आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी कलावंतांचा मेळा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत परीक्षक गोरोबाकाकांची जन्मभूमी आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे ठाण असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मराठी नाट्यकर्मींचा उत्सव २१ एप्रिलपासून भरतोय. त्यानिमित्ताने इथे उस्मानाबादकरांची आणि मराठी कलाकारांची लगबग सुरू झाली आहे.
 
उस्मानाबाद शहरातील चौकाचौकात स्वागत कमानी देशभरातील मराठी कलावंतांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मुख्य मार्गावर रांगोळ्यांची तयारी झाली आहे. वेगवेगळ्या तीन ठिकाणी मंच उभारण्यात आले असून नाट्यकलेबरोबर लावणी, भारूड, नृत्य, एकांकिका, गण-गवळण आदी कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यासाठी लागणारी तयारी दिवसरात्र सुरू आहे.

उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उस्मानाबादकर हिरीरीने सहभागी झाले अाहेत. उस्मानाबादच्या इतिहासात मराठी कलावंतांचा मेळा प्रथमच जमतोय, त्यामुळे शहरवासीयांची उत्कंठाही वाढली आहे. मराठी रंगभूमी, नाट्यचळवळ, नाट्य संस्कृती आणि उस्मानाबाद, असा अर्थाअर्थी काडीचाही संबंध नाही; किंबहुना असे म्हणता येईल, अशी एकंदर स्थिती. व्यावसायिक नाटके कशी असतात, हे मोजक्याच उस्मानाबादकरांना सांगता येतील. उस्मानाबादमध्ये आजवर बोटावर मोजण्याइतकी नाटके झालेली आहेत. त्यातही अलीकडच्या काळातील दर्जेदार, नावाजलेली एक-दोन नाटके झालेली. त्यामुळे खऱ्या अर्थाने नाट्य रसिक आणि रसिकता असलेले उस्मानाबादकर किती असतील, याबाबत साशंकता आहे. ज्या चळवळीचा, संस्कृतीचा आविष्कार ज्या शहराने पाहिला नाही, अशा शहरात ९७ वे मराठी नाट्य संमेलन होत आहे, ही बाब काहीशी अप्रूप वाटावे अशीच आहे, पण उस्मानाबादमध्ये नाट्य संस्कृतीचा वारसा नाही, असेही ठामपणे म्हणता येणार नाही. ४०-५० वर्षांपूर्वी उस्मानाबाद-तुळजापूरमध्ये काही ज्येष्ठ रंगकर्मींनी गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमातून, मेळाव्यातून नाट्यसंस्कृती रुजविली आणि वाढविली.

त्यामुळे जिल्ह्याला काही अंशी नाट्यचळवळीचा इतिहास आहे. मात्र, तो म्हणावा असा वाढला आणि फोफावला असेही नाही. मात्र, तुळजापूरकरांनी ही संस्कृती निव्वळ रुजविली नाही तर तिला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. म्हणूनच मराठी रंगमंचावर दिसणाऱ्या नामवंत-कलावंत चेहऱ्यामध्ये तुळजापूरच्या कलाकारांचा समावेश दिसताे. तुळजापूरचे ज्येष्ठ रंगकर्मी विजयसिंह भोसले (सरकार), गोविंद घण, व्हट्टे गुरुजी, दगडोजी वाघ गुरुजी, माणिक शिरसाट, मुरलीधर घाडगे, जयराज वऱ्हाडे, दिवाकर महामुनी, दयानंद रेणके यांनी नाट्यचळवळीचा ध्यासच घेतला होता.
 
अलीकडच्या काळात श्रीकांत नाडापुडे, प्रा.संभाजी भोसले, कीर्ती पोतदार, प्रकाश हंुडेकरी, शिवाजी बोधले, शंतनू गंगणे, उमेश जगताप ही मंडळी चळवळ नेटाने पुढे नेत आहेत. तुलनेने उस्मानाबादमध्ये व्यंकटेश हंबीरे, वासुदेव महामुनी यांच्यानंतर ही चळवळ दुर्लक्षित राहिली. ही चळवळ रुजण्यासाठी, वाढण्यासाठी अपेक्षेनुसार प्रयत्न झाले नाहीत, ही शोकांतिका आहे. त्यामुळेच सुरुवातीला मराठी नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने संमेलनाची मागणी केल्यानंतर या बाबींचा ऊहापोह झाला. ज्या शहरात नाट्यगृहाचा पत्ता नाही तिथे अखिल भारतीय संमेलन घ्यायचे कसे, तिथला नाट्य संस्कृतीचा इतिहास काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, शाखेचा आग्रह आणि तयारीचे केले गेलेले सादरीकरण लक्षात घेता नाट्य परिषदेने उस्मानाबादेत संमेलन घेण्याची घोषणा केली.
 
