आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrkant Shinde Article About Election, Divya Marathi

मतदारांना संभ्रमात पाडणार्‍या लढती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या असताना बंडखोरीच्या रूपाने आणि एकमेकांचे व स्वपक्षांचे उमेदवार पाडण्यासाठी राजकीय डावपेच शिजवले जात आहेत. हे डावपेच म्हणजे पक्षीय विचारधारांना मूठमाती आहे तसेच मतदारांना वार्‍यावर सोडण्यासारखे आहे. गेल्या काही दिवसांतील राज्यातील काही राजकीय महत्त्वपूर्ण घडामोडी पाहिल्यास चित्र साफ होईल.

सगळ्यात ताजे उदाहरण आहे नंदुरबारचे. नंदुरबारमधून काँग्रेसने विद्यमान खासदार माणिकराव गावित यांना तिकीट दिले आहे. जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे असल्याने त्यांनी आपला उमेदवार उभा केला आहे; परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही जागा आपल्याकडे घ्यावी, असा सूर धरला होता. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने येथून राष्ट्रवादीचा उमेदवार नक्कीच निवडून येईल, अशी आशा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांना वाटत आहे. मात्र, काँग्रेसने जागा सोडण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादीची पंचाईत झाली.

2009च्या निवडणुकीत माणिकराव गावित 36.01 टक्के मतांनी विजयी झाले होते, तर समाजवादी पार्टीच्या शरद गावित यांना 30.68 टक्के मते मिळाली होती. भाजपची येथे तशी मोठी ताकद नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी आपली मुलगी डॉ. हिना गावित यांच्या माध्यमातून काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न सुरू केला. डॉ. हिना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नंदुरबारचे तिकीट मिळवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला शंका येऊ नये म्हणून विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळातून काढून टाकू, असा दम दिला आणि काढून टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रही दिले. खरे तर हा सगळा एका कटाचाच भाग आहे. काहीही करून काँग्रेसच्या माणिकराव गावितांना हरवणे हा एकच उद्देश असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भाजप आणि शिवसेनेच्या मदतीला धावून गेले आहेत. ही राजकीय साठमारी काँग्रेस-राष्ट्रवादीत कमी दिसत असून शिवसेनेमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. काही ठिकाणी तर शिवसेनेचेच तीन उमेदवार वेगवेगळ्या पक्षांमधून एकमेकांविरोधात लढताना दिसत आहेत. गजानन बाबर शिवसेनेचे मावळचे खासदार होते. दुसर्‍यांदा आपल्याला तिकीट मिळेल म्हणून बाबर यांनी आपले काम सुरू केले; परंतु तिकीट वाटपाच्या वेळी शिवसेनेने बाबर यांच्याऐवजी श्रीरंग बारणे यांना तिकीट दिले. तिकीट कापल्याचे लक्षात आल्याबरोबर बाबर यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका करत पक्ष सोडला आणि आता लवकरच म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ते मनसेत प्रवेश करणार आहेत.

बाबर मनसेत प्रवेश करत असले, तरी त्यांना तिकीट दिले जाणार नाही. मात्र, ते शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत पाहायला मिळणार आहे. शिर्डीमध्येही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी लगेचच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसनेही त्यांना शिर्डीतून उमेदवारी दिली. शिवसेनेने बबनराव घोलप यांना उमेदवारी दिली खरी, परंतु ते उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याबाबतच्या खटल्यात दोषी ठरल्याने शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे. कल्याणचे शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. राष्ट्रवादीने त्यांना कल्याणमधून उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने तेथे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मुलाला श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

मनसेने माजी शिवसैनिक राजीव पाटील यांना तिकीट दिले आहे. विशेष म्हणजे आनंद परांजपे राष्ट्रवादीत असले, तरी राष्ट्रवादीच्या एका गटाने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे खरी लढत शिवसेना उमेदवारांमध्येच आहे. परभणीचे शिवसेनेचे खासदार गणेश दुधगावकर यांनी तिकीट कापले गेल्याचे लक्षात आल्यावर राष्ट्रवादीत प्रवेश केला खरा, परंतु राष्ट्रवादीने तेथे विजय भांबळे यांना तिकीट दिले आहे. शिवसेनेने संजय जाधव यांना तिकीट दिले आहे. मात्र, दुधगावकर राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याने शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडणार असल्याचे दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण सामना ठाण्याचा आहे. ठाणे येथून शिवसेनेने राजन विचारे यांना तिकीट दिले आहे. राष्ट्रवादीने संजीव नाईक यांना उभे केले असून मनसेने शिवसेना चित्रपट शाखाप्रमुख अभिजित पानसे यांना मनसेत घेऊन तेथून तिकीट दिले आहे. त्यामुळे खरा सामना राजन विचारे आणि अभिजित पानसे यांच्यातच आहे.

या सगळ्या राजकीय लढती मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करणार्‍या आहेतच शिवाय मतदारांच्या पक्षीय विचारधारांना धक्का देणार्‍या आहेत.