क्षितिजावर असेल. त्यामुळे त्याचा उत्तर बिंदू (ठ) डावीकडे आणि (ए) हा बिंदू क्षितिजाकडे येईल अशा त-हेने आपल्यासमोर ही आकृती धरावी. हा मार्ग निरीक्षणाशी जुळेल.
मात्र हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. कारण उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहणे म्हणजे आंधळेपणाला निमंत्रण. दुर्बीण, द्विनेत्री या साधनांतून पाहिल्यास त्याच क्षणी अंधत्व येईल म्हणून अधिक्रमण पाहताना डोळ्यांच्या सुरक्षिततेची पक्की खात्री झाल्याशिवाय आणि जाणकार माणसाला विचारल्याशिवाय पाहण्याचा प्रयत्न करू नये. सूर्यग्रहणाच्या वेळी वापरतात तसे चष्मे (नेहमीचा गॉगल नव्हे) किंवा विशिष्ट क्रमांकाची वेल्डरची काच वापरून निरीक्षण करता येईल. परंतु त्यातूनही सतत पाहू नये. दुर्बिणीतून घेतलेली प्रतिमा पडद्यावर घेऊन पाहता येईल; पण दुर्बिणीला सोलर फिल्टर बसवावा लागेल. असे करताना चुकूनही डोळा दुर्बिणीला लागता कामा नये. थोडक्यात सुरक्षितता महत्त्वाची. ही काळजी ज्याची त्याने घ्यायची आहे.
शुक्र अधिक्रमणाची संधी दुर्मीळ असते. यानंतरचे अधिक्रमण 11 डिसेंबर 2117 या दिवशी होणार आहे. म्हणजे या शतकातील शुक्र अधिक्रमणाची ही शेवटची संधी आहे.
ग्रहगतीचे नियम शोधून काढणा-या केप्लरने शुक्र अधिक्रमणाचे गणित प्रथम केले होते. 7 डिसेंबर 1631 रोजी शुक्र अधिक्रमण होईल असे त्याने सांगितले होते. परंतु या अधिक्रमणाचे निरीक्षण कोणीच करू शकले नाही.
4 डिसेंबर 1639 रोजी झालेले शुक्र अधिक्रमण हे दुर्बिणीच्या शोधानंतर पाहिलेले प्रथम अधिक्रमण होय.
जेरेमी होरॉक्स याने हा मान प्रथम मिळवला. धूमकेतूंबद्दल प्रसिद्ध असलेला न्यूटनचा समकालीन शास्त्रज्ञ एडमंड हॅले याने 1677 मध्ये सेंट हेलेना बेटावरून बुध अधिक्रमण पाहिले होते. दोन भिन्न ठिकाणांहून अधिक्रमणाचे निरीक्षण केल्यास पराशय पद्धतीचा उपयोग करून सूर्य-पृथ्वी अंतर ठरवता येईल, असा विचार हॅलेला सुचला. परंतु त्यासाठी शुक्र अधिक्रमण योग्य ठरेल असे त्याला वाटले.
पृथ्वीला बुधापेक्षा शुक्र जवळ आहे. त्यामुळे शुक्र अधिक्रमणाच्या निरीक्षण प्रयोगात जास्त अचूकता येईल असे त्यास वाटले. याबाबतचा संशोधन निबंध त्याने 1712 मध्ये सादर केला. परंतु शुक्र अधिक्रमणासाठी 1761 च्या जूनपर्यंत थांबणे आवश्यक होते. या अधिक्रमणापूर्वी हॅलेचे निधन झाले. प्रयोगाची जबाबदारी इतर शास्त्रज्ञांनी घेतली. 6 जून 1761 रोजी झालेल्या शुक्र अधिक्रमणाचे निरीक्षण करण्यासाठी जगात
62 ठिकाणी निरीक्षणे करण्यात आली. या मोहिमेत एकूण 120 शास्त्रज्ञ सहभागी झाले. त्यानंतर 1769 मध्ये झालेले अधिक्रमण निरनिराळ्या 77 ठिकाणांहून प्रायोगिकदृष्ट्या पाहिले गेले. सूर्य-पृथ्वी अंतराची किंमत ठरवण्यासाठी ही सर्व धडपड होती. या निरीक्षणातून फारशी अचूक किंमत काढता आली नाही. 9 डिसेंबर 1874 या दिवशी अधिक्रमण होते. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिका या देशांच्या शास्त्रज्ञांनी बरीच अचूक निरीक्षणे केली. भारतात हे अधिक्रमण रघुनाथचारी, नरसिंग राव आणि सामंत चंद्रशेखर यांनी पाहिले. बागलकोट येथील शिक्षक आणि प्रसिद्ध खगोलविद व्यंकटेश बापूजी केतकर यांनी गणित करून सूर्यबिंबावरचा मार्गही रेखाटला होता. अशा त-हेने 1761 पासून 1882 पर्यंतच्या चार शुक्र अधिक्रमणांची निरीक्षणे करून सूर्य-पृथ्वी अंतर 14 कोटी 96 लाख 65 हजार कि.मी.च्या आसपास ठरवण्यात आले. ही किंमत आधुनिक उत्तराशी जुळती आहे.
शुक्राच्या अधिक्रमणाचा उपयोग शास्त्रज्ञांनी अखेर असा करून घेतला. शुक्र अधिक्रमणासाठी निरीक्षकांना शुभेच्छा... पण डोळ्यांची सुरक्षितता अगोदर पाहा ही पुन्हा एकदा सूचना.
जाणून घ्या शुक्राच्या संक्रमणाचा राशींवर पडणारा प्रभाव...