आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chavan V S Boralkar In Graduate Constituency Elections

लढाई पदवीधरची : संघ शिस्तीने फेटाळला ‘मुंडे पॅटर्न’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पक्ष कार्यकर्त्याला बाजूला ठेवत विरोधकाला संपवण्यासाठी त्याच्याच तंबूतील एकाला पक्षात घेऊन उमेदवारी द्यायची अन् त्या जोरावर तो विजयी झाल्यानंतर आपण विजयोत्सव साजरा करायचा, हा भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांचा पॅटर्न या वेळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राबवला जाणार होता. मात्र मोदी लाटेमुळे भाजप सत्तेवर आल्याने राष्ट्रीय स्तरावर आक्रमक झालेल्या राष्ट्रीय स्वयंसवेक संघाने हा पॅटर्न फेटाळून लावत कधी काळी संघ शाखेत ‘रियाज’ केलेल्या शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली. निवडणूक हरलो तरी चालेल पण कार्यकर्ता लढला पाहिजे, हा संघाचा धडा अलीकडच्या काही वर्षांत प्रथमच गिरवला गेला.
केंद्रात भाजप सत्तेवर आला नसता, संघ सक्रिय झाला नसता तर मुंडे यांनी गेवराई, माजलगाव, आष्टी-पाटोदा, बीड या विधानसभा मतदारसंघात झाले तसेच राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना पाडण्यासाठी बाहेरचा उमेदवार म्हणजेच सचिन मुळे यांनी मैदानात उतरवले असते. स्वत:च्या बीड जिल्ह्यात मुंडे यांनी पक्षाची ताकद वाढवण्याऐवजी बाहेरचे आयते उमेदवार रिंगणात घेतले अन् नंतर ते पुन्हा पहिल्या घरात गेले. प्रत्येक वेळी विरोधकांतील नवा चेहरा घ्यायचा, त्याला आमदार, खासदार करायचे, नंतर तो पुन्हा स्वपक्षात जाणार, असा त्यांचा पॅटर्न आहे. त्यामुळे बीडमधून मुंडे विजयी झाले असले तरी तेथे भाजप नाही, असा संघ कार्यकर्त्यांचा प्राथमिक अभ्यास आहे. त्यामुळेच राजकारणात मुंडे यांचे महत्त्व कमी होत असल्याचे या गोटातून सांगण्यात येते.
काय आहे मुंडे पॅटर्न?
बीड जिल्हा स्व. केसरबाई क्षीरसागर यांच्याकडून ताब्यात घेताना मुंडेंनी भाजपच्या कार्यकर्त्याला बळ देण्याऐवजी क्षीरसागर कुटुंबीयांच्या आसपास असूनही दुर्लक्षित राहणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमद्यांना भाजपकडून तिकीट देऊन विजयी करून दिले. यात रजनी पाटील, प्रकाश साळुंके, सुरेश धस, अमरसिंह तसेच बदामराव पंडित, बाजीराव जगताप, स्व. डॉ. विमल मुंदडा यांचा समावेश आहे. आर्थिक मदत, प्रचाराचे कष्ट घेण्यापेक्षा विरोधी पक्षातील का होईना (धन) दांडग्या संस्थानिकाला आपल्या शेजारी बसवून लढवणे याला मुंडे पॅटर्न म्हणतात, असे म्हटले जाते.
या वेळी काय झाले?
पदवीधरमध्ये सतीश चव्हाण यांना कसे हटवायचे हा यक्ष प्रश्न होता. मर्यादा ओळखून (मुंडेंच्या) श्रीकांत जोशी यांनी स्पष्ट नकार दिला होता. चव्हाण यांना हटवायचे असेल तर स्ट्राँग मराठा हवा अशी हवा तयार केली गेली. भाजपमध्येही मराठे आहेतच. परंतु त्यापेक्षा आयता अन (धन) दांडगा मराठा मिळाला तर योग्य, या मुंडे पॅटर्ननुसार (बीड जिल्ह्यात वापरलेल्या) मुंडेंंनी चक्र फिरवले. राष्ट्रवादीतच असलेल्या मधुकरराव मुळे यांच्या ताब्यातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ताब्यात घेऊन अनपेक्षितपणे चव्हाण यांनी चमत्कार करून दाखवला होता. यामुळे नाराज झालेल्या मराठ्यांच्या (पदवीधर मतदारसंघात नेमकी मराठ्यांची मते किती हे कोणालाही माहिती नाही) मतांचा फायदा मुळे यांच्यामुळे होऊ शकतो, असे समीकरण लावून मुंडे यांनी मुळेंच्या मागे तगादा लावला. मुळेंसाठी खर्च नाही. एकाच घरातील दोन भिडूंच्या लढाईत मुळे पडले तर विजय अवघड असल्याचे माहित असूनही लढलो असे सांगून मुंÞडेंना मोकळे होता आले असते. जिंकलो तर पुन्हा पॅटर्नचा विजय असे शिक्कामोर्तब त्यांना करता आले असते.
मोदी फॅक्टरनंतरी फॅक्ट स्वीकारली नाही
मात्र, लोकसभेत मोदींच्या लाटेमुळे पदवीधरमधून भाजपचा उमेदवार विजयी होईल, असे संकेतच मिळाले. आणि आता माझेही ‘काही खरं दिसत नाही बाबा’ अशी प्रतिक्रिया खुद सतीश चव्हाण यांनी लोकसभा निकालानंतर दिली. तरीही भाजपने फॅक्ट स्वीकारली नाही. ते पुन्हा मुळे यांच्या मागे लागले. प्रत्यक्षात आधी नाही म्हटल्यानंतर मुळेंनी मोदी फॅक्टर बघून नव्याने उमेदवारी मागितल्याचे सांगितले जाते. उमेदवारी मागण्यासाठी नेत्यांच्या दारात जावे लागते, येथे भाजपचे नेते संभाव्य उमेदवाराच्या दारात उभे होते. यावरून मोदी फॅक्टरची फॅक्ट भाजपने स्वीकारली नसल्याचे समोर आले. जेव्हा बोरळकर यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा तो कार्यकर्त्याचा सन्मान ठरला. पण त्यासाठी पक्षाबाहेरील उमेदवार शोधणे, त्याची मनधरणी करणे हा उद्योग भाजपने केला. आता तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘मान अपमान गोवे, अवघे गुंढोनी ठेवावे’ असे त्यांच्यासाठी झाले.
विजय कोणाचा?
राजकीय पक्ष म्हटला की त्याने लढलेच पाहिजे. प्रत्येक वेळी विजय मिळेलच असे नाही. परंतु 1999 जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा भाजपचे जास्त आमदार निवडून आले तर मी मुख्यमंत्री होईल या ईर्षेपोटी (ती जगजाहीर आहे) मुंडे यांनी संभाव्य विजयी उमेदवाराचा जो ‘क्रायटेरिया’ ठरवा तो अजून बदलला नाही. यात कार्यकर्ता मागे पडला. धनिक, संस्थानिक अन् खर्चाळू एवढाच त्यांचा क्रायटेरिया राहिला. या वेळीही त्यांनी तो प्रयत्न केला. परंतु तसे घडले नाही. उमेदवार निवडीसाठी गठन केलेल्या समितीत उच्चपदस्थ नेत्यांनी कार्यकर्ताच हवा असा हट्ट धरला. हा कार्यकर्त्यांचा, पक्षाचा आणि असाच पक्ष हवा अशी अपेक्षा असलेल्या संघाचा हा विजय आहे.