आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्भीड, धैर्यवान राजा : छत्रपती संभाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र युवराज संभाजी यांचा जन्म 14 मे 1657 रोजी राजनंदिनी सईबार्इंच्या पोटी पुरंदरच्या किल्ल्यावर झाला. बाळ पालथा जन्मणे हा अपशकुन आहे, असा समज त्या काळी होता. बाळ पालथा जन्मला ही बातमी शिवाजी महाराजांना कशी सांगावी याची चिंता दाई व दासींना सतावत होती. दाई महाराजांसमोर जाऊन घाबरत उभी राहिली. राजांनी तिची द्विधा मन:स्थिती जाणली. तिने भीत - भीत वर्तमान सांगितले. राजे म्हणाले, ‘व्वा... छान झाले.. दिल्लीची पातशाही पालथी घालण्यासाठी युवराज पालथे जन्माला आले,’ असे म्हणून त्यांनी दासीला मोत्यांचा हार भेट दिला. शिवाजी महाराजांचे ते शब्द संभाजींनी पुढे खरे करून दाखवले.

बाळराजे दोन वर्षांचे असताना सईबार्इंचा मृत्यू झाला. जिजाबार्इंच्या मार्गदर्शनाखाली संभाजीराजांचा सांभाळ झाला. त्यांनी शिवरायांप्रमाणेच संभाजींची जडणघडण केली. वयाच्या नवव्या वर्षापासून संभाजीला लढाया, राज्यकारभार, नीती, प्रजेबाबतच्या कर्तव्याचे धडे मिळायला लागले. वय वाढू लागले तसे संभाजीचे रूप अधिकच खुलू लागले. ते सुंदर, तेजस्वी सूर्याप्रमाणे प्रकाशमान दिसू लागले. त्यांचे तेजस्वी रूप आणि कर्तृत्व पाहूनच शिवाजी महाराजांनी त्यांच्या हाती अनेक लढायांचे नेतृत्व सोपवले.

संभाजींना लहानपणापासूनच लढाईची आवड होती. मावळ्यांना त्यांच्यासोबत लढायला जायला आवडत असे. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना बालपणीच अनेक प्रसंगांत आपल्यासोबत नेल्याचे आपल्याला आढळते. त्यांना लहानपणापासूनच संकटांचा सामना कसा करायचा याचे जणू काही प्रशिक्षणच ते देत होते. अनेक लढायांमध्ये महाराज त्यांना आवर्जून सोबत नेत असत. यातून त्यांना युद्धाचे कौशल्य आत्मसात व्हावे, लढाईचा प्रत्यक्ष अनुभव यावा, असा महाराजांचा उद्देश होता. पिता - पुत्र 5 मार्च 1666 रोजी आग्य्राला गेले. 11 मे 1666 रोजी आग्य्राला पोहोचले. तेथे एके दिवशी औरंगजेब बादशहा नऊ वर्षांच्या बाल संभाजीला खवचटपणे म्हणाला, ‘राजे, आमच्या मल्लाशी कुस्ती खेळणार का?’ तेव्हा संभाजीने बाणेदारपणे उत्तर दिले, ‘मी युवराज आहे. अलबत्या - गलबत्यासोबत कुस्ती खेळत नसतो.’ त्यांचे ते उत्तर ऐकून औरंगजेबालाही संभाजीचे कौतुक वाटले. युद्धाचे शिक्षण मिळाल्यानंतर महाराजांनी 1672 मध्ये दहा हजार शूर सैनिकांचा विभाग संभाजीच्या ताब्यात देऊन एकाच वेळी शेजारी राज्यांतील शत्रूंवर हल्लाबोल चढवला. त्या मोहिमांत संभाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य गाजवले. युवराज लहान असले तरी धैर्यवान होते. फोंडा किल्ल्याच्या मोहिमेतही संभाजींनी पित्याच्या मदतीला धावून जात शौर्य दाखवले.

संभाजी महाराज युद्धभूषणच नव्हते तर ‘बुधभूषण’ही होते. त्यांनी एकापेक्षा एक अशा चार सरस ग्रंथांची रचना केली. संस्कृतमधील ग्रंथ ‘बुधभूषण’ तसेच ‘नायिकाभेद’, ‘नखशिखा’, ‘सातसतक’ हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. परंतु अशा महान विद्वान युवराजाला बदनाम करण्याचे प्रचंड प्रयत्न त्या काळी झाले. संभाजी ऐषारामात राहणारा, अय्याशी, बाहेरख्याली करणारा असल्याचे आरोप झाले. तसे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला गेला. एवढेच नाही तर संभाजींवर राज्याभिषेक करण्यासही ब्राह्मणांनी नकार दिला. प्रत्यक्षात संभाजी हा एक निर्भीड, धैर्यवान, न्यायनिष्ठुर, रयतेवरील अन्याय सहन न करणारा राजा होता. महाराजांनी अनेक पत्रके काढून कर्मठ सनातन्यांना शह देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केवळ राज्यक्रांतीच नव्हे तर सामाजिक क्रांती केली. हिंदू धर्मातील स्पृश्य, अस्पृश्यता संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील कर्माची चौकट खिळखिळी केली व तथाकथित अतिशूद्रांकडूनही क्षत्रिय कामे करवून घेतली.

अष्टप्रधान मंडळातील सदस्यांनी महाराणी सोयराबार्इंना हाताशी धरून संभाजीराजांच्या विरोधात अनेक कटकारस्थाने करविली. महाराजांच्या मनात त्यांच्याविषयी द्वेष पसरवण्याचे उद्योग केले. पंच मंडळींनी औरंगजेबाशी संधान बांधून संभाजी महाराज व कवी कलश यांना कैद करविले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना हाल हाल करून ठार मारले. सर्व शास्त्रे, शस्त्रे, कला, युद्धकौशल्य, अर्थकारण अशा क्षेत्रांत संभाजी महाराज पारंगत होते. असा कर्तव्यनिष्ठ राजा दुसरा झाला नाही. जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!