वास्तविक, पाच वर्षे दुष्काळाचे तडाखे सहन केलेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय संमेलन घेणे खरेतर दिव्यच होते. त्यातच अपुऱ्या वेळेत नियोजन अपेक्षित असल्याने आयोजकांसमोर अडचणी येणार होत्या. त्यामुळे ७, ८, ९ एप्रिलऐवजी २१, २२, २३ अशी तारीख करण्यात आली. संमेलनासाठी उस्मानाबादकरांची एकजूट झाली आणि तयारी सुरू झाली. विशेषत: तरुणाईने यासाठी पुढाकार घेतल्याने तयारीचा भाग पूर्ण झाला. आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारले, काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी त्यांना अनुमोदन देत नाट्य संमेलनाची जबाबदारी स्वीकारली.
 
संमेलनाच्या निमित्ताने आमदार ठाकूर ८ एप्रिलपासून उस्मानाबाद शहरात तळ ठोकून आहेत. रंगमंचापासून कलावंतांच्या निवासाच्या सुविधेपर्यंत प्रत्येक बाबींवर त्यांचा कटाक्ष आहे. शहरात सगळ्या स्तरावर सध्या नाट्य संमेलनाचीच चर्चा सुरू आहे. नाट्य संमेलनाच्या इतिहासात छोट्या शहरात संमेलन घेण्याची जशी पहिली वेळ असावी, तशी उस्मानाबादच्या इतिहासात एवढ्या मोठ्या स्वरूपाचे संमेलन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे प्रत्येक उस्मानाबादकर संमेलनाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेऊ लागला आहे. संमेलनाची वातावरण निर्मिती म्हणून सुरुवातीचे पाच दिवस अन्य कार्यक्रमाबरोबरच नाट्यांचे सादरीकरण सुरू करण्यात आले आहे.
 
या कार्यक्रमांत उस्मानाबादकरांचा वाढलेला उत्साह लक्षात घेता मुख्य संमेलन अधिक प्रतिसादात होईल, याची खात्री वाटते. नाट्य संमेलन ज्या शहरात होत आहे, त्या उस्मानाबादेत आजवर नाट्यगृह उभारले जाऊ शकले नाही. त्यामुळे या चळवळीकडे पाहण्याचा एकूणच उस्मानाबादकर आणि लोकप्रतिनिधींचा दृष्टिकोन अधोरेखित होतो. १०-१२ वर्षांपूर्वी अर्धवट झालेले नाट्यगृह उस्मानाबादकरांसाठी सुविधांसह उपलब्ध होऊ शकले नाही. शहरात नाट्यगृह नसल्यामुळे कदाचित या चळवळीने गती घेतली नसावी. रसिकता वाढू शकली नसावी. मात्र, ४०-५०  वर्षांपूर्वीचा नाट्य चळवळीचा गतिमान इतिहास काळाआड जात असताना उस्मानाबादेत पुन्हा नाट्य संमेलनाच्या माध्यमातून या चळवळीचा जागर होत आहे. त्यामुळे हे नाट्य संमेलन उस्मानाबादकरांसाठी खास पर्वणी ठरेल.

कधी नाट्यगृहाचे प्रवेशद्वार न पाहिलेले प्रेक्षक नाट्य संमेलनाच्या निमित्ताने देशभरातील नाट्य कलावंतांचे स्वागत करण्यासाठी आतुर आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने उस्मानाबादमधल्या नवकलावंतांना संधी मिळणार आहे. किंबहुना ज्येष्ठ रंगकर्मींचाही सन्मान होणार आहे. त्यामुळे जुन्याकडून नव्या पिढीकडे हा वारसा हस्तगत होईल आणि काहीशी मंदावलेली चळवळ पुन्हा गतिमान होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या संमेलनात एकाहून एक सरस नाटक पाहायला मिळणार असल्याने शहरवासीयांची उत्सुकता वाढली आहे. तुझे आहे तुजपाशी, षड्यंत्र, कॉमेडीची बुलेट ट्रेन, लावणी, गोंधळ व लळीत, स्थानिक कलावंतांचे नृत्य, समूह नृत्य आदी कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे संमेलनाची सुरुवात आणि शेवट उत्साहपूर्ण असणार, यात शंका नाही. नाट्य संमेलनाच्या यशस्वितेनंतर उस्मानाबादकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उस्मानाबादेत सारस्वतांचा मेळा भरवू शकतील, त्यासाठी शहरवासीयांची दावेदारी अधिक प्रबळ होईल, हे मात्र निश्चित.
 
chandrasen.d@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...